▼

Sunday, 12 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.07.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 July 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ जुलै २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले आहेत. या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यातील त्यांची न्यूझीलंड भेट ऐतिहासिक ठरली. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, पर्यटन, क्रीडा, आपत्ती व्यवस्थापन तसंच दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन या पाच क्षेत्रांमध्ये यावेळी १० सामंजस्य करार करण्यात आले. ऑकलण्ड मध्ये भारतीय वंशाच्या १० हजार नागरिकांच्या उपस्थितीत स्पार्क एरिना इथं झालेला कार्यक्रम या दौऱ्याचं प्रमुख आकर्षण ठरला.

****

हैदराबादला एक प्रमुख हाय-स्पीड रेल हब म्हणून विकसित करणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. हैदराबादला पुणे, चेन्नई आणि बेंगळुरूशी जोडणारे बुलेट ट्रेन कॉरिडॉर्स उभारले जाणार आहेत. या हाय-स्पीड रेल्वे नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल आणि दक्षिण भारतातील प्रमुख आर्थिक केंद्रांमधील संपर्क व्यवस्था अधिक बळकट होईल, असं वैष्णव म्हणाले. यावेळी त्यांनी देशातील वाढत्या इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवरही प्रकाश टाकला.

****

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत देशभरातील दोन लाखांहून अधिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना कर्ज मंजुरी देण्यात आली असून या योजनेचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. या योजनेमुळं २० हजार ३०० कोटी रुपयांहून अधिक प्रकल्प गुंतवणूक झाली असून, जवळपास ११ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. देशाच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या विकासासाठी हा एक भक्कम पाया असल्याचं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं काल आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. एकूण लाभार्थ्यांपैकी महिला उद्योजकांचं प्रमाण जवळपास ४४ टक्के असल्याचं पासवान यांनी यावेळी अधोरेखित केलं.

****

राज्यात मान्सूनची गती मंदावल्याने अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावरील काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी अपेक्षित असून, विदर्भातील काही भागांत मात्र मेघगर्जनेसह पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या विस्तारित अंदाजानुसार, १६ ते २२ जुलैदरम्यान राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता कमी असून, पाऊस विभागनिहाय आणि विखुरलेल्या स्वरूपात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी पावसाची प्रतीक्षा आणखी काही दिवस कायम राहण्याची चिन्ह आहेत.

****

शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह बियाण्यांची विक्री केल्याप्रकरणी जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार इथल्या बूस्टर प्लॅट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध अकोला इथल्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात तर मध्यप्रदेशातील रवी सिडस या कंपनीविरूध्द सीटी कोतवाली पोलिस ठाण्यात काल रात्री उशीरा गुन्हे दाखल करण्यात आले. कृषी विभागाकडे संबंधित कंपनीच्या बियाण्यांच्या क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कृषी अधिकाऱ्यांनी बियाण्यांचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवल्यानंतर तपासणीदरम्यान या कंपन्यांच्या बियाणांच्या पाकिटांवरील चुकीच्या दाव्यांसह अनेक त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

****

नंदुरबार जिल्ह्यात शहादा मधल्या समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा तसंच वसतिगृहात काल रात्री अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. रात्रीच्या जेवणानंतर सुमारे ५० विद्यार्थ्यांना अचानक मळमळ, उलट्या आणि अस्वस्थतेचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना तातडीनं शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यातील सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

लंडनमध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि एकमेव महिला कसोटी सामन्यात, भारतानं इंग्लंडचा पहिला डाव १७० धावांत गुंडाळून पहिल्या डावात ११५ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या डावातही भारतानं दमदार सुरुवात करत काल दुसऱ्या दिवस अखेर एक बाद १५४ धावा केल्या.

****

पुरुष क्रिकेटमध्ये, काल रात्री इंग्लंड मधील साऊथम्प्टन इथं झालेल्या पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा ५६ धावांनी पराभव करून पाच सामन्यांची मालिका ४-० अशी जिंकली.

****

No comments:

Post a Comment