Saturday, 4 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 04 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

केंद्रीय गृह मंत्रालयाने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या २३ व्यक्तींना 'दहशतवादी' म्हणून घोषित केलं आहे. या व्यक्तींचा संबंध जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि इतर संघटनांशी होता. जम्मू-काश्मीरमधील घुसखोरी, दहशतवादी भरती, शस्त्रास्त्रांचा पुरवठा आणि हल्ल्यांचे नियोजन यांसारख्या विविध कारवायांमध्ये सहभाग असल्यामुळे त्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे 'राष्ट्रीय तपास संस्था' सारख्या संस्थांना संबंधित व्यक्तींचा निधी रोखणे, शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर निर्बंध घालणे आणि त्यांची मालमत्ता जप्त करणे शक्य होणार आहे. या कायद्यामधील सुधारणा लागू झाल्यापासून सरकारने ८० व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.

****

आज जागतिक सहकार दिनहा दिवस दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी जगभरात साजरा केला जातो.  या दिनानिमित्त केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा आणि विस्तार मिळाला असून सहकार विद्यापीठ, आधुनिक प्रशिक्षण केंद्रे आणि नव्या क्षेत्रांमधील संस्थांच्या सक्षमीकरणामुळे शेतकरी, महिला, छोटे उद्योजक आणि कामगारांचे जीवन बदलत असल्याचे शहा यांनी म्हटलं आहे.

****

राज्यात आज सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तीन रेल्वे मार्गांची वाहतूक दहा ते पंधरा मिनिटे उशिरा सुरू झाली असून रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली आहे.

****

पालघर जिल्ह्यातही आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साठले असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

****

सांगली जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी २७ पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ८३ पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील सांडवा, कालवा आणि विद्युतगृहाद्वारे विविध धरणातून विसर्ग सुरू आहे.

****

जालना जिल्ह्यात यंदा प्रथमच श्री संत मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. उद्या सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत जे.ई.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा होईल. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातल्या विविध भागांतून शेकडो वारकरी दिंड्या, टाळ-मृदंगाच्या गजरात सहभागी होणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी जालना महानगरपालिकेकडून स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृहे, वीजपुरवठा तसंच पालखी सुशोभीकरणासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

****

जालना आणि वाशिम जिल्ह्यात आज अपघात घडले, या दुर्घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला असून २५ ते ३० जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या शहापूरजवळ दोन बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. जालना-वडीगोद्री महामार्गावरील गल्हाटी नदीच्या पुलावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सुमारे पंचवीस ते तीस प्रवासी जखमी झाले असून, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. गंभीर जखमींवर अंबड इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंबड आगाराची बस भांबेरी इथून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन अंबडकडे येत होती. तर दुसरी बस अंबडहून बीडकडे जाताना हा अपघात घडला.

****

वाशीम जिल्ह्यातील कारंजा-मानोरा रोडवरील कुपटा घाटात सकाळी ट्रक आणि कार यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. कुपटा इथून मानोराकडे येत असलेल्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली.

****

नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी पोलिसांनी काल कारवाई करुन प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेत चालकाला अटक केली. या कारवाईत वाहनासह एकूण ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

****

भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने 'क्रोएशिया ग्रँड चेस टूर'मधील 'रॅपिड' प्रकारात दिमाखदार यश मिळवलं. काल झालेल्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवून त्याने फ्रान्सच्या अलीरेझा फिरुझा याच्या बरोबरीने संयुक्त आघाडी घेतली. इव्हान सारिक, बोगदान-डॅनियल डीक आणि अनिश गिरी यांचा पराभव करत प्रज्ञानंदनं 'ब्लिट्झ' प्रकाराला सुरुवात होण्यापूर्वी गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. तर दुसरीकडे, विद्यमान जागतिक विजेता डी. गुकेश याने कालचे तिन्ही सामने बरोबरीत सोडवले; सध्या तो १० गुणांसह संयुक्त आघाडीवर असलेल्या खेळाडूंपेक्षा दोन गुण मागे आहे. आता ही स्पर्धा १८ फेऱ्यांच्या 'ब्लिट्झ' प्रकारात प्रवेश करत असून, यातच स्पर्धेचा अंतिम विजेता निश्चित होईल.

****

No comments:

Post a Comment