Friday, 3 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेचा कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला दीडशे कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं, त्या प्रस्तावावर वित्त विभागाने काही त्रुटी काढल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंक मध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या ५०० मीटर परिसरात त्याच्या विक्री वर बंदी घालण्यात येईल, अशी घोषणाही मंत्री झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. शाळांच्या स्तरावर विद्यार्थ्यांना प्रबोधन करण्याचं काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं ही ते म्हणाले.

****

२०२३ ते मे २०२६ या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये पाच हजार ९२७ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून १७१ दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

भारत-फ्रान्स सामरिक भागीदारी ही शाश्वत, लवचिक आणि नवोन्मेषावर आधारित विकासाच्या पुढील टप्प्याला चालना देण्यासाठी अत्यंत सक्षम असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. पॅरिस इथं भारत-फ्रान्स उद्योग गोलमेज परिषदेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. तांत्रिक प्रगती, पुरवठा साखळीचं विविधीकरण, ऊर्जा संक्रमण आणि भू-राजकीय घडामोडींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने परिवर्तन होत आहे, असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्समधील उद्योग आणि गुंतवणूकदारांना विकसित भारत २०४७ च्या प्रवासात भारताशी भागीदारी करण्याचं आवाहन सीतारामन यांनी केलं.

****

वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या मार्गांवरुन सुरुवात झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरुंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली. या पहिल्या तुकडीत चार हजार ८२२ भाविक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे. त्यांनी आज धाराशिव तालुक्यातल्या रुईभर इथं शेतकऱ्यांची भेट घेत शेतीची पाहणी केली. कमी पर्जन्यमान असलं तरीही बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी केलेल्या क्षेत्रातल्या पिकांची उगवण क्षमता टिकून राहते, असं त्यांनी सांगितलं. बीज प्रक्रिया, तसंच बीबीएफ तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिक, कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर चारा बियाणे वाटप, कीटकनाशकांसाठी कामगंध सापळ्यांची कार्यपद्धती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी समजावून घेतली आणि वृक्षारोपण केलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं प्रादेशिक वस्त्रोद्योग उपआयुक्त यांच्या वतीनं काल सहकार सप्ताहानिमित्त वीणकरांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पैठण पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले, जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, प्रादेशिक उप आयुक्त वसंत घुले यावेळी उपस्थित होते.

****

बीड जिल्ह्यात नेकनूर इथं प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्णयाला सर्वपक्षीय कृती समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे. आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेऊन, त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आलं. भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, वाहतूक सुविधा आणि भविष्यातील विकास लक्षात घेता चौसाळा इथं नवीन अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याची मागणी समितीने केली आहे.

****

राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु असून, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी पाऊस सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसाने सखल भागात काही ठिकाणी पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून ४७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडचिरोलीमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचं पथक दाखल झालं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे नद्या-ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण २१ टक्के भरलं आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळीही दहा फुटावरून १२ पूर्णांक सात फूट इतकी वाढल्याचं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.

****

No comments:

Post a Comment