Saturday, 16 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १६ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      नीट-२०२६ पेपरफुटी प्रकरणी पुणे इथल्या प्राध्यापक मनिषा मांढरे यांना अटक

·      मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांचा ३० मेपासून उपोषणाचा इशारा

·      पेट्रोलच्या निर्यात शुल्कात प्रतिलीटर तीन रुपये वाढ करण्याचा सरकारचा निर्णय

·      महाविद्यालयांना आपल्या शुल्काची संपूर्ण माहिती जाहीर करणं बंधनकारक

आणि

·      थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक-चिराग जोडी अंतिम फेरीत दाखल

****

नीट-२०२६ पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुणे इथल्या वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापक मनिषा गुरुनाथ मांढरे यांना सखोल चौकशीनंतर अटक केली. नीट २०२६ चा वनस्पती शास्त्र विषयाचा पेपर सेट करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनीच जीवशास्त्र विषयाचा पेपर लिक केल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. एप्रिल २०२६ मध्ये त्यांनी या पेपरफुटी संदर्भात पूर्वीच अटक केलेल्या मनिषा वाघमारे यांच्याबरोबर मांढरे यांनी संपर्क साधत स्वत:च्या निवासस्थानी विद्यार्थ्यांची विशेष शिकवणी घेत परीक्षेतील प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. या नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत ९ आरोपींना अटक केली असून त्यातील ६ आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, काही व्यक्तींच्या कथित कृत्यामुळे संपूर्ण शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये, असं मत, लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. बेल्लाळे यांनी म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी याच महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला सीबीआयकडून अटक झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्राचार्य बेल्लाळे आकाशवाणीशी बोलत होते. लातूर हे शिक्षण क्षेत्रातील विश्वासार्ह केंद्र असून, या प्रकरणामुळे लातूरच्या शैक्षणिक वातावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नसल्याचा विश्वासही डॉ. बेल्लाळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले

बाईट – प्राचार्य डॉ.एस. एस. बेल्लाळे

****

जनगणना २०२७ अंतर्गत आजपासून गृहयादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यांतर्गत, १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या ३३ प्रश्नांची माहिती मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्या एसई आयडीद्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात गृहभेटी देणारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना नागरिकांनी आवश्यक सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे.

****

मराठा समाजाची शासनाकडून दिशाभूल आणि फसवणूक होत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या ३० मे पासून जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं पुन्हा उपोषण आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी इथं आज मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी बोलताना जरांगे यांनी शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. २९ मेपर्यंत कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करावे, सातारा, कोल्हापूर, हैदराबाद आणि इतर संस्थानांच्या गॅझेटचा अध्यादेश लागू करावा, आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत तसंच आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांना महावितरण आणि औद्योगिक क्षेत्रात नोकरी देण्याबाबत अध्यादेश काढावा, अशा मागण्या केल्या.

खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी २८ मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे.

****

पेट्रोलच्या निर्यात शुल्कात प्रति लिटर तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्क कमी करून १६ रुपये ३३ पैसे करण्यात आलं आहे. हे दर आजपासून पुढील पंधरवड्यापर्यंत लागू असतील.

****

शनि जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं विविध शनि मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. मराठवाड्यात राक्षसभुवनसह विविध मंदिरांचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमही पार पडले.

****

राज्यातील प्रत्येक महाविद्यालयाला आपले प्रवेश शुल्क, ट्यूशन फी आणि विकास शुल्काची संपूर्ण माहिती, महाविद्यालयातल्या सूचना फलकावर तसंच माहिती पुस्तिकेत जाहीर करणे बंधनकारक आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयांवर थेट कारवाई करण्याचा इशारा उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे यांनी दिला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पदवी प्रवेशांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी यांनी सर्व शासकीय तसंच खासगी महाविद्यालयांना कडक आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवणं आणि प्रवेशापूर्वीच शुल्काची स्पष्ट कल्पना देणं, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

****

नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्याने कोकण आणि मध्य रेल्वे जोडल्या गेल्या असून नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वर नागपूर ते मडगाव या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ही द्वि-साप्ताहिक गाडी नागपूरहून बुधवार आणि शनिवार रोजी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी सायंकाळी पावणे सहा वाजता पोहोचेल. मडगावहून गुरुवार आणि रविवारी रात्री ८ वाजता सुटणारी गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री साडे नऊ वाजता पोहचेल.

****

भंडारा जिल्ह्यात मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून ८ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे खाक झालं.

****

परभणी जिल्ह्यातील टाकळी कुंभकर्ण इथं आज, नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल मंडळाच्या वतीनं “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” घेण्यात आलं. या शिबीरात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. या समाधान शिबिरात विविध १६ विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते.

****

बीड शहरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ता करता निवारा बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा निधी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्र्यांकडे याबाबतची मागणी केली होती. नगर पालिकेच्या माध्यमातून राजीव गांधी चौकानजिक पालिकेच्या मालकीच्या जागेत हे निवारा बांधकाम होणार आहे.

****

आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे. विविध शैक्षणिक योजना आणि सुविधांची प्रभावी अंमलबजावणी न होणं, शिष्यवृत्ती वेळेवर न मिळणं, वसतिगृहांमधील निवास व्यवस्था, भोजनाची गुणवत्ता, शैक्षणिक साहित्य आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आरोप आंदोलक विद्यार्थ्यांनी केले आहेत.

****

यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभाग पथकाने ढाणकी इथं अनधिकृत खत साठ्यावर मोठी कारवाई करत १५ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी खत नियंत्रण आदेश १९८५ तसंच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीने पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी १९-२१, २२-२०, २१-१६ अशा गुणफरकाने हरवलं. अंतिम फेरीत सात्विक चिराग जोडीचा इंडोनेशियाच्या जोडीसोबत सामना होणार आहे.

****

आयपीएल क्रिकेटमध्ये, आज कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. कोलकात्यामधील ईडन गार्डन्स मैदानावर संध्याकाळी साडे सात वाजता सामना खेळवला जाईल.

****

हवामान

राज्यात आज अमरावती इथं सर्वाधिक ४५ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ४० पूर्णांक आठ, परभणी ४२ पूर्णांक सात, बीड ४१ पूर्णांक पाच तर धाराशिव इथं ४१ अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नांदेड इथं आज सकाळी एका इलेक्ट्रिक स्कुटीला अचानक आग लागली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.

****

No comments:

Post a Comment