Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 June
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ७ जून २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
३५३ वा शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र उत्साहात
साजरा
·
देवस्थान जमीन निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित
करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
·
जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिवचे
सतीश साबळे यांना सुवर्णपदक
·
पुरुषांच्या १८ वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी
स्पर्धेत जपानला नमवत भारत अजिंक्य
आणि
·
नैर्ऋत्य मोसमी पाऊस तळकोकणात दाखल; २० जूनपर्यंत
राज्यात सर्वत्र मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज
****
३५३ वा
शिवराज्याभिषेक सोहळा काल सर्वत्र उत्साहात साजरा झाला. रायगडावर साजऱ्या झालेल्या
मुख्य सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन केलं. ३००
वर्षांनंतरही लोक या ठिकाणी येतात हे महाराजांवरील अढळ श्रद्धेचं प्रतीक असल्याची
भावना युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई
आंतराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या पुतळ्याचं काल शिवराज्याभिषेक दिनांचं औचित्य साधत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. त्यानंतर पत्रकारांशी संवाद
साधताना मुख्यमंत्र्यांनी, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव
देण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण केल्याची माहिती देत, याबाबत केंद्र सरकारकडे
पाठपुरावा सुरु असल्याचं सांगितलं.
****
उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपतींना अभिवादन करत,
सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
****
मराठवाड्यातही
शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
छत्रपती
संभाजीनगर इथं क्रांती चौकात सकाळपासूनच शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर शिवमय झाला, सर्व पक्षीय नेते तसंच
लोकप्रतिनिधींनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केलं.
****
नांदेड इथं
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना
कावली यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
त्यानंतर गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
****
परभणी
जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यात कातनेश्वर इथल्या हिंदयान स्पोर्ट सायन्स अकॅडमीत
शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. छोट्या मुलांनी पारंपरिक पद्धतीनं पुजा
तसंच पालखी सोहळा साजरा करून शिवकालीन युद्धकलांचं थरारक प्रात्यक्षिक सादर केलं.
****
देवस्थान जमीन
निर्मूलन कायदा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. या कायद्याबाबत हिंदू धर्मीय आणि देवस्थान संस्थांमध्ये संभ्रम आहे, याबाबत
दाखल आक्षेपांची दखल घेत सरकारनं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
देवस्थानांना बळकटी देणारा कायदा विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात आणला जाईल,
असं सूतोवाच बावनकुळे यांनी केलं. ते म्हणाले…
बाईट- महसूलमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे
****
विविध परीक्षा
आणि भरती प्रक्रियांमधल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय शिक्षण
मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता
पार्टीच्या नेतृत्वाखाली काल दिल्लीत जंतरमंतर इथं आंदोलन झालं. या आंदोलनात
हजारोंच्या संख्येने आंदोलक जमले होते. पेपरफुटी आणि इतर अनियमिततेप्रकरणी
मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसंच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी
मागणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली. या आंदोलनात
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक, भाकप नेत्या ऍनी राजा, भाकप माले चे महासचिव
दीपांकर भट्टाचार्य सहभागी झाले होते.
दरम्यान, दीपके
यांच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या निवासस्थानी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात
आल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात सिंचन प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी तसंच अनधिकृत
पाणी उपसा रोखण्यासाठी तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. काल
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली जलसाठ्यांसदर्भात आढावा
बैठक झाली. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण
ठेवण्यासाठी विविध उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
दरम्यान,
जिल्हाधिकारी काल तुळजापूर तालुक्यातल्या तीर्थ बुद्रुक गावात मुक्कामी दौऱ्यावर
होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा
जाणून घेतल्या.
****
जागतिक
पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने काल लातूर इथं पर्यावरण जनजागृतीपर सायकल फेरी
काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त
विद्यमाने काढलेल्या या फेरीला नागरिक आणि सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारने नुकतीच १२ वर्ष पूर्ण केली.
