Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 26 June 2026
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२६ जून
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पश्चिम आशियातल्या संकटाच्या
पार्श्वभूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या पॅक्ड एलपीजी पुरवठ्यावर लागू करण्यात
आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक
आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे
उपलब्ध होणार आहे. तसंच,
संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या
नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. संकटपूर्व काळातील वापराच्या तुलनेत घाऊक
एलपीजी पुरवठ्याचे निर्बंध ५० टक्क्यांनी कमी करण्यात आले असून, त्यामुळे
उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.
****
राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती
साजरी करण्यात येत आहे. राज्यात यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं
आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्र-कुलगरू डॉ. अशोक
महाजन यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी
यांच्यासह विद्यार्थ्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून
अभिवादन केलं.
डॉ बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठात
जेष्ठ लेखक आणि अर्थतज्ज्ञ तसंच राजर्षी शाहू अध्यासन,कोल्हापूरचे
संस्थापक प्राचार्य जे. के. पवार यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे.
हिंगोली इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर
सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने शहरातून रॅली काढण्यात आली
****
राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे लेखक
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज
त्यांना आदरांजली वाहिली. सामाजिक माध्यमावरील संदेशात बिर्ला म्हणाले की, बंकिमचंद्र
यांनी आपल्या लेखनातून पारतंत्र्यातील भारतातील लोकांमध्ये आत्मसन्मान, देशभक्ती
आणि स्वातंत्र्याची भावना निर्माण केली. बंकिमचंद्र यांची प्रसिद्ध कादंबरी आनंदमठ
हे भारतीय संस्कृती,
राष्ट्रीय एकता आणि देशाच्या अभिमानाचे अमर प्रतीक आहे, असही
बिर्ला यांनी म्हटलं आहे.
****
उत्तर प्रदेश पोलिसांनी श्रीराम
जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विश्वस्त संस्थेला दान केलेल्या रकमेत आणि देणगीमध्ये
करण्यात आलेल्या कथित अपहार प्रकरणी आठ संशयित आरोपींना अटक केली आहे. मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या
शिफारशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संस्थेचे सदस्य कृष्णमोहन यांनी ही
तक्रार नोंदवली होती. विशेष तपास पथकाने मंगळवारी आपला प्राथमिक अहवाल सरकारला
सादर केला होता,
त्याआधारे काल हा गुन्हा दाखल करण्यात आला. संस्थेला
मिळालेल्या देणग्या आणि दानामध्ये कथित चोरीचे आरोप समोर आल्यानंतर हे प्रकरण
उघडकीस आले होतं. संस्थेच्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या
तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केलं होते.
****
आज मोहर्रम आहे. हा दिवस प्रेषित
मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बलिदानाची आठवण
करून देतो,
ज्यांनी कर्बलामध्ये सत्य आणि न्यायाच्या रक्षणासाठी आपल्या
प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आज ताजिये काढले जात आहेत.
कर्बलातील शहीदांच्या या सर्वोच्च बलिदानाचा गौरव करण्यासाठी ठिकठिकाणी मजलिस आणि
धार्मिक सभांचेही आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे व्यापक
व्यवस्थापन करण्यात आले आहे.
हजरत इमाम हुसेन यांचं बलिदान सत्य आणि
न्यायाच्या मार्गावर ठाम राहण्याची प्रेरणा देतं, असं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांचं बलिदान धैर्य, दृढ
विश्वास आणि मानवी मूल्यांचे प्रतीक आहे, असं सामाजिक माध्यमावरील
एका संदेशात मोदी यांनी म्हटलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी
तालुक्यातील शेनोडी गावाची केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट व्हिलेज
योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. स्मार्ट व्हिलेज योजनेअंतर्गत गावात पायाभूत
सुविधा, डिजिटल सेवा,
स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते
तसच विविध विकासकामांना चालना मिळणार आहे. या योजनेमुळे शेनोडी गावाच्या सर्वांगीण
विकासाला गती मिळून गाव आधुनिकतेकडे वाटचाल करणार आहे. गावाच्या निवडीबद्दल
ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांनी खासदार रामराव वडकुते यांचं अभिनंदन
केलं असून,
त्यांच्या प्रयत्नांमुळे गावाच्या विकासासाठी नवे दालन खुले
झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
****
राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम येत्या २८
तारखेला राबवण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महानगर पालिकेच्या हद्दीतील
३४ आरोग्य केंद्र,
महानगर पालिकेची पाच रुग्णालयं आणि शहरातल्या ४० आरोग्य
केंद्रात बालकांना ही लस देण्यात येणार असल्याची माहिती महापौर समीर राजुरकर यांनी
दिली. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शून्य ते पाच वर्ष
वयोगटातल्या बालकांना ही लस देऊन अभियानात सहभागी होण्याचं आवाहन महापौरांनी केलं
आहे.
****
महिला टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत काल मँचेस्टर इथं झालेल्या साखळी सामन्यात भारताने बांग्लादेशचा पाच
खेळाडू राखून पराभव केला.
****
No comments:
Post a Comment