Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25
June 2026
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ जून २०२६ दुपारी १.०० वा.
****
नागपूर इथलं डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातील एक प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल
तसंच या विमानतळामुळं कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या विमानतळाचं जीएमआर या खाजगी कंपनीला आज हस्तांतरण
करण्यात आलं, त्यावेळी ते
बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू
या सोहळ्याला उपस्थित होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील
साकार होईल असं मुख्यमत्र्यांनी नमुद केलं.
****
राज्यात गौणखनिज माफिया आणि
वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापन करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी विधानसभेत केली. गडचिरोली जिल्ह्यात
नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्या संदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात
गेल्या पाच वर्षांत दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांकशुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व
प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षांमार्फत करण्याची घोषणाही महसूलमंत्र्यांनी केली.
दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक
शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त
केल्याच्या तक्रारी आहेत यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले.
****
कोकणातल्या आंबा आणि काजू
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी NDRF च्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी
आहे, अशी माहिती
मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. कोकणात अवकाळी
पावसामुळं साडे २२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना ८ ते १०
दिवसांत NDRF च्या निकषानुसार
२०९ कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ९५ हजारापेक्षा
अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. पण ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे
यांनी घेतला. कोकणातल्या सुमारे ७२ हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे २१७ कोटी रुपये येत्या १५ दिवसात दिले जातील, असं आश्वासन देखील कृषिमंत्र्यांनी
दिलं.
****
मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने
घेतला आहे. अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानपरिषदेत
केली. अवैध वाहतुकीवर नियमन आणण्यासाठी सरकार काम करत आहे, असं ते म्हणाले. अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी सार्वजनिक
वाहतुकीची वारंवारिता वाढवण्यात येईल, असं सरनाईक यांनी सांगितलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आणीबाणीच्या काळात लोकशाही मूल्यांचे रक्षण करणाऱ्यांना आज अभिवादन केलं. आणीबाणी हा
भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय असून तो संविधानावर थेट आघात होता, असं त्यांनी समाजमाध्यमावरील
संदेशात म्हटलं आहे. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांच्या रक्षणासाठी भारत कटिबद्ध
असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
यांनीही लोकशाहीसाठी लढणाऱ्या सर्व लोकशाही सैनिकांना अभिवादन केलं आहे. २५ जून १९७५
हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं ते म्हणाले. हा काळा अध्याय देशाच्या
स्मरणात कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळला
जात असल्याचं शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
****
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी
तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे प्राप्त झालेल्या देणग्यांच्या व्यवस्थापनाची न्यायालयीन देखरेखीखाली
चौकशी करण्याच्या मागणीवरील जनहित याचिकेच्या तातडीच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने
आज नकार दिला. याचिका नियमानुसार लवकरच सूचीबद्ध केली जाईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.
याचिकेत राम मंदिरातील देणग्या आणि अर्पण केलेल्या वस्तुंशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल व्यवहारांची नोंद आणि
अन्य पुरावे जतन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच देणग्यांचं फॉरेन्सिक ऑडिट आणि
निधी व्यवस्थापनात अधिक पारदर्शकतेची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या
विशेष तपास पथकाने प्राथमिक अहवाल सादर केला असून, कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सविस्तर चौकशी सुरू आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं २८
जून रोजी राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. महापौर समीर राजूरकर
यांनी आज पत्रकार परिषदे ही माहिती दिली. महानगर पालिकेच्या हद्दीतील ३४ आरोग्य केंद्र, महानगर पालिकेची पाच रुग्णालये, शहरातील ४० आरोग्य केंद्रात
ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यात
येणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असं आवाहन महापौरांनी केलं
आहे.
****
राज्यातील अनेक भागात आज सकाळपासून पाऊस सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संततधार सुरु
असून सकाळपर्यंत रत्नागिरी इथं ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातही बहुतांश
जिल्ह्यात आज पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेचे आमदार अंबादास
दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पक्षीय
राजकारणाशी संबंधित नसून सहकार क्षेत्रातील विकासासाठी नितीन पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी
घेतल्याचे दानवे यांनी सांगितलं. जिल्हा बँकेच्या १२ जागांसाठी महायुती आणि महाविकास
आघाडीत थेट लढत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment