Monday, 22 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

विधान परिषद निवडणुकीच्या ११ जागांपैकी १० जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत १७ पैकी सहा जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळं उरलेल्या ११ जागांचे निकाल हाती आले आहेत. यापैकी औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाठ ४५५ मतांसह विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश लोखंडे यांना १३४ मत मिळाली.

नांदेड विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अमरनाथ राजूरकर विजयी झाले. राजूरकर यांना ४५१ मतांपैकी ३३९ मत मिळाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा नागेश पाटील यांना ८४ मते  तर अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांना पाच मते मिळाली आहेत. या निवडणुकीत २३ मतं बाद झाली आहेत.

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बसवराज पाटील ७२१ मतांनी विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे महेश देशमुख यांना १२४ मतं मिळाली. तर १४ मतपत्रिका कोऱ्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

परभणी- हिंगोली मतदार संघात महायुतीचे उमेदवार सईद खान हे ८३ मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मतं मिळाली.

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे धैर्यशील कदम ५९३ मतांसह विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना २९२ मते मिळाली.

सोलापूर इथून भाजपचे राजेंद्र राऊत ३६५ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना ११८ मते मिळाली तर १३ मतं अवैध ठरली.

नागपूर इथून भारतीय जनता पक्षाचे डॉ. राजीव पोतदार विजयी झाले आहेत.

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांचा ३०२ मतांसह विजय झाला आहे. तर काँग्रेस समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना १५४ मत मिळाली.

अमरावती – भाजपचे प्रवीण पोटे ३९० मतांसह विजयी झाले तर काँग्रेसचे हर्षदीप देशमुख यांना एकही मत मिळाले नाही. वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली.

जळगाव इथं भाजपचे नंदकिशोर महाजन ५८२ मतांसह विजयी झाले त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शरद तायडे यांचा पराभव केला.

****

नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा पहिल्या फेरीतच ३५७ मतं मिळवत विजय झाला. एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा २४८ मते मिळवत मतदारसंघात बहुमत असूनही पराभव झाला. गोकुळ गीते यांनी प्रचारातून माघार घेतल्याचे जाहीर केले होते, मात्र मतपत्रिकेवर त्यांचं नाव कायम होतं, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राष्ट्रीय स्तरावरील पीएचडी अभ्यासक्रम प्रवेशासाठी होणाऱ्या UGC NET परीक्षेला आजपासून सुरूवात होत आहे. ही परीक्षा राष्ट्रीय चाचणी संस्था एन टी ए तर्फे संगणक-आधारित चाचणी पद्धतीने घेतली जाईल. ही परीक्षा ३० जुन पर्यंत चालणार आहे.

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं १४ जुलैपासून सुरू होणाऱ्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या १५ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासह विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचं पुनरागमन झालं आहे. या दौऱ्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १४ जुलै, दुसरा १६ जुलै आणि अंतिम सामना १९ जुलै रोजी खेळला जाणार आहे.

****

बीड जिल्हा शासकीय रुग्णालय इथं काल ज्येष्ठ नागरिक मदत कक्षाचं उद्घाटन झालं. याप्रसंगी जिल्हा सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा, जिल्हा प्राधिकरण सचिव वहाब सय्यद यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

****

महिलांच्या एफआयएच हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं  आहे. काल अंतिम सामन्यात भारतीय संघानं न्यूझीलंडचा २-० असा पराभव केला. या स्पर्धेत लालरेमियासामी सामना वीर ठरली तर दिपीकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. या विजयामुळे भारतानं आगामी प्रो लिग मध्येही प्रवेश मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात लिहिलं आहे.

****

महिला टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल मँचेस्टर इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सहा गडी राखून पराभव केला. भारतानं दिलेल्या १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने पाच चेंडू शिल्लक असताना चार गडी गमावून १६१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या मरिझान कॅपने ८१ धावांची नाबाद शानदार खेळी केली आणि तिला सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

****

No comments:

Post a Comment