Tuesday, 23 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 June 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ जून २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातले पद्म पुरस्कार प्रदान, क्रिकेटपटू रोहित शर्मासह ६५ मान्यवरांचा गौरव

·      नाफेडच्या लिलाव पोर्टलचं केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

·      एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ तसंच वार्षिक वेतनवाढीचा दर तीन टक्के करण्याची परिवहनमंत्र्यांची घोषणा

·      छत्रपती संभाजीनगर इथल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी १० कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचं सरकारचं आश्वासन

आणि

·      राज्यात मान्सून सक्रिय; पुढील दोन दिवसांत मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांत पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल

****

राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. टेनिसपटू विजय अमृतराज, अभिनेता मामुटी, पार्श्वगायिका अलका याज्ञिक आणि क्रिकेटपटू रोहित शर्मा यांसह ६५ मान्यवरांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या वर्षी केंद्र सरकारनं एकूण १३१ पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यात ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये १९ महिलांचा समावेश असून १६ जणांना मरणोत्तर सन्मानित केलं जाईल.

****

शेतकऱ्यांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी खरेदी प्रक्रियेत मध्यस्थांची भूमिका संपवावी लागेल, असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं. नवी दिल्लीत अटल अक्षय उर्जा भवनात नाफेडच्या लिलाव पोर्टलचं उद्घाटन करताना ते बोलत होते. किमान आधारभूत किमतीचा संपूर्ण लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी कडधान्यं आणि तेलबियांची खरेदी अधिकाधिक प्रमाणात शेतकऱ्यांकडूनच केली जावी, असंही ते यावेळी म्हणाले. २०१४ मध्ये बंद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नाफेडने व्यापक सुधारणा आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या बळावर आज ३० हजार कोटी रुपयांची उलाढाल आणि ५०० कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे, असं अमित शाह यावेळी म्हणाले.

बाईट - केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह

****

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर हवामान बदल आणि त्याचा शेतीवर पडणारा प्रभाव यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विविध राज्यांचे कृषीमंत्री, सचिव, जिल्हाधिकारी तसंच संबंधित अधिकारी उपस्थित होते. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक तयारी, पर्यायी पीक नियोजन आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण याबाबत बैठकीत चर्चा झाली. एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी आणि शेतीवर होणारे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं चौहान यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.

****

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यावरून ५८ टक्के करायचा निर्णय घेतल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानपरिषदेत केली. या कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीच्या दरातही वाढ करत असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक दरवाढीसह सर्व मिळून प्रलंबित असलेली सुमारे ५ हजार ६४९ कोटी रुपयांची रक्कम लवकर अदा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल, असं आश्वासन यांनी दिलं. २९ जून रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं धरणं आंदोलन मागे घेतल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

****

राज्यात वीज निर्मिती केंद्राला पुरवठादार काही प्रमाणात निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरवत आहेत. त्यामुळं वीज निर्मिती संचात बिघाड होत असून, कोळसा पुरवठ्याबाबत नव्याने निविदा काढताना पुरवठादार निकृष्ट मालाचा पुरवठा करणार नाहीत याची खबरदारी घेतली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला ते विधानसभेत उत्तर देत होते. तत्पुर्वी राज्यात वीज निर्मिती केंद्रातले संच वारंवार बंद पडत असल्याचा मुद्दा वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता.

****

राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी दूधभेसळ अधिनियम तयार करायचं काम सुरू आहे. त्यात भेसळीच्या गंभीरतेनुसार ६ महिने ते आजन्म तुरुंगवास आणि १० लाख रुपयांच्या दंडाची तरतूद प्रस्तावित आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

****

पुढील ४२ महिन्यांत विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प, तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारी विकसित करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.

****

छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी १० कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल, असं मंत्री उदय सामंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून ९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणं, मनुष्यबळाची नेमणूक आणि इतर कामांसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडून महानगरपालिकेला आजच निर्देश दिले जातील, असं सामंत म्हणाले.

****

शेतकऱ्यांना फसवी कर्जमाफी न देता संपूर्ण कर्जमाफी तत्काळ घोषित करावी या आणि इतर मागण्यांसाठी काँग्रेसनं आज नांदेडमध्ये आसूड मोर्चा काढला होता. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. शेतकऱ्यांना दर्जेदार खत आणि बियाणे उपलब्ध करून द्यावे, महिलांवरील अत्याचार रोखावे, गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी कराव्यात, बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा, नीटसह इतर परीक्षांची विश्वासार्हता वाढवावी, अशा मागण्या या मोर्चात करण्यात आल्या.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अर्धापूर तालुक्यातील एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत अतिसार थांबवा हे अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम यांनी केलं आहे. या अभियानात जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील पाण्याची एफटीके द्वारे तपासणी करण्यात येणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या मोटार वाहन परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा १६ जूनपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरु आहे. आज या संपाचा आठवा दिवस आहे. या संपामुळे नवीन वाहन नोंदणी, टॅक्स, फिटनेस तसंच इतर कामं ठप्प झाली आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात महेशनवमी उत्सव विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जालन्यात बडी सडक इथं शोभायात्रा काढण्यात आली. तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा युवा संघटन आणि सातारा देवळाई प्रभागाच्या वतीने आज बीड बायपास इथल्या रेणुका माता मंदिर ते चिकलठाणा महेशभवन मार्गे भव्य ई वाहन फेरी काढण्यात आली. यावेळी पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि इंधन बचतीचा संदेश देण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरुळच्या बारावे जोर्तिंलिंग घृष्णेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात असलेलं अतिक्रमण आज काढण्याचं काम सुरु केलं आहे. परिसरात असलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. यामुळे पर्यटक, भक्तांना ये–जा करण्यासाठी कायम वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत होते. याचा विचार करुन तालुका प्रशासन तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीच्या सहाय्याने वेरुळ येथील अतिक्रमण हटवण्याचे काम वेगाने सुरु केले असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवले आहे.

****

हवामान

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, येत्या दोन दिवसांत तो मुंबईसह राज्याच्या आणखी काही भागांत पुढे सरकण्यासाठी हवामान अनुकूल बनलं आहे. मान्सूनची उत्तरी सीमा सध्या हर्णे ते सोलापूर रेषेवर स्थिरावलेली असली, तरी अरबी समुद्रातील बदलत्या स्थितीमुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ हवामानासह जोरदार पाऊस पडण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. नाशिक शहर आणि परिसरात आज पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर, जालना,बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये उद्या तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment