Monday, 6 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 06 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ जुलै २०२ दुपारी १.०० वा.

****

राज्यात अतिवृष्टीची स्थिती पाहता विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. मुंबई, पुणे, ठाणे आणि संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज असून, या भागातल्या नागरीकांनी प्रवास टाळण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते. पाऊस आणि एकूण परिस्थितीसंदर्भात सभागृहात उद्या सविस्तर निवेदन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

विधानपरिषदेतही पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि मुंबई–पुणे मार्ग बंद झाल्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. सभागृहाचं कामकाज सुरु होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी मुंबई – पुणे मिसिंग लिंक बंद झाल्याबद्दल सरकारी यंत्रणेवर टीका केली. या मार्गाच्या कामाचं ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली.

काँग्रेसचे सतेज पाटील यांनी, मुंबईत इमारत कोसळणं आणि झाडे उन्मळून पडण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती आणि वृक्षांचं ऑडिट केलं नसल्यावरुन त्यांनी यंत्रणेवर टीका केली. यापुढच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आधीच नागरीकांना सतर्क करावं आणि काय उपाययोजना केल्या यासंदर्भात माहिती द्यावी, अशी मागणी पाटील यांनी केली. 

****

मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुणे दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा क्रमांक दोन च्या बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ दरड कोसळल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई-पुणे महामार्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

आज सकाळी पुण्याहून मुंबईसाठी निघालेल्या चार एसटी बसेस 'उर्से टोल नाका' परिसरात अडकल्या होत्या, त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पुण्यात माघारी बोलावण्यात आलं.

दरम्यान, कर्जत-लोणावळा रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याने अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड–पनवेल– नांदेड एक्सप्रेसचा मार्ग बदलून ही गाडी दौंड - मनमाड - इगतपुरी – कल्याण मार्गे धावेल. तर मुंबई - नांदेड वंदे भारत एक्सप्रेस आज दुपारी सव्वा वाजता सुटण्याऐवजी दुपारी सव्वा तीन वाजता सुटेल.

**

श्री क्षेत्र आळंदी इथं पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून, आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकर्यांनी आळंदीमध्ये येऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ज्या वारकरी आणि भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणीच सुरक्षित थांबावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

**

रायगड जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यांमध्ये २४ तासांत २०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली.

सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी इथं २०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

नाशिक शहरासह सिन्नर, निफाड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, मनमाड, कळवण, सुरगाणा आणि चांदवड परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, पावसाअभावी खोळंबलेल्या खरीप हंगामातील पेरण्यांना वेग मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

**

जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज मध्यम स्वरूपाचा पासून सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सहकार मंत्रालयाला पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवी दिल्लीत सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरु आहे. सहकार मंत्रालयानं गेल्या पाच वर्षात सहकारातून समृद्धी या मंत्राचा अवलंब करत नागरीकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले, असं अमित शहा यावेळी म्हणाले.

सहकार क्षेत्रातल्या सर्वांत मोठ्या धान्य साठवणूक योजनेअंतर्गत २३२ धान्य गोदामांचं उद्घाटन आणि हस्तांतरण यावेळी शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या बेल्हे इथं ५०० मेट्रीक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचाही समावेश आहे. स्थानिक पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला केंद्र शासनाच्या जागतिक स्तरावरील धान्य गोदाम योजनेअंतर्गत हे गोदाम मंजूर झालं आहे. याच कार्यक्रमात ५० हजार प्राथमिक कृषी पतसंस्थांचं इ-पॅक्समध्ये रूपांतर करण्यात आलं.

****

भारतीय जनसंघाचे संस्थापक, पहिले अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन केलं. सशक्त, स्वावलंबी आणि एकात्म भारताचं त्यांचे स्वप्न आजही राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पाला नवी ऊर्जा देत असल्याचं, पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

No comments:

Post a Comment