Saturday, 6 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र उत्साहात साजरा

·      देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिवचे सतीश साबळे यांना सुवर्णपदक

·      इंग्लंड तसंच आयर्लंड दौऱ्यासाठी वैभव सुर्यवंशीची टी ट्वेंटी संघात निवड

आणि

·      नैऋत्य मोसमी पाऊस तळकोकणात दाखल

****

३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. रायगडावर साजऱ्या झालेल्या मुख्य सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन केलं. ३०० वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची भावना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग इथं आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशक राजदंड आणि स्वराज्य गुढीचं विधिवत पूजन करण्यात आलं.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही महाराजांना अभिवादन केलं आहे. स्वाभिमान, सुप्रशासन आणि नागरिकांची सुरक्षा यावर आधारलेली सुशासन प्रणाली महाराजांनी स्थापन केली होती, असं शहा यांनी म्हटलं आहे.

 

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं आज शिवराज्याभिषेक दिनांचं औचित्य साधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण केल्याचं सांगितलं. याबाबत केंद्र सरकारकडं पाठपुरावा सुरु असल्याचं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले -

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या विमानतळावर उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा २० फूट उंच असून, तो अवघ्या आठ महिन्यात तयार झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपतींना अभिवादन करत, सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

****

मराठवाड्यातही शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.

छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी गर्दी केली आहे. शिवरायांच्या गजराने संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे. सर्व पक्षीय नेते तसंच लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

नांदेड इथं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. त्यानंतर गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह अनेक अधिकारी तसंच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

****

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथल्या हिंदायान स्पोर्ट सायन्स अकॅडमीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. चिमुकल्या शिवभक्तांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. छोट्या मुलांनी पारंपरिक पद्धतीनं पुजा तसंच पालखी सोहळा साजरा करून शिवकालीन युद्धकलांचं थरारक प्रात्यक्षिक सादर केलं.

****

सोलापूर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे यांचं व्याख्यान झालं. महाराजांनी भारतीय इतिहासात ‘अष्टक्रांती’ घडवली. शिवरायांच्या या क्रांतिकारी कार्याचा विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता बलकवडे यांनी व्यक्त केली.

****

राज्यात कोल्हापूर, सातारा, धुळे, पालघर, तसंच इतरही अनेक ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होत आहे.

****

राज्य सरकारनं देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कायद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांमध्ये संभ्रम झाला होता, या आक्षेपांची दखल घेत सरकारनं हा निर्णय घेतल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. देवस्थानांना बळकटी देणारा कायदा विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात आणला जाईल, असं सुतोवाच बावनकुळे यांनी केलं. ते म्हणाले -

बाईट - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

****

पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी समन्वय ठेऊन, काम करावे, असं आवाहन पुण्याच्या विभागीय आयुक्त शितल तेली - उगले यांनी केलं आहे. आज सोलापूर इथं आषाढी वारीच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. वारकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना आयुक्त तेली यांनी केली.

****

कॉकरोच जनता पार्टीच्या नवी दिल्लीतल्या आंदोलनाला आज प्रारंभ झाला. पार्टीच्या मागण्यांऐवजी त्यांच्या समाज माध्यमातल्या खात्यांवर कारवाई केल्यावरुन पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सरकारवर टीका केली. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.

****

इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या पोलीस पाल्यांचा विशेष गौरव सोहळा आज छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं.

****

अहमदाबाद इथं सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातले योगपटू सतीश साबळे यांनी ट्विस्टिंग प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत जागतिक अजिंक्यपदाला गवसणी घातली. सध्या सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले साबळे हे जागतिक योगासन स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे पहिले योगपटू ठरल्यानं त्यांचं विशेष कौतुक होत आहे.

****

१८ वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने यजमान जपानचा ४-१ असा पराभव करत तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावलं. तर भारतीय महिला संघानं दक्षिण कोरियाला ३-० नं पराभूत करत कास्यंपदक पटकावलं आहे.

****

इंग्लंड आणि आर्यलंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा टी ट्वेंटी क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. दरम्यान, किशोरवयीन क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीची या संघात निवड झाली आहे. सध्या १५ वर्ष ७१ दिवस वय असलेल्या वैभवने, सर्वात कमी वयाच्या खेळाडूचा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला. सचिन यांची भारतीय संघात निवड झाली तेव्हा ते १६ वर्ष २०५ दिवस वयाचे होते.

****

अहिल्यानगर इथले ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं आज निधन झालं. निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, तसंच ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचे प्रेरणास्थान असलेले देशमुख यांनी स्थानिक वृत्तपत्रांतल्या विविध जबाबदाऱ्यांसह स्नेहालयच्या ‘रेडिओ नगर’ या एफ एम रेडिओचे संचालक म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यांचा पार्थिव देहावर अहिल्यानगर इथं अंत्यसंस्कार होत आहेत.

****

बीड जिल्ह्यात परळी इथला तरुण तोहीद कैरातीखान पठाण याच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी शासन आणि प्रशासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी २८ जून रोजी होणार आहे. जिल्ह्यातील २९ हजार ६३१ उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. प्राथमिक शिक्षण विभागाने परीक्षा यंत्रणा सज्ज केली. छत्रपती संभाजीनगर शहरातील ५० शाळांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. ही परीक्षा दोन सत्रांत होणार आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी ही माहिती दिली.

****

दक्षिण मध्य रेल्वे मंडळानं हैदराबाद जयपूर हैदराबाद विशेष साप्ताहिक गाडी नियमित करण्यास मान्यता दिली आहे. ही गाडी नांदेड, पूर्णा, अकोला, खंडवा, उज्जैन, अजमेर मार्गे धावणार आहे.

****

हवामान

नैऋत्य मोसमी पाऊस आज तळकोकणात दाखल झाला. साधारण २० जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग मोसमी पाऊस व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.

परभणी जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह सर्वत्र पूर्वमोसमी पाऊस झाला. पाण्याअभावी वाळत असलेल्या ऊसाला यामुळे दिलासा मिळाला असून पेरणी पूर्व मशागतीच्या कामालाही यामुळे गती मिळेल.

****

No comments:

Post a Comment