Friday, 3 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      शाळेच्या ५०० मीटर परिसरात स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदीची घोषणा

·      माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं येत्या ५ जुलैला रामरक्षा राज्यव्यापी आंदोलन

·      अतिक्रमणाला प्रतिबंधासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचं स्वतंत्र पथक

आणि

·      राज्यात पुढचे पाच दिवस जोरदार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा

****

माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी पाच जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात, माहिती आयोगाला पत्र पाठवून, कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारकडून आज विधानसभेत स्पष्ट करण्यात आलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला दीडशे कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ यांनी सांगितलं. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत, जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या ५०० मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले.

बाईट - अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

****

अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ केली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी १ जूनपर्यंत १३ हजार ४७४ अन्न नमुने तपासणीसाठी प्राप्त झाले असून त्यापैकी ७ हजार ४९४ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर ४ हजार ९१ नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचं स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात.

****

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ देवस्थान परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. प्राप्त तक्रारींच्या आधारे १० मिठाई विक्रेते आस्थापनांची या कारवाई दरम्यान तपासणी करण्यात आली. या कारवाईत चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवण्यात आलेला ९३ किलो खवा नष्ट करण्यात आला. तसंच अन्न नोंदणी अथवा वैध परवाना नसलेल्या मिठाई विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

****

दरम्यान, नांदेड इथं अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं काल २ शाळांमध्ये शालेय पोषण आहाराची तपासणी करण्यात आली, तसंच दोन लाख २४ हजार ५३० रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. प्रयोगशाळेचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार या संदर्भात पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं, अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलं आहे.

****

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. ते आज विधानसभेत बोलत होते. राज्यात १४ लाख ८० हजाराहून अधिक भटके कुत्रे आहेत. त्यातले ९४ हजार मुंबईत आहेत. राज्यातल्या २ लाखाहून अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि १ लाख ८० हजारांहून अधिक कुत्र्यांच निर्बीजीकरण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली.

****

राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे सव्वा कोटी स्मार्ट मीटर लावले आहे. त्यापैकी सुमारे ४ लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जूनअखेर सुमारे ९ लाख ८५ हजार स्मार्ट मीटर लावलेले आहेत. त्यापैकी १ जानेवारी ते २९ मे पर्यंत वीज बिल वाढीच्या पावणे १२ हजार तक्रारी आल्या. यापैकी केवळ ४ तक्रारीत तथ्य आढळल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं.

****

शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन, नस्तींचा जलद गतीने निपटारा आणि शासकीय कामकाजात पारदर्शकता यासंदर्भात दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्यात येईल, अशी घोषणा सामान्य प्रशासन विभाग मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी केली. आज विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकावर ते बोलत होते.

****

येत्या ५ जुलैला रामरक्षा या राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी मंदिरातल्या दानपेटी अपहार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुंबईत राहणाऱ्या उत्तर भारतीयांनीही या आंदोलनात सहभागी व्हावं, या आंदोलनात रामरक्षा तसंच हनुमान स्तोत्र सर्वांसोबत म्हणण्याचा मानस ठाकरे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले -

बाईट - उद्धव ठाकरे

हाताला काम आणि शेतमालाला दाम’ हे आमचे हिंदुत्व असल्याचं ठाकरे यांनी यावेळी नमूद केलं. खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

****

मराठवाड्याच्या ग्रामीण भागात सध्या २९६ गावांसह ११७ वाड्यांना ४८८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वांत जास्त ३१५ टँकर सुरु आहेत. जिल्ह्यात सध्या १९२ गावं तसच ४६ वाड्यांना ३१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचं विभागीय आयुक्तालय कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे

****

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर इथं पोहोचली. सुमारे पंचवीस हजार वारकरी या दिंडीत सहभागी आहेत. आषाढी वारी चरणसेवेसाठी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांसह २२ वैद्यकीय महाविद्यालयांच्या ५० विद्यार्थ्यांसह स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार, आवश्यक औषधोपचार, आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी याविषयीचं मार्गदर्शन केलं जात आहे.

****

आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेली शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यात दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. आज औंढा तालुक्यात जवळा बाजार इथं मुक्काम केल्यानंतर पालखी उद्या परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ होईल. पालखीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात वारंवार होणाऱ्या अतिक्रमणाला आला घालण्यासाठी महानगरपालिका आता स्वतंत्र पथक नेमणार आहे. अशी माहिती अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. हे पथक दिवसरात्र शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये फिरून गस्त घालणार असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, महापालिकेच्या अग्रिशमन विभागाकडून हटिल्स, हॉस्पिटल्ससह खासगी आस्थापनांना फायर एनओसीबाबत विचारणा करून नोटीस बजावण्यात येत आहेत, अग्निशमन विभागाचे प्रमुख अंकुश पांढरे यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत २१३ आस्थापनांना नोटीस दिल्याचं पांढरे यांनी सांगितलं.

****

धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षपदी अभिलाष लोमटे तर उपाध्यक्षपदी अविनाश माळी यांची बिनविरोध झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात सहकार चळवळ अधिक सक्षम आणि लोकाभिमुख करण्यात या संस्थेचं मोलाचं योगदान आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार असून लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी अनिवार्य आहे.

****

हरित महाराष्ट्र मोहिमेला आज हिंगोली जिल्ह्यात प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वड, पिंपळ आणि उंबर या देशी वृक्षांच्या रोपांचं वृक्षारोपण करण्यात आलं. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचं जतन आणि हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने एक पेड माँ के नाम अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात तसंच वन महोत्सवानिमित्त ही मोहीम राबवण्यात येत आहे.

****

नागरिकांनी पावसाळ्यात विद्युत यंत्रणेपासून दूर राहून विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केलं आहे. विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत किंवा दुचाकी टेकवून ठेवू नये, तसंच पूरस्थितीत नदीकाठच्या भागात विशेष दक्षता घ्यावी, असं आवाहनही कुमठेकर यांनी केलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे एका घराचं छत कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला, आज ही दुर्घटना घडली.

****

हवामान

राज्यात पुढचे पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात मध्य महाराष्ट्र, कोकण तसंच मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मराठवाड्यात धाराशिव आणि लातूर वगळता सर्व जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात विदर्भात बुलडाणा आणि यवतमाळ तसंच कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यांसह नाशिक तसंच पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment