Sunday, 17 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 17 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीडन मध्ये दाखल, चोल कालीन अण्णाईमंगलम ताम्रपट नेदरलँडकडून भारताकडे सुपूर्द

·      नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरसोबत नांदेडमध्येही, मुलीसाठी पाच लाखात पेपर खरेदी केल्याचा दाम्पत्यावर आरोप

·      येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज

आणि

·      थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपविजेतेपद

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाच देशांच्या दौऱ्यावर असून, ते आज सायंकाळी स्वीडन इथं पोहोचले आहेत. इथल्या विमानतळावर स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरशॉन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदी गुटेनबर्ग इथं स्वीडीश पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपीयन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर मोदी नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. त्याआधी पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरात आणि नेदरलँडला भेट देऊन तेथील राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान महत्त्वाचे व्यापारी करार झाले. नेदरलँड भेटी दरम्यान लायडन विद्यापीठात जतन केलेला चोल राजांच्या काळातील अण्णाईमंगलम ताम्रपट मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. लायडन विद्यापाठीत हा ताम्रपट तीन शतके जतन करण्यात आला होता. भारत- युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे.

****

चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने १३ एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क ६ टक्क्यावरून १५ टक्क्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

****

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी केली जात आहे. एका दाम्पत्यानं, आपल्या मुलीसाठी पाच लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असल्यावरून, नांदेड शहरातील विद्युतनगर इथं सीबीआयच्या पथकानं ही चौकशी केली. अधिक चौकशीसाठी या दांपत्याला मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. त्याचवेळी नांदेडमधील आणखी काही पालकांची चौकशी होणार असून, नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी याप्रकरणी अटक केलेले लातूरचे निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्यासह मनिषा मांढरे यांना न्यायालयाने १४ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

****

सर्वोच्च न्यायालयात, मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या ३३ मध्ये वाढ करून आता ३७ करण्यात आली आहे. अर्थात आता एकूण न्यायाधीशांची संख्या ३८ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या अध्यादेश सुधारणा - २०२६  अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. यासंदर्भातील १९५६च्या अध्यादेशातली ही सुधारणा आहे.

****

आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ मे रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १३४ वा भाग असणार आहे.

या कार्यक्रमासाठी, नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक  १८०० -११ – ७८००  यावर  आपले  विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच, नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरम च्या  माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह १९२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर एस.एम.एस.वर  प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत.

****

ऐतिहासिक वारसा जपणे आणि नागरिकांमध्ये शहराच्या संस्कृतीबद्दल जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने आज 'बेगमपुरा हेरिटेज वॉक' वारसा सफरमध्ये आज २५० नागरिकांनी सहभाग नोंदवला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इन्टॅक इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

****

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी वतीने महाराष्ट्र गट - ब संयुक्त मुख्य परीक्षा आज पार पडली. सकाळी ११ ते १२ या सत्रात परीक्षा घेतली. दुपारी ३ ते ४ या दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. शहरातील सहा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. एमपीएससी परीक्षेसाठी एकूण १ हजार ७७६ उमेदवारांनी ही परीक्षा दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं राज्य राखीव पोलीस दल, पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा आज सकाळी शहरातील चार केंद्रांवर पार पडली. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी ८ हजार ५०० उमेदवारांनी नोंदणी केली होती. एमआयटी कॉलेज, श्रेयस कॉलेज, चाटे स्कूल आणि एंजल कीड स्कूल या चार केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

****

छत्रपती संभाजी महाराज यांचं 'बुधभूषण' ग्रंथ रचतानाचं विश्वातील पहिलं १० फूट उंचीचं पूर्णाकृती कांस्य शिल्प महाराष्ट्रात प्रथमच पुणे महानगरपालिकेच्यावतीनं, शिवाजीनगर इथल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पासह, त्यांनी रचलेले ९ निवडक श्लोक मराठी व इंग्रजी अर्थासह तसंच, बुधभूषण ग्रंथाची संक्षिप्त माहिती देणाऱ्या प्रस्तावनेसह इथं कोरण्यात आलेले आहेत. अतिशय कठीण कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व जगासमोर आणण्यासाठी पुणे महानगर पालिकेच्यावतीनं हे देदीप्यमान शिल्प उभारण्यात आलं आहे.

****

दरम्यान, पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या जागेवर सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून उभारलेल्या कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

नांदेड ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला ३० लाख ६३ हजार ६५० रुपयांचा गुटखा आणि सुगंधित पान मसाला आज जप्त केला आहे. पोलिसांनी सापळा रचून कांदा मार्केट इथं हा सर्व गुटखा जप्त केला. याप्रकरणी रईस मोहम्मद अमीर मोहम्मद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

****

राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाईचे संकेत महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिले. राज्यात चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही. महाराष्ट्रभर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी मित्तल यांनी केलेल्या कारवाईचंही त्यांनी कौतुक केलं. नीट परीक्षा प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी पेपरफोडीच्या प्रकाराचा तीव्र निषेध केला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीनं कारवाई केली असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.

****

थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा २१ - १२, २५- २३ असा पराभव केला. याआधी भारताच्या साईराज आणि चिराग या जोडीनं उपान्त्य सामन्यात मलेशियाच्या जोडीला पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यातला सामना धरमशाला इथं सुरू आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सायंकाळी साडेसातला दिल्ल्ली इथं खेळला जाणार आहे.

****

टेनिसमधे पोर्तुगाल एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बांठियानं बुल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्तुगालचा टियागो परेरा आणि स्पेनचा डेविड वेगा हर्नाडेझ या जोडीला त्यांनी ६-३, ६-२ असं सरळ सेटमधे हरवलं.

****

हवामान

येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा या भागांत जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहील असा अंदाज आहे. विदर्भात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीपसमूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. या महिन्याच्या २६ तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हा पाऊस दाखल होईल.

****

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला उष्णतेच्या लाटेचा जोर आजही कायम आहे.

****

No comments:

Post a Comment