Saturday, 13 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 13.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 13 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या ६ दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. भारताचे या दोन्ही देशांशी असलेले संबंध आणखी मजबूत करणं हा या दौऱ्याचा उद्देश आहे.

या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी उद्या फ्रान्सच्या नीस इथे फ्रान्सचे अध्यक्ष इमैनुएल मैक्रो यांच्यासमवेत बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान दोन्ही नेते भारत-फ्रांस द्विपक्षीय संबंधांच्या सर्व बाबींवर चर्चा करतील आणि भारत इनोवेट्स या कार्यक्रमाचं एकत्रितपणे उद्घाटन करतील. भारत, फ्रांस आणि इतर देशांच्या प्रमुख नवाचार स्टार्टअप तथा वेंचर कैपिटल फंड यांचा या कार्यक्रमात समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी, स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासोबत बातचीत करतील. यावेळी दोन्ही देशांच्या परस्परसंबंधावर चर्चा होईल. दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात १६ आणि १७ जून रोजी ते फ्रांसच्या एवियन मध्ये जी-7 शिखर सम्मेलनात सहभागी होतील. यादरम्यान ते जी-7 नेते आणि आमंत्रित सहभागी देश तसंच शिखर सम्मेलनात भाग घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत बातचीत करतील. या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात १८ जून रोजी पंतप्रधान मोदी युरोपच्या सर्वात मोठ्या प्रौद्योगिकी आणि स्टार्टअप कार्यक्रम, विवाटेक शिखर सम्मेलनात सहभागी होण्यासाठी पॅरिसला जातील.

****

विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून ते उत्पादन, अंतराळ, सेमीकंडक्टर्स आणि ड्रोन अशा विविध क्षेत्रांत भारताचे युवा आपली छाप पाडत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सामाजिक प्रसार माध्यमावर यासंबंधी एक संदेश जारी केला आहे. आज, भारत जगातील प्रमुख 'स्टार्टअप' केंद्रांपैकी एक बनला आहे आणि यातील अनेक यशाच्या कथा लहान शहरं आणि गावांमधील युवाशक्तीने साकारल्या आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला प्रचंड गौरव मिळवून दिल्याबद्दल तसंच भारत आणि जगाच भविष्य घडवणाऱ्या विविध क्षेत्रांत योगदान दिल्याबद्दल त्यांनी या संदेशात तरुणांचं कौतुक केलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशातील युवा खेळाडूंनी सातत्याने देशाचा गौरव वाढवला आहे, असंही मोदी म्हणाले.

एनडीए सरकार गेल्या १२ वर्षांपासून तरुणांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी सातत्याने काम करत आहे; या काळात भारतीय तरुणांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यामुळे त्यांना आपली स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यास मदत झाली आहे असंही पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे.

****

अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या त्यांनी सांगितलं. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.

****

प्रति क्विंटल १ हजार ६५० रुपये या दराने कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशाने केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी या प्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे काँग्रेसचे माजी आमदार किसनराव उर्फ कृष्णराव देशमुख यांचं काल निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. १९७८ ते १९८० या कालावधीत ते बार्शी मतदारसंघाचे आमदार होते.

****

तुर्कस्थानमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत, मिश्र दुहेरी गटात, भारताच्या बी. धीरज आणि कुमकुम मोहोड यांनी अंतिम फेरीत प्रवेश करत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. उद्या १४ जून रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत, या जोडीचा सामना कोरियाच्या किम जे देओक आणि ओह ये जिन यांच्याशी होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर विभागातील तेलबिया आणि कडधान्य पिकांचं काढणीनंतर होणारं नुकसान कमी करण्यासाठी तसंच स्थानिक पातळीवर मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध प्रक्रिया युनिट्स आणि गोदामांसाठी मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र आणि इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तातडीने सादर करावेत, असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे.

****

ऑपरेशन सिंदूर' दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींनी केलेली उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा सक्षम पुरावा आहे, असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबादमधील 'डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स'चा भाग असलेल्या 'संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा डी आर डी ओने विकसित केलेल्या अॅ डव्हान्स्ड वेपन सिस्टम कॉम्प्लेक्स'चं उद्घाटन करताना काल ते बोलत होते.

****

No comments:

Post a Comment