Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 30 July
2026
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जुलै २०२६ सकाळी ७.१० मि.
****
· सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा
विधेयक लोकसभेत संमत
· मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा २९ ऑगस्टपासून
पुन्हा आंदोलनाचा इशारा
· शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या
याद्या लवकरच जाहीर करणार, सहकार मंत्र्यांची माहिती
· राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्स मध्ये
नाशिकच्या दिलीप गावितला सुवर्ण पदक
आणि
· छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला आज पावसाचा
ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी
****
सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक काल लोकसभेत आवाजी मतदानाने
संमत करण्यात आलं. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देतांना राज्यमंत्री जितेंद्र सिंह
यांनी, सदर कायदा अधिक कठोर करण्यासाठी आणि जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी सुधारणा करण्यात
आल्याचं सांगितलं. अशा प्रकरणांच्या कालबद्ध सुनावणीसोबत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार
असणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद या विधेयकात आहे. या उत्तरानंतर अध्यक्ष
ओम बिर्ला यांनी विधेयकावर मतदान घेतलं, विरोधकांच्या गदारोळातच सदनानं ते मंजूर
केलं.
त्यापूर्वी या विधेयकावर
बोलतांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वापरलेल्या काही शब्दांवर सत्ताधारी पक्षाच्या
खासदारांनी आक्षेप घेतला, त्यामुळे वाढलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज दोन
वेळा तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान
गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. गांधी यांनी सदर विधान कोणत्या तथ्याच्या आधारे केलं, ते सांगावं, किंवा माफी मागावी, असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी
केलं, मात्र गांधी यांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं
टाळत, आपलं भाषणही पूर्ण केलं नाही. त्यावरून विरोधी पक्षाच्या
सदस्यांनी सुरू केलेला गदारोळ अखेरपर्यंत कायम होता.
**
राष्ट्रगौरव अवमान
निवारण सुधारणा विधेयक काल राज्यसभेनं संमत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत राज्यमंत्री
रामदास आठवले, डॉ ज्योती वाघमारे, यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत, वंदे मातरम गीताविषयी आपली मतं मांडली. विरोधकांनी या चर्चेदरम्यान
घोषणाबाजी करत सभात्याग केला.
****
नांदेड जिल्ह्यात
सातत्याने येणारा पूर आणि सीमेलगतच्या शेतीचं होणाऱ्या नुकसानाकडे खासदार अजित गोपछडे
यांनी काल राज्यसभेचं लक्ष वेधलं. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन
करून या समस्येचं कायमस्वरुपी निवारण करण्याची विनंती त्यांनी केली.
****
राज्य सरकारने येत्या
२८ ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास २९ ऑगस्टपासून पुन्हा
आंदोलन सुरू करण्याचा इशारा, मराठा आरक्षण आंदोलक
मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं काल झालेल्या
बैठकीत ते बोलत होते. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देणं, प्रमाणपत्राच्या वैधतेतील अडचणी दूर करणं, आदी मागण्या मराठा समाजाने केल्या आहेत.
दरम्यान, मागेल त्याला प्रमाणपत्र देण्याचं काम नियमितपणे सुरू असल्याचा
निर्वाळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते
काल नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. यासंदर्भात काही अडचणी असल्यास, त्या चर्चेतून सोडवता येतील, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
****
राज्य शासनाच्या
महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती
योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या
याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावं जाहीर झालेल्या
यादीत नाहीत, त्यांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं आहे. पात्र
शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण
करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
या कर्जमाफीची रक्कम
येत्या दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. ते काल पुण्यात
पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी, संबंधित बँकांशी समन्वय साधून या सर्व तक्रारींचं तातडीनं निराकरण
करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी, कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या
होता कामा नये, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
****
राज्यातल्या सर्व
शाळांच्या ५० मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं
अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकीटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध
प्रशासनाने बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार
प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक
असल्याचंही ते म्हणाले.
****
एसटीच्या विविध
सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड घेण्याला एक सप्टेंबरपर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप हे स्मार्ट कार्ड
प्राप्त झालेलं नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही मुदतवाढ दिल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष
प्रताप सरनाईक यांनी दिली. प्रवाशांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहनही
त्यांनी केलं.
