Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
·
संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेला अलर्ट
मोडवर राहण्याचे निर्देश - अत्यावश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये-मुख्यमंत्र्यांचं नागरिकांना
आवाहन
·
मुंबईसह कोकणाला रेड अलर्ट तर नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची शक्यता
·
यंदा आषाढी वारीत देहू-आळंदीऐवजी पुण्यातून सहभागी होण्याचा
वारकऱ्यांना सल्ला
·
नांदेड–मुंबई तसंच नांदेड-टनकपूर या दोन गाड्यांना प्रारंभ
आणि
·
सूर्यघर योजनेच्या माहिती अभियानाला छत्रपती संभाजीनगर इथं सुरुवात
****
संभाव्य
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने अलर्ट मोडवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य आपत्ती नियंत्रण कक्षात एक बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी
पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा तसंच संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याचा आढावा
घेतला, पुराची
परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने ‘एसडीआरएफ’ आणि ‘एनडीआरएफ’ ची पथके रवाना करण्यात यावीत, आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळेल,
याची काळजी घ्यावी,
असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी
घराबाहेर पडू नये, खासगी
आस्थापनांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावं, असं आवाहन केलं. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईसह
कोकणातले सर्व जिल्हे, पालघर
तसंच पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात पुढचे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे.
याच काळात पुणे, छत्रपती
संभाजीनगर, बीड,
अहिल्यानगर,
जळगाव,
धुळे आणि बुलडाण्यासह विदर्भात बहुतांश
जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात
आला असून, उद्या
ढगफुटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याची सूचना
मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई–पुणे
द्रुतगती मार्गावरही भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आले आहेत.
संबंधित यंत्रणा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करावं,
अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी
दिल्या. कुठल्याही परिस्थितीत वाहतुक कोंडी होणार नाही,
याची दक्षता घेण्यात यावी,
असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुणे
जिल्ह्यात इंद्रायणी नदीवरचे पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या आषाढी
वारीसाठी देहू आणि आळंदीला येण्याऐवजी वारकऱ्यांनी १० जुलैला पुण्यातून वारीत सहभागी
व्हावं, असं
आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले -
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
आळंदी
इथं पुरात अडकलेल्या जवळपास ४०८ भाविकांची सुटका करण्यात आली. इंद्रायणी नदीला पूर
आल्यामुळे विविध ठिकाणी अडकलेल्या भाविकांसह १५० गायींचीही सुटका करुन सुरक्षित ठिकाणी
हलवण्यात आलं.
****
दरम्यान,
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी
तहकूब करण्यात आलं. राज्यात पावसामुळं झालेल्या दुर्घटनांमधे गेल्या तीन-चार दिवसात
१३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान
परिषदेत दिली.
****
कोकण
आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत असला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची अद्याप प्रतीक्षा आहे. बीड जिल्ह्यातल्या लहान-मोठ्या एकूण
१७३ धरणांमध्ये सध्या फक्त १७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातले तब्बल
८१ लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून, ७९ प्रकल्प मृत साठ्यात गेले आहेत.
****
सहकार
मंत्रालयाच्या स्थापनेमुळे सहकार क्षेत्राला एक शतक पुढे नेण्याचं कार्य शक्य झाल्याचं
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार मंत्रालयाच्या पाचव्या
स्थापना दिनानिमित्तानं आज त्यांच्या हस्ते देशभरात सहकार क्षेत्रातल्या अनेक महत्त्वाच्या
उपक्रमांची पायाभरणी आणि उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात देशभरातल्या
२३२ धान्य साठवण गोदामांचं उद्घाटन करण्यात आलं, यामध्ये पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या वेल्हे इथं
५०० मेट्रीक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचाही समावेश आहे. ५० हजार प्राथमिक कृषी पतसंस्थांचं
इ-पॅक्समध्ये रूपांतरही या कार्यक्रमात करण्यात आलं.
****
राष्ट्रीय
परीक्षा संस्था - एनटीए ने नीट युजी २०२६ परीक्षेचं शुल्क परत घेण्यासाठी बँक खात्याची
माहिती अद्ययावत करायला उद्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत ८ लाख २९ हजार ५१०
विद्यार्थ्यांनी बँक खात्याची माहिती अद्ययावत केली असून,
त्यांना परीक्षा शुल्क परत द्यायला
सुरुवात झाली आहे. ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानं हे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना
परत दिलं जातं आहे.
****
नांदेड–मुंबई
आणि टनकपूर–नांदेड एक्सप्रेस या दोन गाड्यांचा आज शुभारंभ झाला. रेल्वेमंत्री अश्विनी
वैष्णव, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उत्तराखंडचे
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे तर नांदेड रेल्वे स्थानकावरून
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण,
डॉ. अजित गोपछडे,
यांनी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
नांदेड-टनकपूर गाडीमुळे नांदेडचा उत्तराखंडशी थेट रेल्वे संपर्क स्थापित होईल तसंच
पर्यटन आणि व्यापार क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल असं वैष्णव यांनी नमूद केलं. ते म्हणाले
-
बाईट - रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
****
मराठवाड्यासाठी
स्वतंत्र रेल्वे विभाग करण्याची मागणी खासदार संदिपान भुमरे यांनी केली आहे. आज नांदेड
इथं दक्षिण मध्य रेल्वे विभागाची वार्षिक आढावा बैठक झाली,
त्यात खासदार भुमरे यांनी ही भूमिका
मांडली. आपण मांडत असलेल्या मुद्यांवर दक्षिण मध्य रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत
नसल्याने, ही
मागणी केल्याचं भुमरे यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं महावितरणाच्या सूर्यरथाला खासदार संदीपान भुमरे यांनी आज हिरवा झेंडा
दाखवला. हा सूर्यरथ पुढील सात दिवस छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि
निवासी वस्त्यांमध्ये फिरणार आहे. रथासोबत सौरऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ राहणार असून,
ग्राहक या प्रणालीसाठी पात्र असल्याची
तपासणी केली जाईल. यासह सौरऊर्जा तंत्रज्ञानाचे थेट प्रदर्शन आणि योजनेची सविस्तर माहिती
मोफत दिली जाणार आहे. सूर्यघर योजनेची माहिती देण्यासाठी उद्या सात जुलैपासून पुढील
१० दिवस क्रांती चौक उड्डाणपुलाखाली विशेष बूथ उभारला जाणार आहे.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेचा २०२६ चा भगवंत देशमुख वाङ्गमय पुरस्कार पुण्याच्या साहित्यिक कल्पना
धुमाळ यांच्या जारवा या ललितलेख संग्रहाला जाहीर झाला आहे. यंदाच्या संध्या देशमुख-मुळे
उत्कृष्ट ग्रंथालय तथा ग्रंथपाल पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्हा वाचनालयाची निवड झाली
आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्काराचं स्वरुप आहे. भगवंत देशमुख
यांच्या जन्मदिनी येत्या ५ ऑगस्टला हे पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान केले
जाणार आहेत.
****
आषाढी
वारीसाठी पंढरपूरला निघालेली अंधांची वारी आज परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं संत
जनाबाई यांच्या जन्मस्थळी पोहचली. त्यानंतर
ही दिंडी परळी वैजनाथकडे मार्गस्थ झाली. ही दिंडी ७ जूनला वाशिमहून निघाली आहे.
****
राज्यातील
प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पीकस्पर्धा सन २०२६-२७ जाहीर
करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२६ अंतर्गत मूग आणि उडीद पिकांसाठी अर्ज सादर करण्याची
अंतिम मुदत ३१ जुलै २०२६, तर
इतर सर्व पिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे.
****
बीड
शहरात काही भागात दूषित पाणी पुरवठा होत आहे, प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या सर्व तांत्रिक सुधारणा कराव्यात
आणि शहराला स्वच्छ, शुद्ध
तसंच वेळेवर पाणीपुरवठा करावा, असे निर्देश नगराध्यक्ष प्रेमलता पारवे यांनी दिले आहेत. आज
झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. डाक बंगला परिसराचा विकास आणि
विद्युत विभागांतर्गत नागरिकांच्या अडचणीबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
भारत
आणि इंग्लंड संघात तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना उद्या खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या
या मालिकेत पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना यजमान इंग्लंड संघाने जिंकला आहे. मालिकेतले
पुढचे दोन सामने नऊ तसंच ११ जुलैला होणार असून, त्यानंतर उभय संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही होणार
आहे.
****
No comments:
Post a Comment