Monday, 29 June 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 29 June 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जून २०२ सकाळी .०० वाजता

****

पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन, प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हर्मिनी यांनी हा पुरस्कार देऊन पंतप्रधानांचा गौरव केला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रति आपली जबाबदारी असल्याचं सांगून त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला.

****

देशभरात माता आणि बालकांच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशु बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे. जन्मापासून ते तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह-आधारित आणि समुदाय-आधारित आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरु करण्यात आला. विशेष काळजी घेण्याची गरज असलेल्या मुलांसाठी जोखीम-आधारित पाठपुरावा प्रणाली सुरू केली जाणार आहे.

****

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या सहाव्या टप्पयामध्ये २५ हजार ८२३ शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

****

आषाढी वारीच्या काळात भाविकांना दर्जेदार सुविधा देतानाच स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं, अशा सूचना ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. आषाढी वारी २०२६च्या तयारीचा आढावा घेत त्यांनी वाखरी पालखीतळ, भक्ती सागर अशा ६५ एकर परिसराची आणि चंद्रभागा नदीपात्राची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

****

दिव्यांगत्वावर मात करून शासकीय पुरस्कार मिळवणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना ‘आगाऊ वेतनवाढ’ देण्याचे आदेश; दिव्यांग कल्याण सक्षमीकरण आयुक्तांनी दिले आहेत. राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

****

राज्यात अन्न आणि औषध प्रशासनाने सुरू केलेल्या भेसळविरोधी धडक मोहिमेचा परिणाम आता अकोला जिल्ह्यातल्या बाजारपेठेत दिसू लागला आहे. गेल्या महिनाभरात पनीर, खवा, तूप आणि चीज ॲनालॉगविरोधात झालेल्या कारवायांमुळे अनेक हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांमधून पनीरचे पदार्थ तात्पुरते गायब झाले आहेत. दुसरीकडे, अस्सल दुधापासून तयार होणाऱ्या पनीर आणि खव्याची मागणी वाढल्याने त्यांच्या दरात प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

****

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्र निर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं, महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली. या विशेष शोध मोहिमेत पाच ते सहा टन वजनाची लेथ मशीन, तसंच २० रायफल रॉड धातुच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं.

****

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं उन्नत नाशिक अभियानाच्या अंतर्गत फाशीचा डोंगर परिसरात एक लाख झाडं लावण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते काल झाला. वृक्षारोपणाबरोबरच त्यांच्या संगोपनाची जबाबदारी सर्वांनी घ्यावी असं आवाहन महाजन यांनी केलं.

त्याचबरोबर गोदावरी नदीची उपनदी असलेल्या कपिला नदीची स्वच्छता मोहीमही काल राबवण्यात आली.

****

किल्ले रायगडावर सरकारच्या वतीने दुसरा रोपवे उभारण्यात येणार आहे. पुरातत्व विभागाने यासंदर्भातल्या सरकारी प्रस्तावास मान्यता दिली असून, रोपवे सुरू झाल्यानंतर शिवभक्तांना केवळ ५० रूपयात रायगडावर जाता येईल. गडावर सध्या खाजगी रोपवे असल्याने एकेरी भाडे ३५० रुपये इतकं आहे. सरकारी रोपवे झाल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदवी आणि पदव्यूत्तर विभाग ऑनलाईन नोंदणीची मुदत काल संपली. आत्तापर्यंत दोन हजार ७७६ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

****

राज्याच्या विविध भागात काल पावसानं कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. पुणे शहरात तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पाऊस पडला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये पावसाचं आगमन झालं. जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसानं दमदार हजेरी लावली.

अकोले तालुक्यात मुळानदी पाणलोट क्षेत्रात आंबीत धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळे भंडारदरा क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे.

लातूरमध्ये काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळं खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment