Thursday, 2 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड

·      आरोग्य विभागात पाच हजार नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती

·      ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य विधानसभेत सादर

·      महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी असल्याचा दाखला देणारं विधेयक विधानसभेत सादर

आणि

·      मराठवाड्यात अनेक भागात जोरदार पाऊस, पुढील दोन दिवस बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट

****

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल एकमताने निवड झाली. महायुती तसंच महाविकास आघाडीने प्रत्येकी एक उमेदवार दिल्याने, या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता होती. मात्र या पदाची बिनविरोध निवड होण्याची परंपरा कायम राहावी, यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली, त्यानुसार अभ्यंकर यांनी माघार घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर सदनाने सचिन अहीर यांची उपसभापतीपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला.

या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सदनानं सचिन अहीर यांचं अभिनंदन केलं.

****

आरोग्य विभागात पाच हजार नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येणार असल्याची माहिती, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. पुढच्या टप्प्यात आणखी ६०० डॉक्टरांची भरती केली जाणार असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक हजार ९०० सीएचओ पदंही लवकरच भरली जातील, अशी माहितीही आबिटकर यांनी दिली.

दरम्यान, राज्यातल्या सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमाणित कार्यपद्धती लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही आबिटकर यांनी सांगितलं.

PCPNDT कायद्यांतर्गत, IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्य मंत्र्यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते.

****

आपले सरकार सेवा केंद्रात कार्यरत ग्रामपंचायत संगणक परिचालकांचं मानधन यापुढे दर महिन्याच्या एक ते पाच तारखेदरम्यान नियमित अदा करण्यात येईल, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य बबनराव लोणीकर यांनी ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या परिचालकांचं मार्च २०२६ पर्यंतचं मानधन वितरित करण्यात आलं असून उर्वरित प्रलंबित मानधनही लवकरच अदा करण्यात येणार असल्याची माहिती गोरे यांनी दिली.

****

लातूररोड ते नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक असलेला ५० टक्के खर्च राज्य शासनाने तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी काल विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. १०४ किलोमीटर लांबीच्या या मार्गाची अंतिम पाहणी पूर्ण झाली असून, या प्रकल्पासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

****

ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य सरकारने काल विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. अशा प्रकरणी न्यायालयीन सुनावणी जास्तीत जास्त दोन वेळा पुढे ढकलण्याची विनंती करता येईल, अशी तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.

****

राज्यातल्या महिला शेतकरी आणि महिला शेतमजुरांना शेतकरी असल्याचा दाखला देणारं, महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, काल विधानसभेत सादर करण्यात आलं. कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी हे विधेयक सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्या संबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे.

****

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. तर महानगरपालिकेच्यावतीने स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात सुमारे ७०० भारतीय वृक्षांची लागवड करण्यात आली.

परभणी इथं वसंतराव नाईक यांची जयंती तसंच कृषी दिनाचं औचित्य साधून शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

****

आषाढी वारीसाठी शेगाव इथून निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल मराठवाड्यात आगमन झालं. हिंगोली जिल्ह्यातल्या वाढोणा इथं हजारो भाविकांनी दिंडीचं स्वागत केलं. या दिंडी सोहळ्यात ७०० वारकरी सहभागी झाले आहेत.

त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसह शेकडो दिंड्यांचं काल नाशिक शहरात आगमन झालं. महापौर हिमगौरी आडके यांच्या हसते उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं.

बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातल्या श्रीक्षेत्र सखारामपूर इथून सखाराम महाराजांच्या पालखीने काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात ‘झाडे लावाण्याचा तसंच व्यसनमुक्ती’ चा संदेश दिला जात आहे.

****

ज्येष्ठ दिगदर्शक विजया मेहता यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी परवा निधन झालं, नाट्य तसंच सिनेसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी काल विजयाबाईंचं अत्यंदर्शन घेऊन त्यांना अखेरचा निरोप दिला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं मुख्य अभियंता मृद आणि जलसंधारण हे कार्यालय आजपासून कार्यान्वित होत आहे. मुख्य अभियंता म्हणून हरिभाऊ गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरानजिक वाल्मी परिसरातल्या या कार्यालयाचं कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातल्या आठ तसंच नाशिक प्रादेशिक विभागातल्या पाच अशा एकूण १३ जिल्ह्यांचं असेल.

****

टीईटी तसंच नीट पेपरफुटी विरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं काल बीड जिल्ह्यात माजलगाव इथं तीव्र निदर्शनं करण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या स्थानिक उद्योग आणि कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षम स्थान मिळावं, यासाठी पायाभूत सुविधा उभारणीवर विशेष भर देण्याची गरज, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा निर्यात प्रचालन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. २०२६-२७ साठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा निर्यात कृती आराखड्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

****

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात काल रस्ते सुरक्षा संदर्भात एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत आयआयटी मद्रास इथल्या तज्ज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली विविध मुद्यांबाबत माहिती देण्यात आली. रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून उपाययोजना राबवण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांना राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते शेतीमित्र पुरस्कार काल मुंबईत प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे पुढील काळात शेती, पाणी क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया नरहरी शिवपुरे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.

****

अहमदाबाद इथं झालेल्या 'फिल्म फेम राष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५' आणि 'गुजराती सिने पुरस्कार २०२६' या सोहळ्यात अनिलकुमार होळकर यांना 'भुरळ डोळ्यांची' चित्रपटासाठी 'सर्वोत्कृष्ट गीतकार' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाला यापूर्वी जवळपास तीस पुरस्कार मिळाले आहेत.

****

पालघर इथं झालेल्या योनेक्स सनराइज जी.एच.रायसोनी राज्य बॅडमिंटन स्पर्धेत, छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडे आणि पुण्याच्या श्रेयस मसलेकर यांनी १९ वर्षाखालील दुहेरी गटात कांस्यपदक पटकावलं. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने २८ जून ते १ जुलैदरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली.

****

भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच टी –ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल रद्द झाला. इंग्लंडमधल्या चेस्टर ली स्ट्रीट इथं नियोजित हा सामना, पहिला डाव झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने निर्धारित षटकात सात बाद १८९ धावा केल्या. मात्र नंतर इंग्लंडची फलंदाजी होऊ शकली नाही. या मालिकेतला दुसरा सामना येत्या शनिवारी मँचेस्टर इथं खेळला जाणार आहे.

****

मुंबईतल्या पूर्व तसंच पश्चिम उपनगरांसह नवी मुंबई आणि ठाणे परिसरात काल जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तसंच खुलताबादसह अनेक भागात काल दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली, यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं होतं. हिंगोली जिल्ह्यात नर्सी नामदेव, आंबा मंडळात अतिवृष्टी तर सेनगाव तालुक्यातल्या चांगेफळमध्ये गढफुटीसदृश पाऊस झाला.

मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात विदर्भ तसंच कोकणात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या काही भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment