Monday, 22 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. विधानसभेच्या कामकाजाला वंदे मातरम आणि राज्यगीताने सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. अधिवेशनकाळात विधिमंडळ परिसरात प्रवेश देण्यासाठी यंदा लागू केलेल्या फेस रिकग्निनीशन यंत्रणेत अनेकांचे चेहरे ओळखण्यात अडचणी आल्यामुळे आजचा एक दिवस ओळ्खपत्राच्या आधारे पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात आला. याबाबत ज्यांच्या अडचणी आल्या त्यांनी आज फेस रिकग्निनीशनची प्रक्रिया पूर्ण करावी, उद्यापासून याद्वारेच प्रवेश दिला जाईल, असं नार्वेकर यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२६-२७ च्या पुरवणी मागण्या सादर केल्या. एल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्याने राज्याच्या विविध भागांत पाणीटंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं.

पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री आणि विधानसभेचे आमदार अनंतराव थोपटे, सभागृहाचे माजी सदस्य विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर-पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल विधासभा अध्यक्षांनी शोक प्रस्ताव मांडला. त्यावर सदस्यांनी दोन मिनिटं मौन पाळून तो मंजूर केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

विधानपरिषदेच्या कामकाजाची सुरुवात वंदे मातरम आणि राज्यगीताने झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले. २०२६ – २७ या वर्षासाठीच्या पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सादर केल्या. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली.   पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, विधानपरिषदेचे माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सभापतींनी मांडला आणि सदस्यांनी दोन मिनिटं मौन पाळून तो मंजूर केला. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

दरम्यान, अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.

****

विधान परिषद निवडणुकीच्या ११ जागांपैकी १० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत १७ पैकी सहा जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळं उरलेल्या ११ जागांचे निकाल हाती आले आहेत. यात औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणूकीत सुहास शिरसाठ, नांदेड इथं अमरनाथ राजूरकरउस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेत बसवराज पाटील, परभणी- हिंगोली मतदार संघात सईद खान, सांगली-सातारा इथून धैर्यशील कदम, सोलापूर इथून राजेंद्र राऊत, जळगाव इथं नंदकिशोर महाजन, नागपूर विधान परिषद पोटनिवडणूकीत डॉ. राजीव पोतदार, भंडारा-गोंदिया इथं अविनाश ब्राह्मणकर आणि अमरावतीत प्रवीण पोटे या महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर नाशिक इथं अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला.

****

राष्ट्रीय चाचणी संस्थेनं काल झालेल्या नीट-यूजी २०२६ पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. समाज माधमांवर फिरणाऱ्या एका व्हिडिओमध्ये टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करण्यात आला होता. काल घेण्यात आलेली परीक्षा कडक सुरक्षा व्यवस्थेत यशस्वीरित्या पार पडली असल्याचं संस्थेनं स्पष्ट केलं आहे. सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर संस्थांच्या सहकार्याने दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जात असून केवळ अधिकृत स्रोतांकडूनच माहिती मिळवावी, असं आवाहन एनटीएने विद्यार्थी आणि पालकांना केलं आहे.

****

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आज मंगोलिया आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. यावेळी ते मंगोलियाच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर ते दक्षिण कोरियाला इथं परराष्ट्र मंत्री चो ह्यून यांच्याशी चर्चा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान डॉ. जयशंकर दक्षिण कोरियातील जेजू इथं होणाऱ्या 'जेजू शांतता आणि समृद्धी मंच' या कार्यक्रमाला संबोधित करणार आहे.

****

नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापासून राज्यातल्या काही भागांत सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. आज सकाळी मुंबईतील काही भागांत जोरदार पाऊस झाला, तर ठाणे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी पावसानं हजेरी लावली. येत्या २४ तासांत राज्यातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, तर काही भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

****

No comments:

Post a Comment