Friday, 8 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 08.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 08 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०८ मे २०२ सकाळी.०० वाजता

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सकाळी साडे अकरा वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होईल.

results.digilocker.gov.in, maha hssc board.in, ssc result. mkcl. org, आणि maha hssc board.in या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे.

****

देशातील सरकारी धान्यसाठा सहा लाख ४० हजार टनांपेक्षा जास्त असून, हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

आकाशवाणीच्या ९०व्या स्थापना दिनानिमित्त आज दिल्ली इथं मॅरेथॉन काढण्यात आली. आकाशवाणी, दूरदर्शन आणि प्रसार भारतीचे कर्मचारी या मॅराथॉनमध्ये सहभागी झाले होते. यावेळी प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन उपस्थित होते.

'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या ब्रीदवाक्यासह १९३६ पासून आकाशवाणी आजतागायत कार्यरत आहे. देशभरातल्या इतर केंद्रांवरही विविध कार्यक्रमांचं आयोजन यानिमित्त करण्यात आलं आहे.

****

केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वेस्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्धाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. उद्या पुण्यात डीवाय पाटील विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून, तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळयालाही ते उपस्थित राहणार आहेत.

****

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी नीदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातील नारेगाव इथून काल अटक करण्यात आली. नाशिक पोलिस पथकाने छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान, या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं.

****

व्हिएतनाम चे राष्ट्राध्यक्ष तो लाम हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यानंतर काल मुंबई इथून विमानानं रवाना झाले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तत्पुर्वी, भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत गोलमेज परिषद घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांमधील उद्योगांमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर आणि विहएतनाम इथल्या हो चि मिन्ह सिटी यांच्यात थेट हवाई सेवा सुरू करण्यासह स्वतंत्र बौद्ध पर्यटन सर्किट विकसित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडला. महाराष्ट्रातील साडेसहा अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या प्रस्तावित गुंतवणुकीच्या कराराचे स्वागत करताना हा दक्षिण पूर्व आशियातून झालेला सर्वात मोठा करार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे. पशुधन विकास अधिकारी पदाच्या २ हजार ७९५ तर सहाय्यक आयुक्त पदाच्या ३०८ जागा भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सुरू केली असून तशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही परीक्षा ११ जून २०२६ रोजी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीनं घेण्यात येणार आहे.

****

नांदेड इथं काल हेल्मेट आणि सीट बेल्ट लाऊन वाहतुकीचे नियम आणि कायदे पाळणाऱ्या नागरिकांना प्रशासनातर्फे गौरवण्यात आलं. वाहतूक पोलीस, परिवहन विभाग आणि 'सेफर इंडियन रोड्स' यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते, रस्ते सुरक्षा भेटवस्तू आणि रस्ते चिन्हांचा तक्ता देऊन नागरिकांना सन्मानित करण्यात आलं.

****

नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महसूल सहायक माधव फुलवळे याला निलंबित केलं आहे. कंधार तालुक्यातील मानसपुरी इथल्या कनिष्ठ सहायक गजेश्री गोरे यांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्राच्या पडताळणीमध्ये विलंब केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. फुलवळे यांना कारणे दाखवा नोटिस बजावूनही समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

****

लातूर महानगरपालिकेने काल गंजगोलाई भागातली ३०० अतिक्रमणं जमीनदोस्त केली. मनपाच्या पाच पथकांनी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही कारवाई केली. शहरातील इतर भागातही अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबवण्यात येणार आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपापली अतिक्रमणं लवकरात लवकर काढून घ्यावीत, असं आवाहन मनपाकडून करण्यात आलं आहे.

****

No comments:

Post a Comment