Saturday, 16 May 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.05.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 May 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ मे २०२ सकाळी .०० वाजता

****

आज राष्ट्रीय डेंग्यू दिन. यानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधासाठी जागरूक राहण्याचे आणि स्वच्छ तसंच सुरक्षित पर्यावरण राखण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे. सरकार अधिक चांगली देखरेख, व्यापक चाचण्या, सुधारित उपचार सुविधा आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून डेंग्यू नियंत्रण प्रयत्न अधिक मजबूत करत आहे, असं सामाजिक माध्यमावरील आपल्या संदेशात नड्डा यांनी नमूद केलं. यंदाच्या "डेंग्यू नियंत्रणासाठी सामुदायिक भागीदारी: तपासणी करा, स्वच्छता राखा आणि झाकून ठेवा" या संकल्पनेचा उल्लेख करत, नड्डा यांनी डेंग्यूविरुद्धच्या लढ्यात लोकसहभागाच्या महत्त्वावर विशेष भर दिला.

****

पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं काल दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेतली. ‘युएई’ वर झालेल्या हल्ल्यांबद्दल पंतप्रधानांनी यावेळी शोक व्यक्त केला. यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात सहा अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा ‘युएई’नं यावेळी केली. भारतात तीन कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांतल्या कंपन्यांमध्ये यावेळी सामंजस्य करारही झाला. पंतप्रधान मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलैंड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांची भेट घेणार आहेत

****

‘‘पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो” अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री डॉ. सय्यद अब्बास अराघची यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केली.

इराणसंदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे मात्र तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सशक्तीकरण समितीचं गठन केलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसद सदस्य डॉक्टर दग्गुबाती पुरंदेश्वरी यांना समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे, या समितीत लोकसभेच्या १८ तर राज्यसभेच्या १० सदस्यांचा समावेश आहे. यात लोकसभेच्या हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी तर राज्यसभेच्या सुधा मूर्ती, पी. टी. उषा आणि स्वाती मालीवाल आदी सदस्यांचा समावेश आहे.

****

विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, मात्र वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी काल दिली आहे.

याशिवाय, आधार कार्ड आणि ‘युडीआयडी कार्ड’ मधील माहितीतील तफावत दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. तहसीलदारांनी लाभार्थ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करून बनावट आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचे निर्देशही दिले आले आहेत.

****

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ मिळत असून शासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत होत असल्याचं नांदेडच्या महापौर कविता मुळे यांनी म्हटलं आहे.

नांदेड तहसील कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात काल त्या बोलत होत्या. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांची कामे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी तसंच ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत योजनांची माहिती आणि प्रत्यक्ष लाभ पोहोचवण्यासाठी महसूल विभाग आणि इतर शासकीय यंत्रणा कार्यरत असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टीईटी येत्या २१ जूनऐवजी २८ जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात ‘एनटीए’ कडून २१ जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्याने केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या ‘महा-टीईटी’ परीक्षेच्या पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्रांचं वाटप परवा १८ मे ते ८ जून या कालावधीत केलं जाणार आहे. परीक्षेचा अंतिम निकाल यंदा तीन फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.msce pune.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला होता. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावं, असं आवाहन शिक्षन विभागाने केलं आहे.

****

No comments:

Post a Comment