▼

Saturday, 18 July 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      खते, बियाणे, आणि कीटकनाशकसंदर्भात तक्रारींचं सात दिवसांत निराकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·      पुणे शहरात चारही दिशांची वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन-छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे च्या पहिल्या टप्प्यासह विविध उन्नत महामार्गांचं भूमिपूजन

·      खाजगी क्षेत्राअंतर्गत विकसित विक्रम-1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं यशस्वी उड्डाण

आणि

·      जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. ​​व्ही. सिंधूची अंतिम फेरीत धडक

****

खते, बियाणे, आणि कीटकनाशकसंदर्भात तक्रारींचं सात दिवसांत निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सरकारनं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना केली आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र, महाबीज यांचा प्रतिनिधी, संबंधित कृषी अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना तपासणीवेळी उपस्थित राहणे बंधनकारक असेल. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या १०० पेक्षा अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीने समित्या गठित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

****

पुणे शहरात चारही दिशांची वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. पुणे जिल्ह्यात विविध उन्नत महामार्गांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. याबाबत अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले -

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या योजनांसाठी १६ हजार ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान ५३ किलोमीटर लांबीच्या सहापदरी महामार्गाचा समावेश असून, २४६ किलोमीटर लांबीच्या पुणे-संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे चा हा पहिला टप्पा आहे. हडपसर आणि यवत दरम्यान ३२ किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव–चाकण-शिक्रापूर दरम्यानच्या ५४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे.

****

राज्यातल्या विविध शासकीय परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात करण्यात आलेल्या घोषणेनुसार स्थापन करण्यात आलेल्या या समितीत सामान्य प्रशासन, उच्च आणि तंत्र शिक्षण, वित्त, शालेय शिक्षण आणि क्रीडा, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस महासंचालक आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त यांचा समावेश आहे. या समितीनं आपला अहवाल दोन महिन्यांत शासनाला सादर करायचा आहे.

****

शेतीसाठी पाणी आणि खतांचा वापर मर्यादित करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात एआयचा वापर करता येईल असा विश्वास, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते आज बोलत होते. एआय तसंच ड्रोनच्या वापरामुळे पीकावर पडणाऱ्या रोगांची पूर्वकल्पना येते, विदर्भात ऊस आणि संत्रे शेतीसाठी याचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.

****

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. श्रीकांत हा हिंदी भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, तर मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘परत ४१ च्या मागावर’ या चित्रपटाच्या संगीतासाठी शिवपाल सिंग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. लघुपटांच्या श्रेणीत ‘हमसफर’ या मराठी चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे.

****

खाजगी क्षेत्राअंतर्गत विकसित विक्रम-१ या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं आज आंध्रप्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. स्कायरूट एरोस्पेस या भारतीय कंपनीनं हे रॉकेट पूर्णपणे देशातच तयार केलं असून, कंपनीनंच उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण केली. या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती पूर्णपणे स्वदेशी असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम वन असं ठेवण्यात आलं आहे. या प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. हे ऐतिहासिक यश देशातल्या युवा वर्गाला नवोन्मेषात योगदान देण्यासाठी प्रेरणा देईल असं सांगत, पंतप्रधानांनी विक्रम वन च्या पथकाला भेटीचं निमंत्रणही दिलं आहे.

****

नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्यावर नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषणाला  बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना आज दिल्ली पोलीसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानं, दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात हलवल्याचं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं. वांगचूक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली. 

वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरवात करत असल्याची घोषणा केली. ऑल इंडिया स्टुडेंट असोसिएशननं हे आंदोलन सुरुच राहील असं म्हटलं असून, येत्या सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेवर मोर्चा काढण्याचा निर्धारही कायम असल्याचंही आंदोलकांनी सांगितलं.

****

वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून हलवण्याच्या कारवाईवर अनेक विरोधी पक्षांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा यामध्ये समावेश आहे.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज नागपूरमध्ये रामरक्षा पठण करण्यात आलं. याप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधित करतांना, राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी काशी अयोध्या इथंही रामरक्षा पठण करणार असल्याची माहिती दिली.

****

शेगावच्या गजानन महाराज पालखीचे आज सोलापूर शहरात आगमन झालं. यावेळी पालखीवर फुलांचा वर्षाव आणि रांगोळीच्या काढून भाविकांनी पालखीचं स्वागत केलं. आज प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीनं वारकऱ्यांना महाप्रसादाची ही सोय करण्यात आली आहे.

****

संत एकनाथ महाराज यांच्या पालखीने आज सकाळी अनाळे मुक्कामाहून पुढे वाटचाल सुरू केली. आज दुपारी पाचपिंपळी तसंच पिंपरखेडच्या विसाव्यानंतर पालखी परंडा इथं मुक्कामी पोहोचेल. उद्या सकाळी पालखी बिटरगावकडे मार्गस्थ होईल

****

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त मार्गक्रमण करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमास यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पायी चालून आलेल्या वारकऱ्यांच्या थकलेल्या पायांना आराम मिळावा, त्यांच्या प्रवासातील शारीरिक ताण कमी व्हावा आणि सेवाभावाची परंपरा अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. या सेवेमुळे अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना, युवक मंडळे तसेच नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने दिवसभर वारकऱ्यांची सेवा करत ‘सेवा हीच खरी ईश्वरभक्ती’ हा संदेश कृतीतून दिल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या कौशल्य विकास केंद्रातील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून ईव्ही गाडी तयार केली आहे. वाहन उद्योगाशी निगडीत दोन महिने प्रशिक्षणाच्या, पाच अभ्यासक्रमाच्या ६० विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या ईलेक्ट्रिक कारची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ईव्ही तयार करणाऱ्या टीम मध्ये ३० टक्के मुलींचा सहभाग असल्याचं केंद्र संचालक गिरधारी वाघमारे यांनी सांगितलं.

****

भारताच्या पी. ​​व्ही. सिंधूने जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत, सिंधूने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चीनच्या चेन युफेईविरुद्धचा पहिला गेम २१-१९ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू १५-१० अशी आघाडीवर असतानाच, दुखापतीमुळे चेन युफेईने सामन्यातून माघार घेतली; त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. उद्या सकाळी होणाऱ्या अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्यासोबत होणार आहे.

****

हवामान

मराठवाडा आणि विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे, कोकणातले बहुतांश जिल्हे, तसंच मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment