Sunday, 28 June 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 28.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 28 June 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ जून २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      भिवंडीत टीईटीचा पेपर फुटल्याने आजची परिक्षा रद्द, तीन जणांना अटक

·      पेपरफुटी प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून एसआयटीची स्थापना

·      बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात

·      पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधणार

आणि

·      राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत आज शून्य ते पाच वर्ष वयोगटातल्या बालकांना लस देण्याचं प्रशासनाचं आवाहन

****

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आजची नियोजित शिक्षक पात्रता परिक्षा – टीईटी पुढे ढकलली आहे. भिवंडी पोलिसांनी प्रश्नपत्रिका विक्रीच्या संशयावरून तीन जणांना ताब्यात घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. अटक केलेल्या आरोपींमध्ये राजीव शॉ आणि आकाश कुमार या बिहारी आणि धीरज सिंह या हरियाणातल्या नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाईल फोन, रोख रक्कम आणि TET च्या प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त करण्यात आले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकांमधले काही प्रश्न आणि टीईटी २०२६ च्या मूळ प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न समान असल्याचं प्राथमिक पडताळणीत आढळून आलं. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, प्रश्नपत्रिका आरोपींकडे कशा पोहोचल्या आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. परीक्षेची नवी तारीख आणि इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

****

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक  – एसआयटीची स्थापना केली आहे. ठाण्याचे सहपोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखालचं हे पथक या प्रकरणाचा तपास करणार आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि पोलिस महासंचालकांशीही यासंदर्भात चर्चा केली असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे.

****

राज्य सरकार भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणावर काम करत असून, पेपरफुटी हा प्रकार केवळ गैरव्यवहार नसून संघटित गुन्हेगारीचं स्वरूप धारण करणारा गंभीर अपराध असल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकरणातला मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा-मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं.

****

दरम्यान, किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती आणि कोकणकडा मित्र मंडळ यांच्यावतीने साजऱ्या झालेल्या शिवराज्यभिषेक सोहळ्यात एकनाथ शिंदे काल सहभागी झाले होते. रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी गडावरील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीयोजने अंतर्गत, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या थेट कर्जखात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल, असं प्रशासनानं जाहीर केलं आहे. कर्जखात्याच्या माहितीत किंवा बँक तपशीलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी, म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

****

शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी ही फसवी असून त्याविरोधात आपण २९ जून रोजी छत्रपती संभाजीनगर इथं निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती, आमदार रोहित पवार यांनी दिली. ते काल बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. योग्य कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

****

शिवसेनेला पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसैनिकांनी आपली वज्रमुठ आवळावी असं आवाहन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल हिंगोली इथं जाहीर सभेत बोलत होते. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पक्षांतरावर कठोर टीका करतांना, शिवसेनेला सोडून गेलेले संपले पण शिवसेना पुन्हा जोमाने उभी राहते हा इतिहास आहे, तो इतिहास हिंगोलीत पुन्हा जागा करायचा असल्याचं ठाकरे यांनी नमूद केलं.

ठाकरे यांनी काल यवतमाळ तसंच वाशिम इथंही जाहीर सभा घेऊन पक्ष सोडून गेलेल्यांवर टीका केली. विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ. सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणाही त्यांनी केली.

आज सकाळी दहा वाजता उद्धव ठाकरे यांची परभणी इथं अक्षदा मंगल कार्यालयात जाहीर सभा होत आहे. त्यानंतर संध्याकाळी धाराशिव इथंही ते सभेला संबोधित करतील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या 'मन की बात'या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १३५ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व केंद्र तसंच न्यूज़ ऑन एआयआर मोबाइल ॲपवरही या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे.

****

हुतात्मा सैनिकांच्या वीरपत्नी, वीरमाता तसंच कायदेशीर वारसदारांना शेतीसाठी शासकीय जमिनीचं हस्तांतरण करताना यापुढे मुद्रांक शुल्क भरावं लागणार नाही. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं ही माहिती दिली.

दरम्यान, महसूल विभागातल्या कथित घोटाळ्याबाबत काही प्रकरणांमध्ये केवळ तफावत आढळली असून, प्रत्येक तफावत म्हणजे घोटाळा असं म्हणता येणार नसल्याचं, बावनकुळे यांनी सांगितलं. या प्रकरणाच्या तपासासाठी कृती दल स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली.

****

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज राबवण्यात येत आहे. या मोहिमेत राज्यातल्या शून्य ते पाच वर्षे वयोगटातल्या प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लस देऊन पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी सहभागी व्हावं, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. या मोहिमेसाठी राज्यभरात ८९ हजार ४८९ लसीकरण बुथ, २६ हजार ५३० ट्रान्झिट पथकं, १३ हजार ५१८ मोबाईल पथकं आणि ५८६ रात्रपाळी पथकं कार्यरत राहणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर इथं या मोहिमेचा शुभारंभ मनपा एन-८ रुग्णालयात सकाळी आठ वाजता होणार आहे. जालना जिल्ह्यात सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना पोलिओची मात्रा देऊन मोहिमेला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी केलं आहे.

****

धाराशिव इथल्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातल्या शुभम धूत या संशोधकानं हिमोफिलीया या रक्त विकारावर औषध शोधलं आहे. तब्बल सात वर्षांपासून सुरू असलेल्या या संशोधनानंतर चार ऑगस्ट २०२५ पासून प्रत्यक्ष या आजाराचे पीडित असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात झाली. १८० दिवसांची ही उपचार पद्धती रक्तामृत वटी या नावानं ओळखली जाते. वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या १३० रुग्णांवर याचे उपचार सुरू झाले. रुग्णांवर याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. याबाबत रुग्णांनी आकाशवाणीशी बोलतांना आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं..

बाईट - धाराशिव

****

छत्रपती संभाजीनगर इथले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा देवगिरी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक संचालक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी वामनराव रामचंद्र पांडे यांचं काल निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते. ज्येष्ठ क्रिकेटपटू विद्याधर पांडे, ज्येष्ठ पत्रकार नाटककार गिरीधर पांडे, बुद्धिबळपटू शशीधर पांडे आणि शिरीष पांडे यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या विलास घुले खून प्रकरणात एसआयटीच्या पथकाकडून बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या केज इथल्या घराची तपासणी करण्यात आली. या हत्या प्रकरणात फिर्यादी रमेश घुले यांच्या पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांचं नाव आल्यानंतर, याचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं एसआयटी गठित करण्यात आली आहे.

****

राज्यातल्या मोठे, मध्यम आणि लघु अशा सर्व धरणांमध्ये सरासरी २२ पूर्णांक ७३ शतांश टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ४२ पूर्णांक १६ शतांश टक्के एवढा होता. छत्रपती संभाजीनगर विभागात २४ पूर्णांक ५२ शतांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

****

हवामान

मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात आज विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment