Thursday, 25 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 25.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 25 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जून २०२ सकाळी.०० वाजता

****

आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. ही घटना आपल्याला लोकशाही, संविधान आणि नागरिकांच्या कर्तव्ये यांचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेला बळकटी  देते, असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

१९७५ मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागारिकांना समजावं यासाठी आज देशभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

अकरावी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवत आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जा मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. या वर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे.

****

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आजपासून तीन दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोइल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबाजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल.

दरम्यान, गोयल आणि अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमीसन ग्रीर यांच्यासमवेत  काल झालेल्या बैठकीत भारत अमेरिका व्यापार करारातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला. ग्रीर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भारत दौऱ्यात गेल्या तीन दिवसांत विविध फेऱ्यांमध्ये चर्चा केली. दोन्ही देशांनी व्यवसाय, शेतकरी, कामगार आणि ग्राहकांना प्रत्यक्ष लाभ मिळेल असा संतुलित आणि व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार यावेळी केला.

****

ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात ए आय चा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाय योजनांवर विचार मंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ति आणि संस्था, तज्ञ तसंच उद्योग आणि स्टार्ट अपचे प्रतिनिधि यात सहभागी होणार आहेत.

****

राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालयांची निर्मिती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. या संदर्भातील प्रस्तावात १० अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये, ७ उपविभागीय कार्यालये, २ तहसीलदार कार्यालये आणि ६९ अपर तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. या प्रस्तावावर हरकती आणि सूचना मागवण्यासाठी १५ दिवसांची जाहीर सूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्राप्त हरकती आणि सूचनांचा एकत्रित अहवाल येत्या १२ जुलै पर्यंत शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

लातूर शहरात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगमधल्या तीन जणांची पोलिसांनी रस्त्यावर धिंड काढली. काही दिवसापूर्वी या कोयता गॅंगने दहशत पसरवित लातूरच्या वसवाडी परिसरात भरदिवसा महिला आणि लहान मुलांवर कोयत्याने वार केले होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. तिन्ही आरोपी  अल्पवयीन असल्यानं त्यांना बीडच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.

****

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत, अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर संध्याकाळी ७ वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत ३ पैकी २ सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. तर बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे. भारताने या स्पर्धेत पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला.

****

भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या ५ ते १४ तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या २४ सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियाने केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात, हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक,तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये सात सामने खेळणार आहे. या युवा संघाचे नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. नऊ दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या दोन सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघांविरुद्ध होतील.

****

राज्याच्या अनेक भागात आज पाऊस सुरु आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात ३० जूनपर्यंत पाऊस सुरु राहण्याची शक्यता  हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment