Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 June 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जून २०२६ सायंकाळी
६.१०
****
· विकसनशील देशांमध्ये आर्थिक लवचिकता निर्माण करणारी यंत्रणा विकसित करण्याची
गरज पंतप्रधानांकडून व्यक्त
· पुण्याजवळ जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं केंद्रीय
मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन
· राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल ४४ खटले मागे
घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय
·
विधानपरिषदेच्या १७ पैकी ११ जागांसाठी उद्या मतदान; पाच
जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड
आणि
· लखनौ इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानसमोर ४०३ धावांचं लक्ष्य
****
विकसनशील
देशांमध्ये आर्थिक लवचिकता निर्माण करणारी यंत्रणा विकसित करण्याची गरज पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. जी–7 शिखर परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ‘सर्वांसाठी
संतुलित, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना’ यावर आयोजित चर्चासत्रात
पंतप्रधानांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते. प्रत्यक्ष विकासातूनच लोकांचा
सर्वसमावेशक विकास आणि कल्याण साधलं जातं, यावर त्यांनी भर दिला. तसंच ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’
या तत्त्वांवर आधारित भारताच्या
विकासगाथेचाही त्यांनी उल्लेख केला. आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि पॅसिफिक द्वीपसमूहातील देशांना जोडणाऱ्या
संपर्क प्रकल्पांचा पंतप्रदान मोदी यांनी प्रस्ताव मांडला. तसंच,
‘इंटरनॅशनल मोबिलायझेशन पार्टनरशिप
फॉर ॲक्सलरेटिंग कनेक्टिव्हिटी अँड ट्रेड –
IMPACT’ स्थापन करण्याची सूचनाही केली.
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आज द्विपक्षीय
बैठक होणार आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांची
ही पहिली प्रत्यक्ष भेट आहे. या चर्चेत व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, गुंतवणूक, ऊर्जा
तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
****
भारत एक प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स
उत्पादन केंद्र म्हणून उदयास आला असून, जगातला सहावा सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातदार
देश बनला असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव
यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ
रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं
उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. उद्योगांना लागणारं कुशल
मनुष्यबळ, आधुनिक तंत्रज्ञान आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि
राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य
बदलणारा ठरेल असं वैष्णव म्हणाले -
बाईट – केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव
इलेक्ट्रॉनिक्स
उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं वैष्णव यांनी कौतुक केलं, तसंच एकाच दिवसात
सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई-पुणे हा देशातला सर्वात
प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण
बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण
रेल्वेमंत्र्यांशी बोललो असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
दरम्यान,
रेल्वे स्थानकावर पुणे - साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला
वैष्णव यांनी आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. महाराष्ट्रातल्या रेल्वे
विकासासाठी केंद्र सरकारकडून यंदा २३ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली
असून, मुंबई–पुणे
मार्गावरील क्षमता वाढवण्यासाठी तिसरी आणि चौथी रेल्वेमार्गिका उभारण्याचं काम
वेगाने सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गांमुळे पुणे–मुंबई प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत,
तर पुणे–हैदराबाद प्रवास सुमारे दोन तास आठ मिनिटांत पूर्ण
होऊ शकेल, असं वैष्णव यांनी नमूद केलं.
****
शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही
बंडखोर गटाला मान्यता देऊ नये, अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही
खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन
होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत, असं अरविंद सावंत आपल्या पत्रात
म्हणाले आहेत. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम
बिरला यांची भेट घेतली.
****
दरम्यान,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित
प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी
स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून
रोखण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
****
राज्यात
झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल ४४ खटले मागे घेण्याचा
निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात
आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशीष शेलार
यांनी दिली आहे. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि
दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा
प्रकरणावरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. एकूण १७ जागांसाठी होत
असलेल्या या निवडणुकीत रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग,
पुणे, यवतमाळ, चंद्रपूर
आणि अहिल्यानगर इथले
महायुतीचे उमेदवार बिनविरोध
निवडून आले.
सर्व
मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं
वितरण करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद - जालना
मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे
सुहास शिरसाट आणि
महाविकास आघाडीकडून शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात
थेट लढत होणार आहे.
या दोघांसह इसाक
सांडू खान हे तिसरे
अपक्ष उमेदवारही निवडणूक
रिंगणात आहेत.
छत्रपती
संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात एकूण १३ मतदान केंद्रांवर महापालिका,
जिल्हा परिषद,
नगरपरिषदेचे सदस्य असलेले ६३७
मतदार मतदान करणार आहेत.
दरम्यान,
या मतदानाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात विभागीय
आयुक्त यांच्या निवासस्थानासमोरील दर्ग्यापर्यंत जाणाऱ्या मार्गावरील जिल्हाधिकारी
कार्यालयालगतची डावी बाजू सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद राहणार असल्याचं
प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
****
नांदेड स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या
निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे उमेदवार अमरनाथ राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत
उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात थेट लढत होणार आहे. प्रशांत इंगोले हे
अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.
****
परभणी–हिंगोली विधान परिषद
मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे
चिरंजीव सुशील देशमुख, महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान, महाविकास
आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर हे
निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
****
महाराणा
प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून
अभिवादन केलं. लोकभवनातले अधिकारी, कर्मचारी, जवान यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थानी, तर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी
मंत्रालयात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
छत्रपती
संभाजीनगर इथं महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती
अनिल मकरिये यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
गोव्याचे
प्रसिद्ध नट, गायक आणि कलाकार पद्मश्री पंडीत प्रसाद सावकार यांचं आज वृद्धापकाळानं
निधन झालं, ते ९८ वर्षांचे होते. पणजीतील करंजाळे इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा
श्वास घेतला. शास्त्रीय संगीत गायक म्हणून नावाजलेले सावकार यांनी अनेक प्रसिद्ध नाटकांत
मुख्य गायक नटाची भूमिका साकारली. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी पणजी इथं अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत.
****
भारत
विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात लखनौ इथं सुरू असलेल्या एकदिवसीय
क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगणिस्तानला ४०३
धावांचं आव्हान दिलं आहे. प्रथम फलंदाजी करत भारताचा संघ केवळ एक चेंडू शिल्लक असताना
४०२ धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार शुभमन गिलने १५४ तर ईशान किशनने १२५ धावा केल्या.
****
आयसीसी
महिला टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार
आहे. भारतीय
प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल.
****
No comments:
Post a Comment