▼

Wednesday, 22 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.07.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 22 July 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जुलै २०२६ दुपारी १.०० वा.

****

नीट पेपरफुटी प्रकरणासह विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच विरोधकांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना कामकाज सुरळीत चालू देण्याचं आवाहन केलं, मात्र गदारोळ वाढत गेल्यानं सदनाचं कामकाज सुरवातीला १२ वाजेपर्यंत, आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

राज्यसभेत सभापती सी पी राधाकृष्णन यांनी सिक्कीममधल्या नामची जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

देशातल्या पहिल्या स्वदेशी विकसित हायड्रोजन रेल्वेच्या प्रारंभाबद्दल सभापतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या प्रकल्पाशी संबंधित सर्वांचं अभिनंदन केलं.

त्यानंतर विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतल्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावरुन झालेल्या गदारोळामुळे सभापतींनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.

****

आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी – SDRF अंतर्गत महाराष्ट्राला पाच हजार ७१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. यामध्ये केंद्र सरकारचा चार हजार २८८ कोटी आणि राज्य सरकारचा एक हजार ४२९ कोटी इतका वाटा आहे.

दरम्यान, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर – ICAR ने सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असलेल्या १४ राज्यांतल्या ३४२ जिल्ह्यांसाठी जिल्हास्तरीय कृषी आपत्कालीन योजना अद्ययावत केल्या आहेत. तसंच कृषी विज्ञान केंद्रांसाठी मानक कार्यपद्धती देखील जारी करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी पिकांचं विविधीकरण, कमी कालावधीची आणि दुष्काळ-प्रतिरोधक वाण, संतुलित खतांचा वापर, जलसंधारण, सूक्ष्म सिंचन, आच्छादन, आंतरपीक पद्धती आणि हवामान-अनुकूल तंत्रज्ञान यांचा अधिकाधिक अवलंब करावा, असं आवाहन करण्यात आल्याचं ठाकूर यांनी या उत्तरात सांगितलं.

****

आयएनएस मालवण ही पाणबुडीरोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली. कर्नाटकातील कारवार इथं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत या युद्धनौकेचं जलावतरण करण्यात आलं. ही अँटी-सबमरीन शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकारातली दुसरी युद्धनौका असून, तिची निर्मिती कोची इथल्या कोचीन शिपयार्ड लिमिटेड इथं करण्यात आली आहे. या युद्धनौकेच्या निर्मितीत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, आत्मनिर्भर भारत उपक्रमाला मोठं बळ मिळालं आहे.

या यशाबद्दल एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी नौदलाचं कौतूक करत आईएनएस मालवण ही युध्यनौका भारतीय किनाऱ्यांचं सक्षमपणे संरक्षण करेल असा विश्वास व्यक्त केला.

****

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना आदरांजली वाहिली. समाजसेवा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार यांचं योगदान उल्लेखनीय होतं, राज्यातलं एनडीए सरकार त्यांच्या विकासदृष्टीची पूर्तता करण्यासाठी अथक परिश्रम घेत असल्याचं पंतप्रधानांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कुटुंबीयांसह बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विविध क्षेत्रांत विकासाची नवी शिखरे गाठत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

****

सांगली अपर तहसील कार्यालयाच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचं उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध दाखल्यांचं वितरण तसंच आधार किटचं वाटप करण्यात आलं.

****

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीत पी व्ही सिंधू आणि उन्नती हुडा या दोन भारतीय खेळाडुंमध्ये सामना होणार आहे. पुरुष एकेरीत आज झालेल्या सामन्यात भारताच्या आयुष शेट्टीने इंडोनेशियाच्या ए फरहान याचा २१–१७, पाच–२१, २१–१७ असा पराभव केला. लक्ष्य सेनचा सामना आज जपानच्या वाय तनाका याच्याशी होणार आहे.

****

नाशिक शहर तसंच परिसरात मागील २४ तासात २७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्यानं गंगापूर धरण ७९ पूर्णांक ६३ टक्के, दारणा ७४ पूर्णांक २६, गौतमी ९१, भावली १००, कश्यपी ५३, तर कडवा धरण ७८ टक्के भरलं आहे. कडवा, भावली, पालखेड, पुणेगाव आणि दारणा या धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरु करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment