Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 July
2026
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०४ जुलै
२०२६ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान आणि गुजरातच्या
एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांचे उद्घघाटन आणि
पायाभरणी करतील. राजस्थानमधील जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घघाटन
आणि 'उन्नत उडान योजनेची सुरुवात
पंतप्रधानांच्या हस्ते आज होईल तसंच शासकीय पदांवर नियुक्ती झालेल्या ५४ हजार तरुणांना
पंतप्रधान नियुक्तीपत्रे प्रदान करतील. त्यानंतर गुजरात इथं सेमीकंडक्टर प्रकल्पाचं
ते उद्घघाटन कर करणार आहे.
****
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान
नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सी. पी.
राधाकृष्णन आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केलं आहे. “भारतीय
संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रीय
जाणीवेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात स्वामी विवेकानंदांचं योगदान अद्वितीय
आहे.” त्यांची प्रज्ञा आणि प्रेरणादायी विचार आजही लाखो तरुणांना मार्गदर्शन करत असल्याचं
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केलं.
“स्वामी विवेकानंद यांनी भारताची सांस्कृतिक आणि सभ्यताविषयक
जाणीव जागृत केली आणि देशाचे शाश्वत ज्ञान जगापर्यंत पोहोचवले असून त्यांची आत्मविश्वासू, प्रगल्भ आणि संवेदनशील भारताची संकल्पना
आजही देशाच्या वाटचालीस दिशा देत असल्याचं राधाकृष्णन यांनी सामाजिक माध्यमावरील आपल्या
संदेशात म्हटलं आहे. “आपल्या अमोघ वक्तृत्वानं जगाला भारतीय संस्कृतीचे दर्शन विवेकानंदांनी
घडवलं, तरुणाईला सकारात्मकतेची
शिकवण देणारे स्वामी विवेकानंद भारतीय संस्कृतीचे भाष्यकार आणि युगप्रवर्तक आहेत” अशा
शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलं.
****
राज्यात आजपासून ते सहा जुलै दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांना
सतर्क राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस केलं. या कालावधीत मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट
परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसंच मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट
परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात
अडथळे आणि काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता पाहता सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर
प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज सकाळी पावसानं काही काळ हजेरी
लावली असून सध्या हलक्या सरी कोसळत आहेत.
****
रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे पोलादपूर
- महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाट रस्त्यात सातत्यानं भूस्खलन, दरड कोसळणं, झाडं रस्त्यावर पडणं अशा घडत आहेत.
त्यामुळे हा रस्ता सहा जुलै पर्यंत पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे
यांनी दिले आहे.
****
कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत चार फुटानं
वाढ झाली आहे. पंचगंगा नदीसह वारणा, दुधगंगा आणि वेदगंगा नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. या नद्यांवरील सात
बंधारे पाण्याखाली गेले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात काल १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असून कळवण तालुक्यातील चणकापूर प्रकल्पात
मध्यरात्री एक वाजता विसर्ग करण्यात आला.
****
भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या
पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गोसीखुर्द धरणाचे अकरा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात
आले असून धरणामधून अडीच हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
अमरनाथ यात्रेचा पहिल्या दिवशी मोठा उत्साह दिसून आला, खराब हवामान आणि सततच्या पावसानंतरही
पहिल्याच दिवशी १२ हजार १६८ भाविकांनी अमरनाथ गुहेत दर्शन पूर्ण केलं. पहलगाम आणि बालटाल
आधार शिबिरांवरून भाविकांच्या पुढील तुकड्या चोख सुरक्षा व्यवस्थेसह रवाना होत आहेत.
****
बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर तालुक्यात पिंपळखुटा आणि
लासुरा गावात बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात चार जण जखमी झाले. गेल्या काही दिवसांपासून
याठिकाणी वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला असून ऊस, कापूस आणि सोयाबीन या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत
आहे. वन विभागानं तात्काळ उपायोजना करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली
आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या
निवडणुकीसाठी आज मतदान सुरू झालं. यावेळी बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे तसंच
विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी मतदान केलं.
****
भारत आणि इंग्लंड संघात आज दुसरा टी-ट्वेंटी सामना होणार
आहे. मँचेस्टर इथं सायंकाळी सात वाजता दोन्ही संघ आमने सामने येतील. पाच सामन्यांच्या
मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
****
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कोलंबियाने घानाचा १-०
असा पराभव करून पुढील फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता कोलंबियाचा आणि स्वित्झर्लंड
यांच्यात सामना सुरू आहे.
****
No comments:
Post a Comment