Friday, 3 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 03 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ जुलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

·      शेती तसंच गैरव्यावसायिक कामांकरता गौण खनिजावर स्वामित्व शुल्क माफीचा सरकारचा निर्णय

·      राज्यशासनाकडून सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करण्याची घोषणा

·      केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते व्हीबी जी राम जी योजनेचं औपचारिक उद्धाटन

आणि

·      मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट 

****

महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक २०२६ काल विधानसभेत एकमताने मंजूर झालं. या विधेयकामुळे शेती आणि कृषीसंलग्न क्षेत्रात कार्यरत महिलांना कर्ज, पीक विमा, विविध शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळणार आहे. तसेच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी स्वतंत्र मदतकेंद्रे आणि तक्रार निवारण यंत्रणाही स्थापन करण्यात येणार आहे. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली असून, स्वत:ची शेतजमीन नसली तरी शेतीशी निगडित कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार असल्याचं, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधेयक सादर करताना सांगितलं. ते म्हणाले,

बाईट – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

 

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं.

हे विधेयक केवळ कायदा नसून महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला खंबीरपणे उभे ठेवणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या श्रम, सन्मान आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं त्या म्हणाल्या.

हा कायदा लागू झाल्यानंतर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र, कृषीसाठी अर्थसहाय्य मिळणार असून एकल महिला शेतकऱ्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे.

या विधेयकावरच्या चर्चेत मंत्री पंकजा मुंडे, आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सुलभा घोडके, मनिषा चौधरी, श्वेता महाले यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला.

**

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ तिसरी सुधारणा विधेयकही काल विधानसभेनं संमत केलं. विधान परिषदेने हे विधेयक यापूर्वीच संमत केलं आहे.

**

शेती आणि गैरव्यवसायिक कामांकरता गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही माहिती दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेत रस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि १५ दिवसात त्यांना मंजुरी मिळेल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे मारहाण आणि मृत्यू प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत लेखी निवेदनातून दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या प्रकरणी एकंदर आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सात आरोपींना अटक झाल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

**

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ५२ च्या भूसंपादनात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलेल्या अपहाराची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. सदस्य प्रकाश सोळंके, राजेश क्षीरसागर, अमित देशमुख, यांच्यासह इतर सदस्यांनी याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. याप्रकरणी पाठक यांच्यावर कारवाई केल्याचं, तसंच सदर रकमेची वसुली प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली.

**

पॉलीटेक्निक अर्थात अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या सहा जुलै पर्यंत वाढवण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. ही मुदत काल संपणार होती, मात्र विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी आणि प्रवेश प्रक्रियेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

**

संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार' सुरू करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली. १० लाख रुपये, शाल आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असेल. दरवर्षी हा पुरस्कार आशा भोसले यांच्या जयंतीचं औचित्य साधून आठ सप्टेंबर किंवा त्या तारखेच्या जवळ प्रदान करण्यात येईल, असंही शेलार यांनी सांगितलं.

****

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत रोजगार आणि उपजिविका हमी ग्रामीण – व्हीबीजीरामजी योजनेचं औपचारिक उद्धाटन झालं. काल आंध्रप्रदेशात तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी राम जी कार्डांचं वाटप करण्यात आलं. तसंच जी राम जी पोर्टलचं उद्घाटनही झालं. या योजनेमुळे लाभार्थींना रोजगाराची हमी तर मिळेलच, शिवाय गावाचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास चौहान यांनी व्यक्त केला, ते म्हणाले…

बाईट- केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

**

राज्यातही काल अनेक ठिकाणी या योजनेचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं.

लातूर इथं घरकुल आणि सिंचन विहीर कामांचं ई-मस्टर काढून या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या हस्ते योजनेच्या घडीपुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं.

**

जालना तालुक्यातल्या उटवद इथं जिल्हाधिकारी आशिमा मत्तिल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारीया यांच्या हस्ते व्ही बी जी राम जी योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकार्यांनी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका आणि हवामान बदल या चार प्रमुख क्षेत्रांवर योजनेत भर देण्यात आल्याचं सांगितलं.

****

आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या एक हजार ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी दोन कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचा काल हिंगोली जिल्ह्यात दिग्रस कराळे इथं मुक्काम होता, आज ही पालखी औंढा तालुक्यातल्या जवळाबाजार इथं मुक्काम करून परभणी जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे. 

छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव जिल्ह्यातून विविध पालख्यांसोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षित, तत्पर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म कृती आराखडा तयार केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्ययावत करण्याचं काम सुरू झालं आहे. २९ जुलै पर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी केलं आहे. ते म्हणाले…

बाईट- जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी

 

धाराशिव जिल्ह्यात एक हजार ५२३ बूथ स्तरावरील कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून, १५२ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. बुथस्तरीय कर्मचाऱ्यांसोबत बुथस्तरीय राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मदत करणार आहेत. जिल्ह्यातल्या नागरिकांनी यासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असं आवाहन धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे.

****

टीईटी पेपर फुटी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काल आणखी तीन आरोपींना अटक केली. फरार आरोपी कपिल दहिया याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. या प्रकरणाशी संबंधित आणखी दोन आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत, औंढा नागनाथ आणि कळमनुरी तालुक्यातल्या २५ गावांमध्ये काल भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

****

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी केलं आहे.

****

No comments:

Post a Comment