Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 June
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ७ जून
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक
विकासाला अधिक चालना देण्यासाठी विविध उपाययोजना आणि कल्पनांबाबत पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी काल 'पंतप्रधान-आर्थिक सल्लागार परिषदे'च्या सदस्यांसोबत बैठक घेतली. 'जीवन
सुलभता' आणि 'व्यवसाय सुलभता' सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांबाबत यावेळी चर्चा
झाली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी
आपलं विश्लेषण सादर केलं.
****
आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या भागात होणारे आर्थिक व्यवहार,
इमारतींचं बांधकाम तसंच मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं आवश्यक
असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. शहा यांनी ईशान्येकडील सीमावर्ती
भागाच्या सुरक्षिततेसंदर्भात त्रिपुरातील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात घेतलेल्या
बैठकीत हे निर्देश दिले. सीमा भागात गेल्या पाच वर्षातील जमिनींच्या नोंदी तपासाव्यात
असे निर्देशही शहा यांनी या बैठकीत दिले.
****
घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडरमागे
29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजीची किंमत आजपासून
913 रुपयांवरून वाढून 942 रुपये झाली आहे.
****
राज्यात पूर्वमोसमी वादळी पावसामुळं तब्बल २४ जिल्ह्यात
जवळपास दीड लाख एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे
तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल
प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं
आहे. भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून
शेतकऱ्यांना धीर दिला.
****
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील
नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधला संवाद साधला आणि लवकरात लवकर
मदतीचं आश्वासन दिलं.
****
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी
विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी
घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून
तळकोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण
भारतातील संपूर्ण केरळ आणि तमिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या
दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा
टीईटी २८ जून रोजी होणार आहे. जिल्ह्यातील २९ हजार ६३१ उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी
केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ५० शाळांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात
आली असून, ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेनं हैदराबाद–जयपूर ही विशेष साप्ताहिक गाडी नियमित
करण्यास मान्यता दिली आहे. ही गाडी नांदेड, पूर्णा, अकोला, खांडवा, उज्जैन, अजमेर मार्गे
धावणार आहे.
****
मॉरीशस इथं आयोजित सातव्या अक्षरविश्व मराठी साहित्य
संमेलनाचं अध्यक्षपद नांदेड इथले ज्येष्ठ कवी देवीदास फुलारी भूषवणार आहेत. मॉरीशस
इथं येत्या २३ ते २९ जून दरम्यान हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी
प्रक्रियेला उद्या सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाशिक जिल्हाधिकारी
कार्यालयात याबाबत नुकतीच बैठक झाली होती. दरम्यान, ‘नाफेड’आणि ‘एनसीसीएफ’मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे
पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ७२ तासांच्या आत जमा करण्याचही सांगण्यात आलं आहे.
****
बदलत्या जागतिक परिस्थितीत तरुण पिढीत नेतृत्त्व, नवप्रवर्तक,
उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते आदी भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता असून ही क्षमता प्रत्यक्षात
आणण्यासाठी विद्यापीठं, उद्योग आणि नवोद्योजकांना साथ, प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये
अधिक भागीदारी होण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केलं
आहे. काल पुणे इथं झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
****
राज्यात छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या केवळ दोन
जिल्ह्यात क्यूआर कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रायोगिक तत्वावर सुरुवात झाली आहे.
या डिजिटल प्रणालीमुळं शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही.
****
न्यू चंदीगड इथं भारत-अफगाणिस्तान दरम्यान खेळल्या जात
असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात, आज दुसऱ्या दिवशी सध्याच्या पहिल्या सत्रात भारताच्या
चार बाद ४३३ धावा झाल्या आहेत. भारतानं कालच्या तीन बाद ३६८ धावांवरून खेळाला सुरुवात
केली. कर्णधार शुभमन गिल आज १२६ धावांवर बाद झाल्यानं ध्रुव जुरेल ऋषभ पंत सोबत फलंदाजी
करत आहे.
****
No comments:
Post a Comment