▼

Sunday, 12 July 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 12.07.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 12 July 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीच्या विस्तारासाठी राज्य शासन प्रयत्नशील-मुख्यमंत्र्यांची ग्वाही

·      वाहतुक क्षेत्र सक्षम करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची देवाणघेवाण

·         राज्यातल्या ४५ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण

आणि

·      लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात भारताकडे २६९ धावांची आघाडी

****

अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धती या ज्ञानशाखेचा विस्तार तसंच या उपचार पद्धतीचे शैक्षणिक मार्ग वृद्धिंगत व्हावेत, या दृष्टीने राज्य शासन प्रयत्नशील असून, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंन्शन सेंटरमध्ये अ‍ॅक्युपंक्चर विषयावरील अॅक्यूकॉन या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आपण प्रत्यक्ष जे डोळ्याने पाहतो, त्यावर विश्वास दृढ करतो. अ‍ॅक्युपंक्चर उपचार पद्धती ही अशीच अनुभूतीची उपचार पद्धती असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असं देशातलं सर्वात मोठं इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरल कन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर नागपुरात दाभा परिसरात उभारलं जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल या कामाची पाहणी करून कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं.

****

वाहतुक क्षेत्र अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांची देवाणघेवाण केली जात असल्याचं, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्याच्या परिषदेला काल नागपूर इथं सुरूवात झाली, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन गडकरी बोलत होते. पर्यायी जैव-इंधने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती गडकरी यांनी दिली. या बैठकीत ‘ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र २०२६’ देखील स्वीकारण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

राज्यात खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या सात जुलैच्या अहवालानुसार, राज्यातल्या ६५ लाख ११ हजार ८७२ हेक्टर, म्हणजेच ४५ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक ५८ टक्के पेरणी झाली असून, त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी ५० टक्के, लातूर विभागात ४४ टक्के, नागपूर विभागात ३९ टक्के, पुणे विभागात २२ टक्के, कोल्हापूर विभागात १५ टक्के, तर कोकण विभागात केवळ ४ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये तेलबिया ६० टक्के, कापूस ४९ टक्के, कडधान्य ३७ टक्के आणि तृणधान्यांची ३० टक्के पेरणी झाली आहे. ६५ लाख ८२ हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे.

गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून, पुढील काही दिवसांत पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

****

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे उच्च शिक्षणांतर्गत येणाऱ्या तीन वर्षांचा विधी अभ्यासक्रम बीपीएड आणि एमपीएड या तीन अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीला येत्या १३ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधित अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा दिलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी करावी, असं आवाहन सीईटी कक्षाने केलं आहे.

****

लातूर शहरात ‘सहकार संकुल’ इमारतीचं भूमिपूजन पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. सुमारे २० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारं हे संकुल चार हजार ७०० चौरस मीटर जागेवर उभारलं जाणार असून, या संकुलात सहकार विभागाची ११ कार्यालयं एकाच ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.

दरम्यान, लातूरला पिण्यासाठी उजनी धरणाचं पाणी मिळावं, ही जुनी मागणी असून गरज भासल्यास याबाबत पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, या पर्यायासोबतच नदीजोड प्रकल्पांतर्गत लातूरसाठी उपलब्ध पर्यायांचाही सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचं भोसले यांनी यावेळी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्याला काल पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या ‘वसई’ इथं असून, भूकंपमापक यंत्रावर तीन पूर्णांक पाच एवढी तीव्रता तर ५ किलोमीटर खोली नोंदवली गेली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.​ या भूकंपांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अर्थात महाऊर्जा यांनी पालखी सोहळ्यात सहभागी दिंडींसाठी सौरऊर्जेवर आधारित मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील स्वखर्चातून पाच अत्याधुनिक मोबाईल चार्जिंग व्हॅन वारकऱ्यांच्या सेवेसाठी दिल्या आहेत. या वाहनात एकाच वेळी १०० मोबाईल चार्ज करण्याची क्षमता आहे.

****

दरम्यान, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ झाल्या आहेत. तुकोबांची पालखी आज हडपसरहून तर माऊलींची पालखी सासवडहून पुढे रवाना होईल.

श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर इथं दाखल झाली. बेसिक ट्रेनिंग रेजिमेंट या लष्करी संस्थेच्या वतीने वारकऱ्यांना फराळ तसंच पाण्याचं वाटप करण्यात आलं.

संत मुक्ताई यांच्या पालखीचं काल बीड शहरात आगमन झालं.

पैठणच्या संत एकनाथ महाराजांची पालखीही आज बीड जिल्ह्यात राक्षसभुवन इथल्या मुक्कामावरून पुढे रवाना होईल.

****

पुण्यात मोशी कचरा डेपो इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सात जणांचे मृतदेह सापडले असून, एका व्यक्तीचा अद्यापही शोध सुरू आहे. कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून ही दुर्घटना घडली.

****

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातल्या कामाला मोठी गती मिळाली असून, ऐंशी टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यातल्या १५ लाख ४१ हजार सात मतदारांपैकी १२ लाख ४० हजार २११ मतदारांची गणना विवरण पत्र, वितरीत करण्यात आली आहेत.

बीड जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडून विशेष शिबीरं, घरभेटी आणि जनजागृतीच्या माध्यमातून गणना प्रपत्र भरण्याचं काम सुरू आहे. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पाली इथं विशेष शिबिराला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली.

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून राबवण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांत घेण्यात आला. संभाव्य एल निनो परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचं नियोजनपूर्वक व्यवस्थापन करावं, असं आवाहन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणि यांनी केलं.

****

‘ओबीसी जनगणना: काळाची गरज’ या विषयावर काल बीड इथं एक दिवसीय विशेष चर्चासत्र घेण्यात आलं. ज्येष्ठ ओबीसी नेत्या सुशीला मोराळे यांच्या हस्ते या चर्चासत्राचं उद्घाटन झालं. आगामी जनगणनेच्या अर्जामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना समाविष्ट केला जावा हा ठराव सर्वानुमते मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्याचा निर्णय या चर्चासत्रात घेण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या संतपीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून संत नामदेव गाथा परिचय, संत तत्वज्ञान आणि सांप्रदायिक संगीत हे तीन नवीन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन पुढील पाच वर्षांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपवण्यात आलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात जवळा इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागाने अजिंक्यराणा मिल्क इंडस्ट्रीज या आस्थापनेवर कारवाई करत सुमारे १५ लाख रुपये किमतीचा ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दुधसाठा जागेवरच नष्ट केला. त्रुटीची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देशही या आस्थापनेला देण्यात आले आहेत.

****

लातूर तालुक्यात खंडापूर इथल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवातील कथित ३ कोटी ६५ लाख रुपयांच्या देणगी अपहार प्रकरणातला मुख्य आरोपी किशोर धोंडीराम जाधव ऊर्फ शिवणीकर याला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल अटक केली.

****

इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर सुरु असलेल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्याच्या कालच्या दुसर्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने, आपल्या दुसऱ्या डावात एक खेळाडू गमावत १५४ धावा केल्या आहेत. याआधी इंग्लंडचा पहिला डाव १७० धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावाच्या आधारे आतापर्यंत २६९ धावांची आघाडी घेतली आहे.

****

हवामान

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि हिंगोली जिल्ह्यात पुढचे तीन दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इतर जिल्ह्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.

****

No comments:

Post a Comment