Wednesday, 10 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 10.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता; प्रशासकीय विभागांची संख्या आता ४५

·      नीट यूजी पुनर्परिक्षेबाबत सर्व उपाय सुनिश्चित केल्याची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून ग्वाही

·      प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय

·      प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला दहा वर्षं पूर्ण, विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन

आणि

·      कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज

****

प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यास, राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल, तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे.

राज्यात नवीन महाविद्यालयांना, नवीन विद्याशाखांना, नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी, यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्याला या बैठकीत मान्यता देण्यात आली.

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७ मधल्या तरतुदींशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७ तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करण्यालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करण्याला, तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करण्यालाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

****

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल इयत्ता पहिली ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन केलं. मुंबईत मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री दादा भुसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

येत्या २१ तारखेला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परिक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या तयारीसह नंतरच्या सर्व प्रक्रियांपर्यंत संपूर्ण गोपनीयता बाळगत आवश्यक ते सर्व उपाय सुनिश्चित केले असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. राष्ट्रीय चाचणी संस्था- एनटीएच्या मुख्यालयाला भेट देऊन या परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते. परीक्षेचं साहित्य परिक्षा केंद्रांपर्यंत व्यवस्थितपणे आणि वेळेवर पोहचण्याची दक्षता सरकार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात राज्य सरकारांना याबाबत सूचना दिल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले…

बाईट- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

दरम्यान, नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनिषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अवेन्यू न्यायालयानं फेटाळला. याचप्रकरणी, १५ दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या २१ तारखेला होणारी नीटची फेरपरीक्षा देण्यासाठी, आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे.

****

नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला माजी मंत्री फौजिया खान यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०चं उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एक जुलैपासून इयत्ता नववीसाठी तीन भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईने जारी केलं असून, यातल्या दोन भाषा भारतीय असल्या पाहिजेत असं म्हटलं आहे.

****

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रत्येक जिल्ह्यात सीईटी सेलचं विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्यात येणार असून, सीईटी प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती यासंदर्भात विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन आता जिल्हास्तरावरच मिळणार आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रं सुरू करण्यात येत असून, मुंबईत तीन तर पुणे आणि नागपूर इथं प्रत्येकी दोन केंद्रं असतील. यापैकी २६ केंद्रांचं काम पूर्ण झालं असून, सहा केंद्रं अंतिम टप्प्यात आहेत आणि उर्वरित आठ केंद्रंही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

****

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला दहा वर्षं पूर्ण झाली. या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे "१०वर्षे – एक दशकाची काळजी" हा राष्ट्रीय कार्यक्रम कालपासून सुरू झाला. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रं, ग्रामीण रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालयं तसंच जिल्हा रुग्णालय स्तरावर विशेष प्रसूतीपूर्व तपासणी शिबीरं घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान दोन हजार ६३७ गर्भवतींची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या निदानानुसार आवश्यक औषधोपचार, समुपदेशन तसंच उच्चस्तरीय आरोग्य संस्थांकडे संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

धाराशिव जिल्ह्यात तीन हजार ९४१ गर्भवतींची तपासणी करण्यात आली. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,

बाईट – देवीदास पाटील ,धाराशिव वार्ताहर

****

ग्रामीण भागात आजही शेतीसाठी बैलजोडीचा मोठा आधार असतो. मात्र ऐन हंगामात या बैलजोडीतला एक बैल आजारी पडला, किंवा दगावला, तर शेतकरी मोठ्या अडचणीत येतो.  लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातल्या बोंबळी इथले शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर अशीच परिस्थिती ओढावली. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दुसरा बैल खरेदी करणं शक्य नसल्यामुळे त्यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला औताला जुंपून शेतीची मशागत सुरू ठेवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत देवणीचे तहसिलदार सोमनाथ वाडकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले,

बाईट-सोमनाथ वाडकर

****

नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात चार जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६७ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यात ११, परभणीत नऊ, हिंगोलीत तीन, तर लातूर जिल्ह्यात सात गुन्ह्यांची नोंद झाली असून, ४८ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली.

****

हिंगोली जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं काल एका कारवाईत किडलेल्या सुपाऱ्यांचे तीन ट्रक पकडले. वारंगा फाटा इथं काल पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये ८८ हजार ५५४ किलो सुपारी आणि तीन ट्रक असा दोन कोटी ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात सुपारी विक्रेते आणि सुपारी खरेदीदार अशा आठ जणांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. यात कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. अर्ज बाद होण्यामागच्या कारणांची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात महा डिबिटी पोर्टलद्वारे सोयाबीन बियाणे मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. कृषी विभाग आणि महाबीज यांनी तत्काळ पात्र शेतकऱ्यांना बियाणाचं वाटप करावं अन्यथा आंदोलन करावं लागेल, असा इशारा बीडचे शेतकरी आंदोलक धनंजय गुंदेकर यांनी दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड तालुक्यात काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तालुक्यातल्या अंजनवती या गावात दोन शेतकऱ्यांची घरं पडली असून, इतर शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

****

हवामान

राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

****

No comments:

Post a Comment