▼

Wednesday, 29 July 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 29.07.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 29 July 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ जुलै २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक लोकसभेत संमत; राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयकाला राज्यसभेची मंजुरी 

·      मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा

·      व्‍याघ्र संवर्धन क्षेत्रात भारताकडे जगाचं नेतृत्व-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      कृषी कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार

आणि

·      एसटीचं NCMC स्मार्ट कार्ड घेण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 

****

सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानाने संमत करण्यात आलं. या विधेयकावर कालपासून झालेल्या चर्चेला राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी उत्तर दिलं. सदर कायदा अधिक कठोर करण्यासाठी आणि जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी या सुधारणा करण्यात आल्याचं डॉ सिंह यांनी सांगितलं. अशा प्रकरणांच्या कालबद्ध सुनावणीसोबत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद या विधेयकात आहे. डॉ सिंह यांच्या उत्तरानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयकावर मतदान घेतलं, विरोधकांच्या गदारोळातच सदनानं ते मंजूर केलं..

बाईट – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

 

त्यापूर्वी या विधेयकावर बोलतांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वापरलेल्या काही शब्दांवर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला, त्यामुळे वाढलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं,

कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले, सत्ताधारी खासदारांनी त्यावर पुन्हा आक्षेप घेतला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी विरोधी पक्षनेत्यांना सदनाची माफी मागण्याचं आवाहन केलं. गांधी यांनी सदर विधान कोणत्या तथ्याच्या आधारे केलं, ते सांगावं, किंवा माफी मागावी, असं रिजीजू यांनी स्पष्ट नमूद केलं, आणि सदनात जबाबदारीने बोलण्याचं गांधी यांना आवाहन केलं. मात्र गांधी यांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं टाळत, आपलं भाषण पूर्ण केलं नाही. त्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सुरू केलेला गदारोळ अखेरपर्यंत कायम होता.

****

राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयक आज राज्यसभेनं संमत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ ज्योती वाघमारे, यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत, वंदे मातरम गीताविषयी आपली मतं मांडली. विरोधकांनी या चर्चेदरम्यान घोषणाबाजी करत सभात्याग केला.

**

खासदार अजित गोपछडे यांनी आज राज्यसभेत नांदेड जिल्ह्यात सातत्याने येणारा पूर आणि सीमेलगतच्या शेतीचं होणाऱ्या नुकसानाकडे सदनाचं लक्ष वेधलं. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून या समस्येचं कायमस्वरुपी निवारण करण्याची विनंती केली.

**

डॉ अनिल बोंडे यांनी धार्मिक स्थळं आणि तीर्थक्षेत्रांवरच्या प्राथमिक मूलभूत सुविधांच्या व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित केला. केंद्राने तीर्थक्षेत्रांसदंर्भात स्वतंत्र विभाग स्थापन करून, तीर्थ पर्यटनाला चालना देण्याची मागणी केली.

****

शासनाने येत्या २८ ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देणं, प्रमाणपत्राच्या वैधतेतील अडचणी दूर करणं, आदी मागण्या मराठा समाजाने केल्या आहेत.

दरम्यान, मागेल त्याला प्रमाणपत्र देण्याचं काम नियमितपणे सुरू असल्याचा निर्वाळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. यासंदर्भात काही अडचणी असल्यास, त्या चर्चेतून सोडवता येतील, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

राज्यातील कृषी कर्जमाफीची रक्कम येत्या दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज रक्कम दोन लाखांपर्यंत आहे, त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी, संबंधित बँकांशी समन्वय साधून या सर्व तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यात येत असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी स्पष्ट केलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र मिळेल, दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज देणं शक्य होईल असंही भरणे यांनी नमूद केलं.

****

व्‍याघ्र संवर्धनात भारत जगाचं नेतृत्व करत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वन विभाग, आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर इथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, वन अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्‍थांचं यामधलं योगदान मोलाचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. या क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्यासाठीचे ‘राष्ट्रीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मानव आणि वाघ यांच्यातला संघर्ष टाळण्यासाठी एआय आधारित तंत्राची मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलतांना माहिती दिली. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

ड्रग्ज फ्री मुंबई' अभियानाला उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे. कौशल्य, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने वरळी इथे होणाऱ्या या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि खासगी शाळांमधील विद्यार्थी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील.

****

एसटीच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड घेण्याला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झालेलं नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही मुदतवाढ  देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. पात्र प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केलं आहे.

****

गुरुपौर्णिमेचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शिर्डीसह राज्यात विविध मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. कलाक्षेत्रात कार्यरत अनेक गुरुकुलांमध्येही आज गुरुवंदनेसह अनेक कार्यक्रम साजरे होत आहेत.

****

खरीप  हंगाम २०२६ साठी कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी परवा ३१ जुलैपर्यंत पीक विमा अर्ज सादर करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयानं केलं आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन विभागाने केलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यात चार लाख ४२ हजार ४०६ शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी अखेरचे दोन दिवस शिल्लक असून, शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. ते म्हणाले...

 बाईट - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

****

लातूर जिल्ह्याच्या चाकूर इथं सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ दोन शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून नगरपंचायतीच्या कमानीवर चढलेल्या या शेतकऱ्यांना खाली उतरवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

अनुसूचित जाती उपवर्गीकरण तसंच दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवरच्या कारवाई विरोधात आज छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. सपकाळ यांनी आपली सामाजिक प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने ही पोस्ट केल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

****

नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे विविध प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. यामुळे जायकवाडी धरणात सध्या २७ हजार ५०० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असून, धरणाची पाणीपातळी सुमारे ६७ टक्क्यांवर पोहोचली आहे.

****

No comments:

Post a Comment