या कालावधीत सरकारने क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल केले, त्यामुळे क्रीडापटूंना
प्रोत्साहन मिळत असून, क्रीडा क्षेत्रालाही अच्छे दिन आले, असं मत छत्रपती
संभाजीनगर इथले क्रीडा प्रशिक्षक डॉ. मकरंद जोशी यांनी व्यक्त केलं आहे. ते
म्हणाले…
बाईट- डॉ. मकरंद
जोशी
****
लातूर
तालुक्यातल्या खंडापूर इथल्या अखंड हरिनाम सप्ताहातील कथित आर्थिक गैरव्यवहार
प्रकरणी मुख्य आयोजकांसह इतर काही जणांविरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. या सोहळ्यासाठी
सुमारे पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांहून अधिक निधी जमा झाल्याचा दावा करण्यात
आला असून, त्यातील सुमारे तीन कोटी पासष्ट लाख रुपयांचा हिशोब उपलब्ध नसल्याचा
आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
****
बीड जिल्ह्यात
परळी इथला तरुण तोहीद कैराती खान पठाण याच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ
अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली
आहे. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात चालवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर
न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही त्यांनी शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
****
अहमदाबाद इथं
जागतिक अजिंक्यपद योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातले योगपटू सतीश साबळे यांनी
ट्विस्टिंग प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावत जागतिक अजिंक्यपदाला गवसणी घातली.
सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले साबळे हे जागतिक योगासन स्पर्धेत भारताला
सुवर्णपदक मिळवून देणारे पहिले योगपटू ठरल्यानं त्यांचं विशेष कौतुक होत आहे.
****
१८ वर्षांखालील
मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताने काल यजमान जपानचा ४-१ असा पराभव करत
तिसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावलं. जपानच्या काकामिगाहारा इथं झालेल्या अंतिम
सामन्यात भारताच्या वतीनं आशीष पुरती यानं तीन आणि केतन कुशवाहा यानं एक गोल केला.
त्याआधी,
महिलांच्या १८ वर्षांखालच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं
कांस्यपदकाची कमाई केली. या सामन्यात त्यांनी कोरियाच्या संघावर ३-० असा विजय
मिळवला.
****
ओस्लो इथं
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम विजय मिळवत ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं इतिहास
घडवला आहे. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
****
इंग्लंड आणि
आर्यलंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा टी ट्वेंटी क्रिकेट संघ
काल जाहीर झाला. तिलक वर्मा भारतीय संघाचा नवा उपकर्णधार असेल. दरम्यान, किशोरवयीन
क्रिकेटपटू वैभव सुर्यवंशीची या संघात निवड झाली आहे. सध्या १५ वर्ष ७१ दिवस वय
असलेल्या वैभवने, सर्वात कमी वयाच्या क्रिकेटपटूचा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा
विक्रम मोडीत काढला. सचिन यांची भारतीय संघात निवड झाली तेव्हा त्यांचं वय १६ वर्ष
२०५ दिवस एवढं होतं.
****
इयत्ता
दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या
पोलीस पाल्यांचा विशेष गौरव सोहळा काल छत्रपती संभाजीनगर इथं पार पडला. पोलीस
अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोहळ्यात गुणवंत
विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं.
****
लातूर–धाराशिव–बीड
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते, माजी मंत्री आमदार अमित
देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
भाजप नेत्यांकडून उमेदवारांना आमिषे दाखवून, निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडलं
जात असल्याचा आरोप करत त्यांनी, निवडणुका झाल्याच नाहीत तर लोकशाही जिवंत राहणार
नाही असं मत व्यक्त केलं.
****
जालना
जिल्ह्यातल्या अंबड इथला तहसिलदार विजय चव्हाण याला १२ लाख रुपयांची लाच मागताना
रंगेहात अटक करण्यात आली. अवैध वाळू उपसा करणार्या पोकलेन मशिनवर कारवाई न
करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
****
हवामान
नैऋत्य मोसमी
पाऊस काल तळकोकणात दाखल झाला. साधारण २० जूनपर्यंत राज्याचा सर्व भाग मोसमी पाऊस
व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
परभणी
जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह सर्वत्र पूर्वमोसमी पाऊस झाला. पाण्याअभावी वाळत
असलेल्या ऊसाला यामुळे दिलासा मिळाला असून, पेरणी पूर्व मशागतीच्या कामालाही गती
मिळेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण परिसरातही काल पाऊस झाला.
****
No comments:
Post a Comment