Thursday, 28 May 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.05.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 May 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ मे २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      'सार्थक-पीडीएस' योजना पुढची पाच वर्षे सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

·      कांद्याच्या हमीभावाबद्दल येत्या दहा दिवसांत तोडगा-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया अवैध नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

·      हायड्रोजनवर धावणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची परवानगी 

·      ईद-उल-अजहा बकरीद निमित्त देशभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन

आणि

·      नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून आणखी दोन जणांना अटक

****

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शिधावाटप, वाहतूक आणि व्यवस्थापन सहाय्यासाठी असलेली, 'सार्थक-पीडीएस' ही योजना पुढची पाच वर्षे सुरू ठेवण्यास, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने काल मंजुरी दिली. या योजनेसाठी २५ हजार ५३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

अन्नधान्याच्या आंतरराज्यीय वाहतूक आणि हाताळणी खर्चासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या जाणाऱ्या केंद्रीय सहाय्याच्या नियमांमध्ये समितीने सुधारणा केली आहे.

****

देशभरात अनेक भागात तापमानात वाढ झाली असून, वाढत्या उन्हात नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तीव्र उन्हामध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवावी, बाहेर जातांना पिण्याचं पाणी सोबत ठेवावं, तहानलेल्या व्यक्तींसाठी पेयजलाची व्यवस्था करावी, प्राणी तसंच पक्ष्यांसाठी पाण्याने एक भांडं भरून ठेवावं,असा सल्ला पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमांवरील संदेशात दिला आहे.

****

कांद्याच्या हमीभावाबद्दल येत्या दहा दिवसांत तोडगा निघेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा तसंच कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत कांदा प्रश्नासहीत विविध प्रश्नांबाबत काल नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर मुख्यमंत्री वार्ताहरांशी बोलत होते. कांद्याचे दर स्थिर राहावेत याकरता राज्य सरकारने सुचवलेल्या उपाययोजनांबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

निवडणूक आयोगाची मतदार यादी पुनरीक्षण – एसआयआर प्रक्रिया अवैध ठरवता येणार नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० च्या कलम ३२४ आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांनुसार निवडणूक आयोगाला एसआयआर आयोजित करण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे. बिहारमध्ये एसआयआर संदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठाने, हा निकाल दिला.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसीच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना किमान दोन भारतीय भाषांसह तीन भाषा शिकणं अनिवार्य करणाऱ्या धोरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, मंडळ आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद -NCERT यांना दोन आठवड्यांच्या आत प्रतिसाद देण्यासाठी नोटीस बजावली आहे.

****

हायड्रोजनवर धावणाऱ्या देशातल्या पहिल्या रेल्वेला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली. ही १० डब्यांची डेमू रेल्वे हरियाणा राज्यातल्या जींद ते सोनीपत या मार्गावर धावणार आहे. हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ही रेल्वे पर्यावरणपूरक आणि हरित वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. ही रेल्वे ताशी जास्तीत जास्त ७५ किलोमीटर वेगाने धावेल, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

****

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून पंडित जवाहरलाल नेहरू यांना आदरांजली वाहिली.

****

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक इथं आज सकाळी साडे सात वाजता अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे निर्मित"स्वरराज- वन्देमातरम" हा सांगितिक अभिवादनपर कार्यक्रमही सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सांस्कृतिक सभागृहात रात्री आठ वाजता होणार आहे.

****

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६, आणि नागपूरच्या एका जागेसाठीची पोटनिवडणूक, अशा सर्व १७ जागा महाविकास आघाडी लढवणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. या निवडणुकीसाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा काल मुंबईत झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. दोन दिवसात पुन्हा एक बैठक घेऊ आणि सर्वसंमतीनं जागा वाटपाचा निर्णय जाहीर करु, असं सपकाळ यांनी सांगितलं.

