▼

Sunday, 19 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 19.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 19 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      ७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर; अनेक मराठी चित्रपटांचा गौरव

·      शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांना शिवसेनेत प्रवेश करण्यास परवानगी

·      खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम वन या रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

·      छत्रपती संभाजीनगर –पुणे ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे च्या पहिल्या टप्प्यासह विविध उन्नत महामार्गांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

·      ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन

आणि

·      जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधुची अंतिम फेरीत धडक

****

७२ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. यंदा या पुरस्करांमध्ये मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली आहे. श्रीकांत हा हिंदी भाषेतला उत्कृष्ट चित्रपट ठरला, तर ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘परत ४१ अंशांच्या मागावर’ या चित्रपटाच्या संगीतासाठी शिवपाल सिंग यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. लघुपटांच्या श्रेणीत ‘हमसफर’ या मराठी चित्रपटानं तर बिगर चित्रपटांच्या श्रेणीत ‘भंगार’ या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट पुरस्कार पटकावला आहे.

मनोज मुंतशीर यांना सर्वोत्कृष्ट गीतकार, शाश्वत सचदेव यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार, पुष्पा-दोन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभुषा, “स्वरगंधर्व सुधीर फडके” चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखन, अभय जोधपूरकर यांना ‘घरत गणपती’ चित्रपटातल्या ‘नवसाची गौराई माझी’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक तर मल्याळम् गायिका विजयलक्ष्मी यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार जाहीर झाला आहे. पदार्पणातल्या उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटासाठी रणदीप हुड्डा यांना, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यन आणि ‘ब्रह्मयुगम’ चित्रपटासाठी मामुटी यांना विभागून जाहीर झाला असून, ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी यामी गौतम हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कारही ‘आर्टिकल ३७०’ ला जाहीर झाला असून, सर्वोत्कृष्ट मनोरंजक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार तेलुगू भाषेतल्या ‘कल्की’ चित्रपटाला जाहीर झाला आहे.

****

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा बंडखोर खासदारांना शिवसेनेत प्रवेश करण्यास परवानगी मिळाली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल हा निर्णय दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासोबतच तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडून एन सी पी आय मध्ये प्रवेश केलेल्या २० खासदारांच्या गटाला, स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळाली आहे. संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा गट स्वतंत्र जागेवर बसू शकणार आहे.

दरम्यान, पावसाळी अधिवेशच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अधिवेशन सुरळीत पार पडावं आणि महत्त्वाच्या विधेयकांवर सकारात्मक चर्चा व्हावी, यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सहकार्याची अपेक्षा यावेळी व्यक्त केली जाणार आहे.

****

देशात खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम वन या कक्षीय प्रक्षेपक अर्थात रॉकेटचं काल यशस्वी प्रक्षेपण झालं. मिशन आगमनच्या अंतर्गत स्कायरूट या कंपनीनं हे प्रक्षेपक बनवलं आहे. खासगी कंपनीचं रॉकेट प्रक्षेपित करणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे. स्कायरूटच्या स्वतःच्या स्कोप या यंत्रणेसोबतच ग्रहा स्पेस, कॉस्मोसर्व्ह, डीक्यूब्ड या खाजगी संस्थांचे उपग्रह आणि कॉस्मिक ब्लूम ही एक कलाकृती या प्रक्षेपकानं अवकाशात नेली होती. हैदराबादस्थित स्कायरूट एरोस्पेस या खाजगी कंपनीनं विक्रम वन हे प्रक्षेपक पूर्णपणे देशातच तयार केलं आहे.

विक्रम वन च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या यशाबद्दल स्कायरूट एरोस्पेसचं अभिनंदन केलं आहे.

****

खते, बियाणे, आणि कीटकनाशकसंदर्भात तक्रारींचं सात दिवसांत निराकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांकडून तक्रार आल्यावर आठवडाभरात शेतावर जाऊन तपासणी अहवाल अंतिम केला जाईल, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. एखाद्या तालुक्यात तक्रारींची संख्या १०० पेक्षा अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीने समित्या गठित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

****

पुणे शहरात चारही दिशांची वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात विविध उन्नत महामार्गांचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. याबाबत अधिक माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले..

