▼

Saturday, 18 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

भारतासाठी दहशतवादाविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ हे केवळ एक विधान नसून ती कृतीची एक ठाम भूमिका असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ‘फोर्सेस फर्स्ट कॉन्क्लेव्ह’मध्ये आज ते बोलत होते. भारत केवळ आपल्या सीमेवरच नव्हे, तर गरज पडल्यास दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये घुसूनही त्यांच्यावर प्रहार करेल. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान संपूर्ण जगाने हे पाहिलं आणि ते तांत्रिक युद्धपद्धतीचं एक उत्कृष्ट उदाहरण होतं असं संरक्षण मंत्री म्हणाले. या मोहिमेत ‘आकाशतीर’, ‘आकाश’ क्षेपणास्त्र प्रणाली आणि ‘ब्रह्मोस’ यांसारख्या प्रगत क्षेपणास्त्र प्रणालींसह इतर अनेक अत्याधुनिक संरक्षण उपकरणांचा वापर करण्यात आला होता असंही त्यांनी सांगितलं.

****

शैक्षणिक सुधारणांसाठी प्रदीर्घ उपोषणादरम्यान, तब्येत खालावल्यानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वांगचुक सातत्यानं वैद्यकीय देखरेखेखाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चारू बाम्बा यांनी सांगितलं. वांगचुक शुद्धीवर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले जात असल्याचं त्या म्हणाल्या.

****

भारतातील ‘स्कायरूट एरोस्पेस’ या खाजगी कंपनीने विकसित केलेल्या ‘विक्रम-1’ या पहिल्या खाजगी कक्षीय रॉकेटचं आज सकाळी साडे अकराच्या सुमारास श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. ‘मिशन आगमन’ अंतर्गत झालेल्या या पहिल्याच चाचणी उड्डाणात ‘विक्रम-१’ ने ठरवून दिलेली कक्षा यशस्वीरीत्या गाठली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’च्या सहकार्याने खाजगी क्षेत्राने रचलेला हा एक अत्यंत अभूतपूर्व आणि ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला आहे.

****

डोंबिवली इथं शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य शाखेने सोमवारी २० जुलै रोजी २४ तासांच्या राज्यव्यापी वैद्यकीय सेवा बंदची घोषणा केली आहे. सोमवारी २० जुलै रोजी सकाळी ६ वाजेपासून मंगळवारी २१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे.

बंद दरम्यान राज्यातील सर्व रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग आणि नियोजित शस्त्रक्रिया स्थगित राहतील. मात्र, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, प्रसूती सेवा आणि अन्य जीवनावश्यक उपचार नियमितपणे सुरू राहतील, असं आयएमएने स्पष्ट केलं आहे. डोंबिवलीतील हल्ल्याप्रकरणी आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी आयएमएने केली आहे.

****

शोषित-पीडित-वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ यांचा आज स्मृतीदिन असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर इथंही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विभागीय कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आलं.

****

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील २० प्रकल्प पूर्ण झाले असून, सात प्रकल्प प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना दिली. या योजनेअंतर्गत, राज्यात पाच लाख एकोणऐंशी हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील शहादामधल्या प्रकाशा इथल्या तीर्थक्षेत्र विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयार केलेला ११७ कोटी रुपयांचा विकास आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा वर्षभरावर आला असल्याने या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवून देऊन कामं वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

****

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत समाविष्ट राज्यातल्या २१ जिल्ह्यातल्या निवडक गावांतील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसंच सर्व प्रकारच्या प्रवर्गातील महिला शेतकऱ्यांना केवळ स्वतःचा स्वहिस्सा भरून ठिबक आणि तुषार सिंचन संच उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत डिजिटल चलनाच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा, असं आवाहन प्रकल्प संचालक तथा बीडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी केलं आहे.

****

कोकणात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

****

No comments:

Post a Comment