Friday, 26 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 26 June 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ जून २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थांविरोधातील लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व यंत्रणा आणि व्यक्तींचं अभिनंदन केलं आहे. भारतानं अंमली पदार्थांच्या जागतिक आव्हानाविरुद्ध सर्वात प्रभावी लढा उभारला असून, देशातील अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित टोळ्यांचं उच्चाटन करण्यात आलं आहे. तसंच, अंमली पदार्थमुक्त भारत घडविण्याचा केंद्र सरकारचा निर्धार कायम असल्याचं शाह यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज मुंबई इथल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.

दरम्यान, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस मधे मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. समाजसुधारक, लोककल्याणकारी राजा आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते म्हणून शाहू महाराजांचं कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर काढण्यात आलेल्या सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या समता दिंडीला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त जिल्हा प्रशासन आणि सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग यांच्या वतीने दसरा चौक इथं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

सामाजिक न्याय दिनानिमित्त लातूर इथं आज समाज कल्याण विभागामार्फत समता दिंडी आणि संविधान जनजागृती प्रभातफेरी काढण्यात आली. या उपक्रमाला लातूर शहरातील नागरिक, विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. दोन हजार ६१९ पदांची भरती यातून केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना उद्यापासून १७ जुलैपर्यंत  संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. नागरी सेवा मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय तसेच पूर्व परीक्षा वर्षातून दोन ते तीन वेळा घेऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासंबंधीचं पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलं आहे.

****

आशा स्वयंसेविका तसंच २१ हजार रुपयांपेक्षा कमी पगार असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. या प्रस्तावामुळे आरोग्य कर्मचारी आणि कुटुंबियांना आरोग्य सुरक्षिततेचा लाभ होईल.  मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या समिती कक्षात काल झालेल्या बैठकीत, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी तसंच पतसंस्था कर्मचारी, रेशन दुकानातील कामगार, खासगी शाळांचे कर्मचारी, स्वयंरोजगार संस्था तसंच वाचनालयातील कर्मचारी अशा २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या घटकांना राज्य कामगार विमा योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

****

भूखंडावरील मुद्रांक शुल्काची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अकोल्याचा जिल्हा निबंधक किरण चौधरी याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली.

****

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इक्वाडोरनं जर्मनीचा २-१ असा धक्कादायक पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला आहे. तर, आयवरी कोस्टनं कुरासाओवर दोन शून्‍य असा विजय मिळवत स्पर्धेत पहिल्यांदाच बाद फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या एका सामन्यात ऑस्ट्रेलियानं पराग्वेविरुद्ध गोलशून्य बरोबरी साधत बाद फेरीतलं स्थान निश्चित केलं.

****

क्रिकेट

भारत-आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-ट्वेन्टी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार बेलफास्ट इथं  संध्याकाळी सहा वाजता सामन्याला सुरुवात होईल. वैभव सुर्यवंशी या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर पदार्पण करण्याची शक्यता आहे.

****

हवामान

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. तर, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

**** 

No comments:

Post a Comment