****

ईद–उल–अजहा म्हणजेच बकरीदचा सण आज श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो, असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. देशाच्या काही भागांमध्ये काल बकरी ईद साजरी करण्यात आली. यानिमित्तानं विशेष नमाज पठणासह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

नीट युजी पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग – सीबीआयनं काल आणखी दोन जणांना अटक केली. लातूर इथले डॉ. मनोज शिरुरे याला चौकशीनंतर काल ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी अटकेत असलेले पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्राचे प्रश्न जाणून घेतल्याचा शिरुरे याच्यावर आरोप आहे.

पुण्यातल्या डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी इथले रसायनशास्त्र विषयाचे शिक्षक तेजस शहा याला देखील सीबीआयने काल अटक केली. त्याने आरोपी मनिषा हवालदार हिच्याकडून प्रश्नपत्रिका मिळवली होती. याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. 

****

केंद्र सरकारला नुकतीच १२ वर्ष पूर्ण झाली. या काळात कर रचनेत सरकारने केलेल्या आमुलाग्र बदलामुळे देशवासियांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येत आहे. यामुळे करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं, माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीशी यासंदर्भात बोलतांना जोशी म्हणाले… 

बाईट- माजी आमदार श्रीकांत जोशी

****

छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने इंधन दर वाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. शहरातल्या क्रांती चौक भागात कमिटीचे अध्यक्ष किरण पाटील डोणगावकर तसंच शहर जिल्हाध्यक्ष सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथले गिर्यारोहक दत्ता सरोदे आणि विनोद विभुते यांनी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राष्ट्रध्वज फडकावला. दत्ता सरोदे हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत कार्यरत असून, त्यांनी यापूर्वी दक्षिण अफ्रिकेतलं सर्वोच्च माउंट किलीमांजारो तसंच युरोप खंडातलं सर्वोच्च माउंट एल्ब्रस या शिखरावर तिरंगा फडकवला आहे.

****

नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली. महिलांच्या गटात युवा खेळाडू दिव्या देशमुख हिने कोनेरू हंपी हिचा आर्मागेडन फेरीत पराभव केला. पुरुषांच्या गटात जागतिक विजेता डी. गुकेश याचा अमेरिकेच्या वेस्ली सो याने तर आर. प्रज्ञानंद याचा फ्रान्सच्या अलिरेझा फिरोझा याने पराभव केला.

****

सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत भारताच्या एच एस प्रणोय तसंच लक्ष्य सेन या दोघांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत के श्रीकांत तर महिला एकेरीत मालविका बनसोड या दोघांना पराभवाचा सामना करावा लागला.

****

इंडियन प्रिमियर लीग – आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या दुसऱ्या प्लेऑफ सामन्यात राजस्थानच्या संघाने सनरायजर्स हैदराबादचा ४७ धावांनी पराभव केला. राजस्थान कडून वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूत ९७ धावा केल्या. तो प्लेयर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. वैभवने आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक चौथ्यांदा, दहाहून अधिक षटकार मारण्याच्या ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

या स्पर्धेत दुसरा क्वालिफायर सामना उद्या राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. या सामन्यातला विजेता संघ येत्या रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध अंतिम सामन्यात खेळणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात काही भागात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. सेनगाव तालुक्यात सवना, कडोळी परिसरात गारपीटही झाली. गोरेगाव ते कडोळीदरम्यानच्या ओढ्याला पूर आल्याने या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. गारपीटीमुळे केळी, आंब्यासह फळबागांचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात चार गावात सहा टँकरच्या मदतीने दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. यासोबतच २४ गावातल्या ४१ खाजगी विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित

केल्या आहेत.

****

राज्यात काल चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक ४६ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी ४१ पूर्णांक नऊ, छत्रपती संभाजीनगर इथं ३९ पूर्णांक आठ, तर धाराशिव इथं ३८ पूर्णांक सहा दशांश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं.

विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस उष्णतेचा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट तर मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे

****

No comments:

Post a Comment