Wednesday, 27 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 May 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ मे २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

·      मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अवैध नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

·      हायड्रोजनवर धावणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

·      आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमाचं यंदा कोलकाता इथं आयोजन

आणि

·      नीट पेपरफुटी प्रकरणी लातूर तसंच पुण्यातून आणखी दोघांना अटक

****

देशभरात अनेक भागात तापमानात वाढ झाली असून, वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अशा तीव्र उन्हामध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवावी, बाहेर जातांना पिण्याचं पाणी सोबत ठेवावं, तहानलेल्या व्यक्तींसाठी पेयजलाची व्यवस्था करावी, असा सल्ला त्यांनी सामाजिक माध्यमांवरील संदेशात दिला आहे. दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणं टाळावं आणि शक्य तितकी विश्रांती घ्यावी, प्राणी तसंच पक्ष्यांसाठी पाण्याने एक भांडं भरून ठेवावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. लहान मुले, वृद्ध आणि उन्हात काम करणाऱ्या लोकांना सर्वाधिक त्रास होतो. अशा वेळी सतर्कता आणि काळजी एखाद्याचा जीव वाचवू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.

****

निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण एसआयआर प्रक्रिया अवैध ठरवता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० च्या कलम ३२४ आणि त्याअंतर्गत नियमांनुसार निवडणूक आयोगाला एसआयआर आयोजित करण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. बिहारमध्ये एसआयआर आयोजित करण्यासाठी निवडणूक आयोगाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या रिट याचिकांवर सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठाने, हा निकाल दिला. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांचे उद्दिष्ट साध्य करणं, हाच एसआयआर प्रक्रियेचा उद्देश आहे असं मत न्यायालयानं व्यक्त केलं.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसीच्या  इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना किमान दोन भारतीय भाषांसह तीन भाषा शिकणं अनिवार्य करणाऱ्या धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार, मंडळ आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद -NCERT यांना दोन आठवड्यांच्या आत प्रतिसाद देण्यासाठी नोटीस बजावली आहे.

 

दरम्यान, सीबीएसईची पेमेंट प्रणाली अधिक मजबूत, विश्वासार्ह आणि विद्यार्थीस्नेही असावी अशा सूचना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्या आहेत. परीक्षेनंतरच्या सेवा आणि विविध शुल्क आधारित प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक सुधारणांची सूचना त्यांनी केली.

****

पंढरपूर वारी आणि अतिवृष्टीच्या कालावधीत SIR, अर्थात  मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबवू नका, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 

SIR चा दुसरा टप्पा ३० जून ते २९ जुलै दरम्यान होणार आहे. याच कालावधीमध्ये आषाढी वारी असून राज्यातले लाखो वारकरी त्यात सहभागी होत असल्यानं या काळात ते गावाबाहेर असतील, त्यामुळे त्यांची नावं वगळली जाण्याची भीती आहे. तसंच जुलै महिन्यात महामुंबई परिसर, कोकण, पुणे, सातारा भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. या सर्वांचा विचार करुन एसआयआर कार्यक्रम महिनाभर पुढं ढकलावा, असं सपकाळ यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

****

एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी येत्या १ जूनपासून पुढील तीन महिने  देशांतर्गत उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया जवळपास १५ टक्क्यांपर्यंत तर इंडिगो ५ ते ७ टक्के कपात करणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

हायड्रोजनवर धावणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. ही १० डब्यांची डेमू ट्रेन हरियाणा राज्यातील जींद आणि सोनीपत या मार्गावर धावणार आहे. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही ट्रेन पर्यावरणपूरक आणि हरित वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. ही ट्रेन ताशी जास्तीत जास्त ७५ किलोमीटर वेगाने धावेल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

****

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने आज सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधावाटप, वाहतूक आणि व्यवस्थापन सहाय्यासाठी असलेल्या 'सार्थक-पीडीएस' ही योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली. या योजनेसाठी २५ हजार ५३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्नधान्याच्या आंतरराज्यीय वाहतूक आणि हाताळणी खर्चासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय सहाय्याच्या नियमांमध्ये समितीने सुधारणा केली आहे.

****

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर इथं विविध कार्यक्रमांमधून पंडित नेहरुंना अभिवादन करण्यात आलं.

****

देशाच्या काही भागात ईद उल अझा म्हणजेच बकरीदचा सण आज साजरा करण्यात आला. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

२१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज खजुराहो इथं ही माहिती दिली.आरोग्यदायी वृद्धत्वासाठी योगही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगत त्यांनी, निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योग दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन केलं. योग पार्क उपक्रम, ‘योग संगमपोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी-शर्ट डिझाइनचंही अनावरण करण्यात आलं.

****

नीट युजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं आज आणखी दोन जणांना अटक केली. लातूर इथले डॉ. मनोज शिरुरे याला आज चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्र पेपरमधले प्रश्न जाणून घेतल्याचा शिरुरे याच्यावर आरोप आहे. पुण्यातल्या डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी इथले रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक तेजस शहा याला देखील सीबीआयने आज अटक केली. त्याने आरोपी मनिषा हवालदार हिच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवली होती. याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या आता १३ झाली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दर वाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या क्रांती चौक भागात कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर तसेच शहर जिल्हाध्यक्ष सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

****

पुण्याच्या मावळ तालुक्यात कान्हे फाटा इथं जनगणनेच्या कामावर जात असताना एका शिक्षिकेचा अपघाती मृत्यू झाला. दीपिका तांबे असं या शिक्षिकेचं नाव आहे. जनगणना कर्तव्यावर असतांना शिक्षकाचा मृत्यू होण्याची राज्यातली आतापर्यंतही ही चौथी घटना आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील तोंडार पाटीजवळ एका दाळ मिलच्या गोदामाला आज  भीषण आग लागली. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचं आमच्या वार्तहरानं कळवलं आहे. दरम्यान, आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

****

मुंबईमधे क्लॅन्डेस्टाईन मेफेड्रोनया अंमली पदार्थाची बेकायदा निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं पर्दाफाश केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ५० कोटी ७४ लाख रुपये किंमतीचे १४ किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ या कारवाईत जप्त  केले असून, तीन जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसही पोलिसांनी हस्तगत केली. या प्रकरणी एनडीपीएसआणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथले गिर्यारोहक दत्ता रामदास सरोदे आणि विनोद विभुते यांनी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राष्ट्रध्वज फडकावला. उणे तापमान तसंच प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी ही यशस्वी कामगिरी बजावली. दत्ता सरोदे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत कार्यरत असून त्यांनी यापूर्वी दक्षिण अफ्रिकेतील सर्वोच्च माउंट किलीमांजारो तसंच युरोप खंडातील सर्वोच्च माउंट एल्ब्रस ह्या शिखरावर तिरंगा फडकवला आहे.

****

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली. महिलांच्या गटात युवा खेळाडू दिव्या देशमुख हिने कोनेरू हंपी हिचा आर्मागेडन फेरीत पराभव केला. पुरुषांच्या गटात जागतिक विजेता डी. गुकेश याने अमेरिकेच्या वेस्ली सो याच्याशी क्लासिकल फेरीत ११६ चालींपर्यंत कडवी झुंज दिली. मात्र टायब्रेकमध्ये वेस्ली सो याने गुकेशवर विजय मिळवला. दुसरीकडे, फ्रान्सच्या अलिरेझा फिरोझा याने भारताच्या आर. प्रज्ञानंद याचा क्लासिकल फेरीत पराभव केला.

****

राज्यात आज चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४१ पूर्णांक नऊ दशांश सेल्सियस, छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक आठ, तर धाराशिव इथं ३८ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस उष्णतेचा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट तर मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment