Tuesday, 7 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 07 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ जुलै २०२ सकाळी.०० वाजता

****

राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य आपत्कालीन कक्षाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची १७ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची सहा पथकं महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केली आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यानंतर रस्त्यावर साचलेला मलबा हटवण्याचं काम पूर्ण झालं असून, दोन मार्गिकांवरून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी मार्गाची पाहणी करून तो सुरक्षित घोषित केला आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यात पोलादपूर–महाबळेश्वर राज्य महामार्गावरील आंबेनळी घाट अतिवृष्टी, भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन ३१ जुलैपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

**

नाशिक शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. नाशिक शहरात काल रात्री साडे आठ ते आज पहाटे साडे पाच पर्यंत ६१ पूर्णांक आठ मिलीमीटर पाऊस झाला. इगतपुरी परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने निफाड मधल्या नांदूरमध्यमेश्वर मधून पाण्याचा तीन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. काल रात्री त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर किल्ल्यावरील १०० लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं. आज ढगफुटीची शक्यता लक्षात घेता त्र्यंबकेश्वर आणि वणी इथलं सप्तश्रृंगी देवीचं मंदिर बंद राहणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियाच्या दौर्यावर असून, जकार्ता इथल्या राष्ट्रपती भवनात त्यांचं भव्य औपचारिक स्वागत करण्यात आलं. भारत-इंडोनेशिया मैत्रीचं प्रतीक ठरलेल्या या स्वागत सोहळ्यात रस्त्याच्या दुतर्फा लहान मुले आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो आणि पंतप्रधान मोदी यांनी एकमेकांना आपल्या प्रतिनिधीमंडळातल्या सदस्यांची ओळख करून दिली. या औपचारिक भेटीत दोन्ही देशांतील मैत्री, परस्पर विश्वास आणि धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.

****

वाढती महागाई आणि कुटुंबातल्या खर्चांचं बदलत असलेलं प्रमाण या पार्श्वभूमीवर, लाडकी बहीण सारख्या विविध राज्यांनी लागू केलेल्या योजनांचा वेळोवेळी आढावा घेण्याची शिफारस, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं केली आहे. महाराष्ट्र आणि ओडिशामधल्या अशा योजनांचा अभ्यास करणारा अहवाल परिषदेनं काल प्रसिद्ध केला. या योजनांमुळे लाभार्थ्यांच्या बचत आणि खर्चाच्या सवयीत सुधारणा झाल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. या योजनेतून मिळणाऱ्या पैशांमुळे महिलांच्या बचत खात्यात महिना अखेर असणारी रक्कम महाराष्ट्रात ८४ टक्क्यांनी तर ओडिशात ४५ टक्क्यांनी वाढली आहे. तर या लाभार्थ्यांच्या मासिक खर्चात महाराष्ट्रात ४६ टक्के आणि ओडिशात २८ टक्के वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या लाभार्थ्यांचा आरोग्य, शिक्षण, सौंदर्यप्रसाधने, वैद्यकीय उपचार यावरचा खर्च वाढल्याचं यात नमूद आहे.

****

टीईटी पेपर फुटी प्रकरणातल्या चार आरोपींना भिवंडी इथल्या न्यायालयानं १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. धीरज बलराज सिंग, राजीव शाव, आकाशकुमार सरोजकुमार, आणि सुमनकुमारी गुप्ता अशी या आरोपांची नावं आहेत. या प्रकरणात एकूण दहा आरोपी अटक केले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

****

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत एका परदेशी महिला प्रवाशाकडून सुमारे दोन किलो कोकेन जप्त करण्यात आलं असून, त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत साडे दहा कोटी रुपयांहून अधिक आहे.

****

चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर धाराशिव जिल्ह्यात मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी आणि उगवण पूर्ण झाली आहे. मात्र, सध्या जिल्ह्यातल्या काही भागांत शंखी गोगलगाय तसंच वाणी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असून, या किडी रोपावस्थेतील सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातल्या भोगजी तसंच इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून, या किडींच्या समूळ नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सामूहिक स्तरावर तातडीने एकात्मिक कीड व्यवस्थापनाची अंमलबजावणी करावी, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

****

परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पिक विमा नोंदणीचे पोर्टल विलंबाने सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र शासनाने ही मुदतवाढ दिली असून शेतकर्यांनी नोंदणी करुन मुदतवाढीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केलं आहे.

****

क्रोएशियात झाग्रेब इथं ग्रँड टूअर बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या आर. प्रज्ञानंदने साडे एकवीस गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. साडेतेवीस गुण मिळवणारा फ्रान्सचा फिरोझा अलिरेझा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला. भारताचा डी गुकेश या स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर राहिला.

****

No comments:

Post a Comment