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

या योजनांसाठी १६ हजार ७०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात खराडी जंक्शन आणि शिरूर बायपास दरम्यान ५३ किलोमीटर लांबीच्या सहापदरी महामार्गाचा समावेश असून, २४६ किलोमीटर लांबीच्या पुणे-संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे चा हा पहिला टप्पा आहे. हडपसर आणि यवत दरम्यान ३२ किलोमीटर लांबीचा रस्ता आणि तळेगाव–चाकण-शिक्रापूर दरम्यानच्या ५४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामांचाही यात समावेश आहे.

****

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं काल पुण्यात निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. २१ ऑगस्ट १९४१ रोजी जन्मलेल्या कुमार सप्तर्षी यांनी नोव्हेंबर १९७६ मध्ये युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. देशात आणीबाणी लावण्यात आल्यानंतर पहिले तीन महिने त्यांनी भूमिगत राहून काम केलं. त्यानंतर १६ महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगांत स्थानबद्ध करण्यात आलं होतं. १९७७ मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी तत्कालीन अहमदनगरचे आमदार म्हणून निवडून आले. १५ ऑगस्ट २००२ रोजी युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष, तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचं निस्वार्थ नेतृत्व हरपलं, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्तर्षी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****

नीट परीक्षा पेपरफुटीच्या मुद्यावर नवी दिल्लीत जंतरमंतर इथं बेमुदत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काल दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरवात करत असल्याची घोषणा केली.

****

शेगावच्या गजानन महाराज यांच्या पालखीचं काल सोलापूर शहरात आगमन झालं. संत एकनाथ महाराजांची पालखी काल परंडा इथं मुक्कामी पोहोचली, आज पालखी बिटरगावकडे मार्गस्थ होईल.

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूर इथं काल दुसरं गोल रिंगण मोठ्या भक्तिभावात पार पडलं. निमगाव केतकी इथं नित्यपूजा आणि आरतीनंतर कस्तुराबाई कदम विद्यालयाच्या मैदानावर लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

****

जालना जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वर्ष २०२६-२७ साठीच्या ५४७ कोटी ९७ लाख रुपयांच्या आराखड्याला काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मंजूर विकासकामे विहित मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मागील तीन वर्षांतल्या रखडलेल्या कामांचा आढावा घेत मुंडे यांनी, संबंधित विभागांना सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

****

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड उपविभागाने राज्यात नववा, तर छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी मतदार गणना पत्रकांचं वितरण, डिजिटायझेशन आणि नियोजनबद्ध अंमलबजावणीच्या बळावर साध्य झाली असून, परभणी जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेच्या कार्यक्षमतेची राज्यभर दखल घेतली जात आहे.

****

भारताच्या पी. व्ही. सिंधूने जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत, सिंधूने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या चीनच्या चेन युफेईविरुद्धचा पहिला गेम २१-१९ अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधू १५-१० अशी आघाडीवर असतानाच, दुखापतीमुळे चेन युफेईने सामन्यातून माघार घेतली; त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आज अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्यासोबत होणार आहे. 

****

क्रिकेट 

भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक – एक नं बरोबरीत आहेत.

****

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे बारा वाजता हा सामना सुरु होईल.

दरम्यान, या स्पर्धेत इंग्लंडनं फ्रान्सला सहा – चार असं पराभूत करत कांस्य पदक पटकावलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथल्या महागामी संस्थेच्या गुरु पार्वती दत्ता यांची शिष्या असलेल्या आद्या शिंदे हिला, केंद्र सरकारची 'सांस्कृतिक क्षेत्रातील तरुण कलाकारांसाठीची शिष्यवृत्ती' जाहीर झाली आहे.

****

हवामान

मराठवाड्यात बीड परभणी, आणि हिंगोलीसह पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, पुणे, आणि विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, काल छत्रपती संभाजीनगरसह जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या.

****

No comments:

Post a Comment