****
पंढरपुरातल्या आषाढी
यात्रेची काल सांगता झाली. परंपरेनुसार काल गोपाळपूर इथं सर्व संतांच्या पालख्या दाखल
झाल्या. इथल्या श्रीकृष्ण मंदिरात गोपाळकाला झाल्यानंतर सर्व मानाच्या पालख्यांनी श्री
विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला.
****
गुरुपौर्णिमेचा
सण काल साजरा झाला. शिर्डीसह राज्यात विविध मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी मोठी
गर्दी केली होती. कलाक्षेत्रात कार्यरत गुरुकुलांमध्येही गुरुवंदनेसह अनेक कार्यक्रम
साजरे झाले.
बीड जिल्ह्यातल्या
सिरसाळा इथं गुरुपौर्णिमेनिमित्त काल एकाच दिवसात २० हजार वृक्षांची लागवड करण्यात
आली. जलनायक मयंक गांधी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या अभियानात सहभागी
सर्वांनी पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प केला.
****
‘गुरुवंदन २०२६’
राष्ट्रीय कार्यशाळेच्या पहिल्या सत्राला काल बीड इथं प्रारंभ झाला. डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी यावेळी बोलताना, शिक्षणासंबंधी मंथनातून आत्मभान आणि आत्मचिंतनाची जडणघडण व्हावी, असं मत व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्ह्यात
चार लाख ४२ हजार ४०६ शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी
अखेरचे दोन दिवस शिल्लक असून, शेतकऱ्यांनी पीक
विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं.
****
नशामुक्त युवा फॉर
विकसित भारत अभियानांतर्गत परभणी इथं काल जिल्हास्तरीय विविध स्पर्धा तसंच जनजागृती
कार्यक्रम उत्साहात पार पडला. "नशेला नकार - विकसित भारताला होकार" हा संदेश
युवकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा
उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जालना इथंही या अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला
युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
परभणीच्या वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित कॅम्पस उभारणीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत नॅशनल
ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग -२०२६ मध्ये देशात १८वं स्थान मिळवलं आहे. विद्यापीठाला
१०० पैकी ९१ पूर्णांक सहा गुणांसह 'गोल्ड' रेटिंग प्रदान करण्यात आलं. ग्रीन मेंटर्सतर्फे
आयोजित करण्यात आलेली नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंग ही देशातल्या उच्च शिक्षण संस्थांच्या
शाश्वत विकास, पर्यावरण व्यवस्थापन आणि हरित उपक्रमांचं मूल्यमापन
करणारी राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्रक्रिया आहे.
****
शिर्डी इथून साईबाबांचं
दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाचा धाराशिव रोडवरील टोल नाक्यापुढे
आळणी पाटीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात २२ ते २३ भाविक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
असून, दोन वयोवृद्ध व्यक्तींची प्रकृती गंभीर आहे. अपघातग्रस्त
वाहनातले भाविक उमरगा तालुक्यातले रहिवासी आहेत.
****
ग्लासगो इथं सुरु
असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्स मध्ये पुरषांच्या १०० मीटर टी-47 स्पर्धेत नाशिकच्या दिलीप गावितने सुवर्ण पदक पटकावलं. याच
स्पर्धेत भारताच्याच मोहम्मद बासिलने रौप्य पदक जिंकलं. लांब उडी मध्ये मुरली श्रीशंकरनेही
रौप्य पदक पटकावलं. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह एकूण १५ पदकं जिकंली आहेत.
****
लातूर जिल्ह्यात
अनेक भागांत काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं
असलं तरीही, सुमारे ५० टक्के पेरण्या शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या
प्रतीक्षेत आहे.
नाशिक तसंच अहिल्यानगर
जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्यामुळे विविध प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात
आली आहे. यामुळे जायकवाडी धरणात सध्या २६ हजार ५१३ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने
पाण्याची आवक होत असून, धरणाची पाणीपातळी सुमारे ६८ पूर्णांक ६७ टक्क्यांवर
पोहोचली आहे.
हवामान विभागाने
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर उर्वरित मराठवाड्यात यलो अलर्ट जारी केला आहे.
****
No comments:
Post a Comment