▼

Wednesday, 22 July 2026

Text -आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २२ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      नीट पेपरफुटी आणि आंदोलनाच्या मुद्यावरून संसदेतला गदारोळ आजही कायम

·      विरोधकांकडून सदनात चर्चा टाळण्याचा प्रयत्न असल्याची सरकारची टीका

·      सत्ताधारी तसंच विरोधकांकडून देशभर विविध ठिकाणी परस्पर विरोधी आंदोलन

·      दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

आणि

·      शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची प्रातिनिधिक पहिली यादी आज जाहीर

****

नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर कारवाईच्या मुद्यावरून संसदेत विरोधकांचा गदारोळ आजही कायम राहिला. लोकसभा तसंच राज्यसभेत कामकाज सुरू होताच, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी सुरू केली. लोकसभेत के सी वेणुगोपाल यांनी या प्रकरणी सदनात चर्चेची मागणी केली. तर राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी याप्रकरणी पारदर्शक चर्चेसाठी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी सरकारची या मुद्यावर चर्चेची तयारी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले -

बाईट - संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू

 

रिजीजू यांच्या या निवेदनानंतरही विरोधकांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं, दोन्ही सदनांचं कामकाज आधी बारा आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

दोन वाजेनंतर लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर, तालिका अध्यक्षांनी, खासदार कल्याण बॅनर्जी यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींची सदनाला माहिती दिली. बॅनर्जी यांना महिला खासदारांबाबत आक्षेपार्ही विधान तसंच आक्षेपार्ही कृती केल्याबद्दल अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेत मात्र गदारोळामुळे दोन वाजेनंतर कामकाज पुन्हा एकदा तीन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं. चर्चेची तयारी असल्याचं दाखवून काँग्रेस पक्षाच्या वतीने चर्चेसाठी वेगवेगळ्या अटी घालून चर्चा टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं, रिजीजू यांनी सांगितलं. यानंतरही गदारोळ सुरू राहिल्याने उपसभापतींनी सदनाचं कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब केलं.

 

या प्रकरणी राज्यसभेत बोलतांना सदनाचे नेते जे पी नड्डा यांनी विरोधकांची वर्तवणूक बेजबाबदारपणाची आहे, अशी टीका केली. विरोधकांच्या लोकशाही विरोधी कारवायांचा तीव्र निषेध करत असल्याचं नड्डा यांनी सांगितलं.

 

काँग्रेस पक्षाच्या या भूमिकेच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज काँग्रेस पक्ष कार्यालयांसमोर तसंच काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आलं. मुंबईत भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली.

 

छत्रपती संभाजीनगर इथं भाजपच्या वतीने शहागंज इथं गांधी भवन परिसरात निदर्शनं करण्यात आली. या वेळी पक्षाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. तर काँग्रेस पक्षानेही सरकारच्या विरोधात क्रांती चौकात निदर्शनं केली.

 

बीड इथं काँग्रेसच्या माजी खासदार रजनी पाटील यांच्या निवासस्थानासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रजनी पाटील यांच्या निवासस्थान परिसरात बंदोबस्त ठेवला होता.

तर माजलगाव इथं विद्यार्थी, समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीनं केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध रॅली काढण्यात आली. दिल्लीतील जंतर-मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला या आंदोलकांनी पाठिंबा जाहीर केला.

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं बहुजन विकास अभियानाच्या वतीने आज सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या घटनेचा निषेध नोंदवत उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं.

****

दरम्यान, नीट निकालातील गोंधळाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या गंभीर प्रकरणाची तात्काळ स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून स्पष्टीकरण मागवावं, अशी मागणी सोनवणे यांनी या पत्रात केली आहे.

****

मध्यप्रदेशातील कोट्यवधी रुपयांच्या बहुचर्चित फोर्टिफाइड तांदूळ घोटाळाप्रकरणी गोंदिया जिल्ह्यातील दोन राइस मिल चालकांना अटक केली आहे. खंडेलवाल राइस मिलचे संचालक किशनलाल खंडेलवाल आणि जुगल खंडेलवाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष तपास पथकाने केलेल्या या कारवाईमुळे गोंदियातील तांदूळ व्यावसायिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या बहुचर्चित फोर्टिफाइड तांदूळ घोटाळाप्रकरणी आरोपींची संख्या १० वर पोहचल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती इथं अजित पवार यांच्या स्मृतिस्थळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक माध्यमावरून अजित पवार यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. मुंबईत विधान भवनात, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहीर, यांनी अजित पवार यांना अभिवादन केलं.

दिल्लीत महाराष्ट्र सदनातील सभागृहात निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.

****

छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, आदी ठिकाणाही अजित पवार यांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आलं.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली यादी आज जाहीर करण्यात येत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या औचित्याने प्रातिनिधिक ५३३ शेतकऱ्यांची ही यादी आहे. सदरच्या याद्या गावपातळीवर ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था कार्यालय तसेच संबंधित बँकेच्या शाखेत प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदर यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्याचे आधार क्रमांक किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारे आधार प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सुमारे ३२ हजार आपले सरकार सेवा केंद्रातून पात्र लाभार्थ्यांनी आधार प्रमाणिकरण करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. याप्रमाणे आधार प्रमाणिकरण करणेपूर्वी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक वरील नोंदणी आवश्यक आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर लाभाची रक्कम DBT द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बाबतीतली संपूर्ण प्रक्रिया येत्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व व्यापारी बँकांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड-महागाव विधानसभा क्षेत्रातील ५७ हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अपघात विमा काढण्याचा उपक्रम भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी सुरू केला. स्वातंत्र्य सैनिक स्व. बंकटलालजी भूतडा ट्रस्टच्या माध्यमातून प्रति शेतकरी दोन लाख रुपये प्रमाणे १ हजार १४० कोटी रुपयांचा हा अपघात विमा २२ ऑगस्ट पर्यंत काढण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, हरित महोत्सव आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत.

****

मराठवाड्यात धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर या नवीन रेल्वेमार्गासाठी डीपीआर तयार करण्यासाठी आवश्यक सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या संदर्भात प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू करण्यात आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आयएनएस मालवण ही पाणबुडीरोधक युद्धनौका आज भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली. कर्नाटकातील कारवार इथं हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत या युद्धनौकेचं जलावतरण करण्यात आलं. या युद्धनौकेच्या निर्मितीत ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

****

चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज महिला एकेरीत पी व्ही सिंधूने भारताच्या उन्नती हुडावर २१-१४, ९-२१, २१-१० असा विजय मिळवला. पुरुष एकेरीत भारताच्या आयुष शेट्टीने इंडोनेशियाच्या ए फरहान याचा २१–१७, पाच–२१, २१–१७ असा पराभव केला. लक्ष्य सेनचा सामना आज जपानच्या वाय तनाका याच्याशी होणार आहे.

****

स्क्वॅश च्या जागतिक कनिष्ठगट अजिंक्यपद स्पर्धेत भारताची अनाहत सिंह तसंच आर्यवीर दिवाण यांनी आपापल्या गटात उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अनाहतचा पुढचा सामना मलेशियाच्या खेळाडूसोबत तर आर्यवीरचा पुढचा सामना अमेरीकेच्या खेळाडूसोबत होणार आहे.

****

हवामान

हवामान विभागानं आज पालघर, नाशिक आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, नागपूर तसंच कोल्हापूर आणि साताऱ्याचा घाट परिसर आज ऑरेंज अलर्ट आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. 

****

No comments:

Post a Comment