Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 24 May
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २४ मे
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यातील मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये
रूपांतर करणं म्हणजे फक्त आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून, गुणवत्तापूर्ण
उपचार,
संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेने
टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे, असं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते मुंबई इथं बोलत होते.
महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूरच्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचा यात समावेश
असून यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ
आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार
असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल सांगितलं. या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य
क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनालाही चालना मिळणार आहे.
मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर
करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत
बाराव्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे. ज्या ठिकाणी
आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत, अशा प्रादेशिक
रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास
प्राधान्य देण्यात येत आहे.
****
राज्यातल्या एकल महिलांच्या प्रश्नांचा सर्वंकष विचार करून
त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा, यासाठी
एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बाल विकास राज्यमंत्री
मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. राज्यातल्या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित,
अविवाहित तसंच एकल महिलांच्या समस्या शासन स्तरावर
प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती, यासाठी महिला आणि बाल विकास विभागाने मसुदा समिती गठीत केली असल्याचं बोर्डीकर
यांनी सांगितलं
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे
फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १२ वी
परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. उद्या सोमवार पासून विद्यार्थ्यांना
गुणपत्रिका,
प्रमाणपत्रे आणि इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येईल, असं मंडळाने कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय व रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि राज्याचे सेवानिवृत्त वैद्यकीय
शिक्षण संचालक डॉ. व. ल. देशपांडे यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
****
गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी
नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात
पोलिसांना यश आलं आहे. 'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत,
आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरुन, पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली.
****
भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्याच्या कोदूर्लीच्या जंगलात
लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या ५५ वर्षीय इसमावर वाघाने हल्ला करून त्याला काल जागीच
ठार केले. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला.
****
देशात लागू झालेल्या नवीन चार कामगार संहिताबाबत महाराष्ट्र
शासनाने संबंधित नियमांचा मसुदा अधिसूचना जारी करून प्रसिद्ध केला आहे. या
मसुद्यावर संबंधित घटकांनी आपल्या हरकती आणि सूचना येत्या
१२ जूनपर्यंत नोंदवाव्यात, असं
आवाहन छत्रपती संभाजीनगरचे कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांनी केलं आहे.
****
बिहारच्या रांचीमध्ये आयोजित फेडरेशन चषक एथलेटिक्स
स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत
राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण पदक जिंकलं आहे.आणि याद्वारे तो आगामी ग्लासगो इथं
आयोजित -राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. गुरिंदरवीर यानं १० पुर्णांक
शुन्य नऊ सेकंद याप्रमाणे धावत हे यश मिळवलं.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत, आज
पहिला सामना दुपारी साडेतीन वाजता मुंबई इंडीयन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात
मुंबई इथं होणार आहे. तर, दुसर सामना सायंकाळी
साडेसात वाजता कोलकाता नाईट राहडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात कोलकाता इथं
होणार आहे. स्पर्धेत काल लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात, पंजाब
किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंटस संघावर सात गडी, १२
चेंडू राखून १९६ धावांचं दिलेलं लक्ष सहज पार करत विजय मिळवला.
****
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह
पाऊस तर मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी
उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment