Thursday, 18 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधानपरिषदेच्या १७ पैकी ११ जागांसाठी आज मतदान; सहा जागांवर उमेदवरांची बिनविरोध निवड

·      महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा

·      भारत –ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या १५ जुलैपासून अंमलात येणार

·      राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल ४४ खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

आणि

·      महिला टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँड्सवर ९५ धावांनी विजय; पुरुषांच्या क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचा १७० धावांनी पराभव करत भारताची मालिकेत विजयी आघाडी

****

राज्यातल्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान होणार आहे. एकूण १७ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा–गडचिरोली–चंद्रपूर, अहिल्यानगर आणि ठाणे इथले महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तर औरंगाबाद–जालना, नांदेड, उस्मानाबाद–लातूर – बीड, परभणी–हिंगोली, नाशिक, नागपूर, अमरावती, भंडारा–गोंदिया, सोलापूर, जळगाव, आणि सांगली–सातारा या मतदारसंघात आज मतदान होत आहे. मतमोजणी येत्या २२ तारखेला होईल.

**

औरंगाबाद - जालना मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे आणि इसाक सांडू खान हे अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात एकूण १३ मतदान केंद्रांवर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदेचे सदस्य असलेले ६३७ मतदार मतदान करणार आहेत.

दरम्यान, या मतदानाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानापासून जिल्हाधिकारी कार्यालयालगतची डावी बाजू आज सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

**

नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे अमरनाथ राजूरकर, महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर आणि अपक्ष प्रशांत इंगोले यांच्यात लढत होत आहे. जिल्ह्यातल्या आठ मतदान केंद्रावर मतदान होणार असून, ४५२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

**

परभणी–हिंगोली विधान परिषद मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख, महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मतदानासाठी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या महसूल उपविभागांच्या ठिकाणी सात मतदान केंद्रं स्थापन करण्यात आली असून, ४६६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

**

उस्मानाबाद–लातूर–बीड मतदारसंघात लातूर जिल्ह्यातले एकूण ३६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

दरम्यान, नांदेड तसंच उस्मानाबाद – लातूर – बीड इथल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने आपले मतदार एकत्र लातूरमध्ये ठेवले आहेत. नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातले भाजप महायुतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती यांना लातूरमधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. या मतदारांना खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि खासदार अजित गोपछडे यांनी भेट देऊन संवाद साधला तसंच निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं.

****

महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते. जेएनपीटी आणि वाढवण या प्रमुख बंदरांना थेट विदर्भ आणि मराठवाड्याशी जोडणारे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्राचा ७५ टक्के भाग जोडला जाऊन लॉजिस्टिक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले:

बाईट – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

 

मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प वेगाने पूर्णत्वाकडे वाटचाल करत असून, पहिला टप्पा पुढील वर्षी सुरू होणार असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली. भारताने आता बुलेट ट्रेन उभारण्याची क्षमता विकसित केली असून, सात नव्या बुलेट ट्रेन मार्गिका विकसित केल्या जाणार आहेत. यामध्ये मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद या महत्त्वाच्या मार्गांचाही समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं.

तत्पूर्वी, पुणे–साईनगर शिर्डी नियमित एक्सप्रेस रेल्वे सेवेचा काल वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्यांनी आळंदी इथं मेगा कोच टर्मिनल उभारण्याची घोषणा केली.

पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटनही काल वैष्णव यांच्या हस्ते झालं.

****

भारत आणि ब्रिटन दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार येत्या १५ जुलैपासून अंमलात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळणार असून, भारतीय शेतकरी, कामगार, सूक्ष्म,लघू आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांसाठी अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत. हा करार ‘विकसित भारत २०४७’ या उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल असून, भारताच्या आर्थिक प्रगतीला मोठी गती मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये, अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. पक्षाचे काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत असल्याची चर्चा माध्यमांवर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिलं. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांची आज दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे.

****

राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल ४४ खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिली. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणावरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

****

केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बंभानिया यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातल्या विविध योजनांचा आढावा घेतला. मागील १२ वर्षांत केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या असून, त्या केवळ घोषणांपुरत्या मर्यादित न राहता त्यांची प्रभावी आणि यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असल्याचं बंभानिया यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या:

बाईट – केंद्रीय राज्यमंत्री निमुबेन बंभानिया

****

महिला टी–ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने नेदरलँड्सवर ९५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने २०९ धावांचं लक्ष्य दिलं, प्रत्यूत्तरादाखल आलेला नेदरलँड्सचा संघ ११४ धावांवर सर्वबाद झाला. स्मृति मंधानाने ७४, तर शेफाली वर्माने ५५ धावा केल्या.

****

पुरुषांच्या क्रिकेटमध्ये, दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा १७० धावांनी पराभव केला. यासोबतच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत दोन – शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

काल लखनौ इथं झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ४०२ धावा केल्या. शुभमन गीलने १५४, तर इशान किशनने १२५ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला अफगाणिस्तानचा संघ २३२ धावांवर सर्वबाद झाला. अर्शदीप सिंग आणि गुरनूर बराड यांनी प्रत्येकी तीन, तर प्रिन्स यादवने दोन गडी बाद केले.

****

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात नशा मुक्त सप्ताहाचं उद्घाटन काल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या हस्ते झालं. याअंतर्गत युवकांमध्ये नशामुक्तीसंदर्भात जागृती करण्यात येणार आहे.

****

परभणी इथलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्यात चिया या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारीकरणासाठी सामंजस्य करारकरण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत, उच्च उत्पादनक्षम आणि दर्जेदार चिया बियाणे उपलब्ध होणार आहे.

****

महिला आर्थिक विकास महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यातल्या ५२० स्वयं सहायता महिला बचत गटांना २५ कोटी रुपयांचं कर्जवाटप करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे. महामंडळाच्या काल झालेल्या कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली. बचत गटांचा कर्ज परतफेडीचा दर ९९ पूर्णांक आठ टक्के असल्याचं मंडळाचे जिल्हा समन्वय आधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी सांगितलं.

****

No comments:

Post a Comment