Wednesday, 1 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड

·      आरोग्य विभागात पाच हजार नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येणार

·      ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य विधानसभेत सादर

·      विकसित भारत जीरामजी कायदा आजपासून देशभरात लागू

आणि

·      मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट

****

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमताने निवड झाली. महायुती तसंच महाविकास आघाडीने प्रत्येकी एक उमेदवार दिल्याने, या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता होती. मात्र या पदाची बिनविरोध निवड होण्याची परंपरा कायम राहावी, यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली, त्यानुसार अभ्यंकर यांनी माघार घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर सदनाने सचिन अहीर यांची उपसभापतिपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला. सभापती राम शिंदे यांनी ही घोषणा केली.

बाईट – सभापती राम शिंदे

या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सदनानं सचिन अहीर यांचं अभिनंदन केलं.

****

आरोग्य विभागात पाच हजार नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येणार असून, आजच्या डॉक्टर्स दिनी १ हजार ४०० डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. पुढच्या टप्प्यात आणखी ६०० डॉक्टरांची भरती केली जाणार असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ हजार ९०० सीएचओ पदंही लवकरच भरली जातील, अशी माहितीही आबिटकर यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रमाणित कार्यपद्धती लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचं आबिटकर यांनी सांगितलं.

****

आपले सरकार सेवा केंद्रात कार्यरत ग्रामपंचायत संगणक परिचालकांचं मानधन यापुढे दर महिन्याच्या १ ते ५ तारखेच्या दरम्यान नियमित अदा करण्यात येईल, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. सदस्य बबनराव लोणीकर यांनी ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या परिचालकांचं मार्च २०२६ पर्यंतचं मानधन वितरित करण्यात आलं असून उर्वरित प्रलंबित मानधनही लवकरच अदा करण्यात येणार असल्याची माहिती गोरे यांनी दिली.

****

लातूर रोड ते नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक असलेला ५० टक्के खर्च राज्य शासनाने तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. १०४ किलोमीटर लांबीच्या या मार्गाची अंतिम पाहणी पूर्ण झाली असून, या प्रकल्पासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

****

ठेवीदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य सरकारने आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. अशा प्रकरणी न्यायालयीन सुनावणी जास्तीत जास्त २ वेळा पुढे ढकलण्याची विनंती करता येईल, अशी तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचे रक्षण करण्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे.

****

माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली.

 

मुंबईत विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांच्यासह विधिमंडळ सदस्य, अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. तर महानगरपालिकेच्या वतीने वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात ७०० भारतीय वृक्षांची लागवड करण्यात आली

****

ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. नाट्य तसंच सिनेसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी विजयाबाईंचं अत्यंदर्शन घेऊन त्यांना अखेरचा निरोप दिला.

****

आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसह शेकडो दिंड्यांचं आज नाशिक शहरात आगमन झालं. महापौर हिमगौरी आडके यांच्या हसते उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं.

****

रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जीरामजी अर्थात विकसित भारत- रोजगार आणि उपजिविका हमी ग्रामीण कायदा २०२५ आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात १२५ दिवसांच्या रोजगाराच्या हमीसोबतच विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे, असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे.

****

भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेले लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी चार दशकांहून अधिकच्या सेवाकाळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

****

पारपत्र दुरुस्ती नियम २०२६ नुसार आजपासून नवीन ३६ पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून अडीच हजार रुपये करण्यात आलं आहे. ६० पानांच्या पारपत्रासाठी साडेतीन हजार रुपये, तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी सहा हजार रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. ३६ पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन करून घेण्यासाठी ५ हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे.

****

पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती १८३ रुपये ५० पैशांनी कमी केल्या आहेत. आजपासून लागू झालेल्या या कपातीमुळे हॉटेल्स, कँटीन तसेच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्य अभियंता मृद आणि जलसंधारण हे कार्यालय उद्या २ जुलैपासून कार्यान्वित होणार आहे. शहरानजिक वाल्मी परिसरातल्या या कार्यालयाचं कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील ८ तसंच नाशिक प्रादेशिक विभागातील ५ अशा एकूण १३ जिल्ह्यांचं असणार आहे.

****

टीईटी तसंच नीट पेपरफुटी विरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटीक युथ फेडरेशन ऑफ इंडिया ने बीड जिल्ह्यात माजलगाव इथे आज तीव्र निदर्शनं केली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शेतीमित्र पुरस्कार आज मुंबईत प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे पुढील काळात शेती, पाणी क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया नरहरी शिवपुरे यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली.

****

पालघर इथं झालेल्या योनेक्स सनराइज जी.एच.रायसोनी राज्य बॅडमिंटन स्पर्धेत, छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडे आणि पुण्याच्या श्रेयस मसलेकर यांनी १९ वर्षाखालील दुहेरी गटात कांस्यपदक पटकावलं. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने २८ जून ते १ जुलैदरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली.

****

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी–ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना इंग्लंडमधल्या चेस्टर ली स्ट्रीट इथं भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता सुरू होईल.

****

अहमदाबाद इथे झालेल्या ‘फिल्म फेम राष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५आणि गुजराती सिने पुरस्कार २०२६या सोहळ्यात अनिलकुमार होळकर यांना भुरळ डोळ्यांची’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकारपुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाला यापूर्वी जवळपास तीस पुरस्कार मिळाले आहेत.

****

हवामान

मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात विदर्भ तसंच कोकणात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या काही भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

 

मुंबईतल्या पूर्व तसंच पश्चिम उपनगरांमध्ये आज जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे, तर मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरानं धावत आहेत. नवी मुंबई आणि ठाणे परिसरातही जोरदार पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तसंच खुलताबादसह अनेक भागात आज दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. नाशिक शहरासह जिल्ह्यात काही भागात आज पाऊस झाल्याचं वृत्त आहे

****

No comments:

Post a Comment