Thursday, 2 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते व्हीबी जी राम जी योजनेचं औपचारिक उद्धाटन

·      महिला शेतकरी सक्षमीकरण हे विधेयकमहिला शेतकऱ्याच्या श्रमाला ऐतिहासिक न्याय असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं प्रतिपादन

·      शेती तसंच गैरव्यावसायिक कामांकरता गौण खनिजावर स्वामित्व शुल्क माफीचा सरकारचा निर्णय

·      राज्यशासनाकडून सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्याची घोषणा

·      टीईटी पेपर फुटी प्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक

आणि

·      हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचा धक्का-प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन

****

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी राम जी योजनेचं औपचारिक उद्धाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन  कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी राम जी कार्डांचं वाटप करण्यात आलं. तसंच जी राम जी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. या योजनेमुळे लाभार्थींना रोजगाराची हमी तर मिळेलच, शिवाय गावाचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला, ते म्हणाले -

बाईट - केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

राज्यातही आज अनेक ठिकाणी या योजनेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं.

****

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण हे विधेयकमहिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केलं आहे. आज विधानसभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मांडलेल्या महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत करुन त्याला पाठिंबा देतांना उपमुख्यमंत्री पवार बोलत होत्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही. केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केलं. त्या म्हणाल्या -

बाईट - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या चर्चेला सुरुवात करताना, महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलंच राज्य असल्याचं सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली असून, स्वत:ची शेतजमीन नसली तरी शेतीशी निगडित कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशूपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दुग्धोत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषिमंत्र्यांनी सांगितलं. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. यात एकल महिला शेतकऱ्यांवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली.

दरम्यान, या विधेयकावरच्या चर्चेत मंत्री पंकजा मुंडे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सुलभा घोडके, मनिषा चौधरी, श्वेता महाले यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे मारहाण आणि मृत्यू प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनातून दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून ७ आरोपींना अटक झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

****

शेती आणि गैरव्यवसायिक कामांकरता गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेत रस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यवसायिक कामासाठी करता येईल यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि १५ दिवसात त्यांना मंजुरी मिळेल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

****

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ५२ च्या भूसंपादनात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलेल्या अपहाराची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य प्रकाश सोळंके, राजेश क्षीरसागर, अमित देशमुख, यांच्यासह इतर सदस्यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. याप्रकरणी पाठक यांच्यावर कारवाई केल्याचं, तसंच सदर रकमेची वसुली प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

****

संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी 'सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार' सुरू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली. १० लाख रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असेल. पुरस्काराचे पात्रता निकष आणि पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहितीही शेलार यांनी दिली. दरवर्षी हा पुरस्कार आशा भोसले यांच्या जयंतीचं औचित्य साधून ८ सप्टेंबर किंवा त्या तारखेच्या जवळ प्रदान करण्यात येईल, संही शेलार यांनी सांगितलं.

****

मराठी भाषा भवनाचं काम वेगाने सुरू असून डिसेंबर २०२७ पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल, तसंच ऐरोली इथं भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत या विषयावरच्या अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या ८ ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्रं स्थापन करायचा निर्णय सरकारने घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल, तसंच लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कार्यवाही २ वर्षांत पूर्ण होईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले -

बाईट - उदय सामंत

****

टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली. फरार आरोपी कपिल दहिया याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी जम्मू थून त्याला अटक केली. या प्रकरणाशी संबंधित आणखी दोन आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधील पाटणा थून ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून, या आरोपींच्या चौकशीतून टीईटी पेपर फुटीशी संबंधित आणखी महत्त्वाचे अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या २५ गावांमध्ये आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी ३ पूर्णांक ६ रिश्टर तीव्रतेचा, तर सकाळी १० वाजून १४ मिनिटांनी ३ पूर्णांक ५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

धाराशिव जिल्ह्याच्या काही भागांत आज सकाळी भूगर्भातून गूढ आवाज ऐकू आल्याचीसंच भूकंपासदृश धक्का जाणवल्याच्या माहितीची जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत राष्ट्रीय भूकंपविज्ञान केंद्राकडून पडताळणी केली. जिल्ह्यात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झाली नसल्याचं जिल्हा प्रशासनाने त्यानंतर स्पष्ट केलं. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, फक्त प्रशासनाकडून अधिकृतपणे जारी करण्यात येणाऱ्या सूचना आणि माहितीलाच प्राधान्य द्यावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.

****

आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. काल १ जुलैपासून या विशेष आरोग्य मोहिमेला सुरुवात झाली. जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या ४५ दिंड्यांमधील सुमारे १२ हजार वारकऱ्यांसाठी ही विशेष आरोग्य सेवा दिली जात आहे. यासाठी पालखी मार्गावर फिरती वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि कार्डियाक रुग्णवाहिका तैनात असणार आहेत.

****

हिंगोली बस स्थानकात एका वाहकाला टोळक्याने मारहाण केल्याच्या कारणावरून एसटी कर्मचाऱ्यांनी आगाराचं प्रवेशद्वार बंद करत आंदोलन केलं. या आंदोलनामुळे चार तासांहून अधिक काळ बससेवा ठप्प झाली होती. मारहाण करणाऱ्या काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

****

हवामान

मराठवाड्यात धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याच काळात विदर्भ तसंच कोकणातल्या बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला पुढचे तीन दिवस, तर बीड आणि परभणी जिल्ह्याला पुढचे दोन दिवस हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

****

No comments:

Post a Comment