Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 July 2026
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती
संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ११ जुलै २०२६ सायंकाळी
६.१०
****
· अॅक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्र्यांची
ग्वाही
· वाहतुक क्षेत्र सक्षम करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अद्ययावत
तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची देवाणघेवाण
· राज्यातल्या ४५ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण
· हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा भूकंपाचा धक्का
आणि
· मोनॅको ‘डायमंड लीग’ स्पर्धेत
भारताचा उंच उडीपटू सर्वेश कुशारे तृतीय
****
अॅक्युपंक्चर उपचार पद्धती
या ज्ञानशाखेचा विस्तार तसंच या उपचार पद्धतीचे शैक्षणिक मार्ग वृद्धिंगत व्हावेत, या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असून यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल
अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर
आंतरराष्ट्रीय कन्व्हेंन्शन सेंटरमध्ये अॅक्युपंक्चर विषयावरील अॅक्यूकॉन या राष्ट्रीय
परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. आपण प्रत्यक्ष जे डोळ्याने पाहतो, त्यावर विश्वास दृढ करतो. अॅक्युपंक्चर उपचार पद्धती ही अशीच अनुभूतीची उपचार
पद्धती असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
दरम्यान, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे देशातील सर्वात मोठे इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन
अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरातील दाभा परिसरात उभारलं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत
नागपूर जिल्ह्यासह राज्यातल्या अन्य जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना बिहारमधील महाबोधी
विहार,
बोधगया इथे घेऊन जाणाऱ्या विशेष रेल्वेला मुख्यमंत्री फडणवीस
यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. नागपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या
या कार्यक्रमात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थिती होते. या विशेष रेल्वेने ८०० लाभार्थी महाबोधी
तीर्थयात्रेसाठी रवाना झाले.
****
वाहतुक क्षेत्र अधिक सक्षम आणि
शाश्वत करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची
देवाणघेवाण केली जात असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री
नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्याच्या परिषदेला आज
नागपूर इथं सुरूवात झाली. गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव-इंधने
आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण
करण्याच्या प्रयत्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या बैठकीत
‘ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र २०२६’ देखील स्वीकारण्यात आल्याचं
गडकरी यांनी सांगितलं.
****
राज्यात खरीप हंगामातल्या पेरणीच्या
कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या ७ जुलैच्या अहवालानुसार, राज्यातल्या ६५ लाख ११ हजार ८७२ हेक्टर, म्हणजेच
४५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक ५८ टक्के पेरणी
झाली असून,
त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी
५० टक्के,
लातूर विभागात ४४ टक्के, नागपूर
विभागात ३९ टक्के, पुणे विभागात २२ टक्के, कोल्हापूर विभागात १५ टक्के, तर कोकण विभागात केवळ ४ टक्के
पेरणी झाली आहे.
यामध्ये तेलबिया ६० टक्के, कापूस ४९ टक्के, कडधान्य ३७ टक्के आणि तृणधान्यांची ३० टक्के
पेरणी झाली आहे. ६५ लाख ८२ हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे.
गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या
पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून, पुढील
काही दिवसांत पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
****
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश
परीक्षा कक्षातर्फे उच्च शिक्षणांतर्गत येणाऱ्या तीन वर्षांचा विधी अभ्यासक्रम बीपीएड
आणि एमपीएड या तीन अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला येत्या
१३ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा दिलेल्या
पात्र विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करावी, असं आवाहन सीईटी कक्षाने केलं आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी ५९ हजार ११७ विद्यार्थ्यांनी
नोंदणी केली आहे.
****
लातूर शहरात ‘सहकार संकुल’ इमारतीचं भूमिपूजन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे
भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. सुमारे २० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारं हे
संकुल ४ हजार ७०० चौरस मीटर जागेवर उभारलं जाणार असून, या
संकुलात सहकार विभागाची ११ कार्यालयं एकाच ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा
भूकंपाचा धक्का बसला. आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास जिल्ह्याला भूकंपाचे
हादरे जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातील ‘वसई’ इथे असून,
भूकंपमापक यंत्रावर ३ पूर्णांक ५ एवढी तीव्रता तर ५ किलोमीटर
खोली नोंदवली गेली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या भूकंपांमुळे कोणतीही जीवित
किंवा वित्तहानी झालेली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील
मुक्काम संपवून आज सकाळी पुढं मार्गस्थ झाल्या.
दरम्यान संत मुक्ताई यांच्या
पालखीचं बीड शहरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. या पालखीचा मुक्काम आज
आणि उद्या बीड इथं असणार आहे. परवा पहाटे आरतीनंतर पालखी पुढील मुक्कामासाठी पालीच्या
दिशेने प्रस्थान करेल.
पैठणच्या संत एकनाथ महाराजांची
पालखी बीड जिल्ह्यात कासळवाडी दहिवंडी, शिरुर कासार, कोळवाडी मार्गे वाटचाल करत आहे. पालखी आज राक्षसभुवन इथे मुक्कामी असणार आहे.
****
मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण
कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील कामाला मोठी गती मिळाली असून ऐंशी टक्क्यांहून
अधिक काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यातील १५ लाख
४१ हजार ७ मतदारांपैकी १२ लाख ४० हजार २११ मतदारांचे गणना विवरण पत्र, वितरीत करण्यात आले आहेत. तसंच ३ लाख २३
हजार २९४ विवरणपत्रांचं डिजिटायझेशन, तर ३ लाख २२ हजार ४४९
फॉर्मची पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.
****
‘ओबीसी जनगणना: काळाची गरज’ या विषयावर आज बीड इथं एक दिवसीय विशेष चर्चासत्र घेण्यात आलं. ज्येष्ठ ओबीसी नेत्या
सुशीला मोराळे यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. आगामी जनगणनेच्या अर्जामध्ये
ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट केला जावा हा ठराव सर्वानुमते मंजूर करून
तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय या चर्चासत्रात घेण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
पैठण इथल्या संतपीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून संत नामदेव गाथा परिचय, संत तत्वज्ञान आणि सांप्रदायिक संगीत हे तीन नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत.
या संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन पुढील पाच वर्षांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाकडे सोपवण्यात आलं आहे.
****
भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय
विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या ‘डायमंड लीग’ ॲथलेटिक्स
स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा
तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.
****
लंडनमघ्ये लॉर्ड्स मैदानावर
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात
उपाहारापर्यंत पाच बाद १३७ धावा झाल्या आहेत. यजमान संघ पहिल्या डावात अद्याप १४८ धावांनी
पिछाडीवर आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड पुरुष संघात ५ टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना
आज होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडने ३-०
अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.
****
फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व
फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत
होणार आहे. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या २० तारखेला होणार आहे.
****
हवामान
राज्यात मुंबईसह कोकण आणि पश्चिम
महाराष्ट्रात पुढचे काही दिवस मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात पुढचे तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात
आला आहे. इतर जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना
उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment