▼

Saturday, 1 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 01 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

तेल विपणन कंपन्यांनी आज १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. या कपातीनंतर, मुंबईमध्ये व्यावसायिक सिलिंडरची नवीन किंमत २ हजार ६९१ रुपये ५० पैसे एवढी असेल. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. या निर्णयामुळे रेस्टॉरंट्स, ढाबे, हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ आणि पेय व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना दिलासा मिळेल.

****

ई-२० अर्थात इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे वाहनांच्या एकूण कार्यक्षमतेवर किंवा टिकाऊपणावर कोणताही मोठा परिणाम होत नसून २००५ ते २०१६ दरम्यान तयार करण्यात आलेल्या वाहनांच्या इंजिनमध्ये कोणत्याही बदलांची आवश्यकता नसल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. मात्र ई-२० च्या वापरामुळे काही जुन्या बीएस-३ वाहनांमधील विशिष्ट रबरचे भाग आणि गॅस्केट बदलण्याची आवश्यकता भासू शकते, असं गडकरी यांनी या उत्तरात नमूद केलं आहे.

****

नीती आयोगाच्या आकांक्षी ब्लॉक कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्याने देशात सर्वोत्तम कामगिरी नोंदवत ३८८ व्या स्थानावरून थेट ७७ व्या स्थानावर झेप घेतली आहे. देशातील एकूण ५१५ आकांक्षी ब्लॉकच्या यादीत सुरगाणा तालुका अव्वल ठरला. योग्य नियोजन, नियमित पाहणी आणि विविध सरकारी विभागांमधील समन्वयामुळे हे शक्य झालं असल्याचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलं. आरोग्य, पोषण, शेती आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत सुरगाणा तालुक्याने राज्य आणि देशाच्या सरासरी पेक्षा अधिक प्रगती केली आहे असंही ते म्हणाले.

****

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. लोकमान्यांच्या जन्मघरातल्या टिळकांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्ज्वलन केलं तसंच अर्धपुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

****

छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या वतीने आज सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक इथं महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नाथ सागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचं पाणी नाथसागर जलाशयात दाखल झाल्यानं जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज दुपारी बारा वाजता जलाशयात ७७ पूर्णांक ४६ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला असून ६६ हजार ५२५ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने आवक सुरू होती. जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून  ६०० तर डाव्या कालव्यातून ५०० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद  असा एकूण अकराशे  क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे.

****

नांदेडचा विष्णूपुरी प्रकल्प यंदा पहिल्यांदाच तुडुंब भरला आहे. या प्रकल्पात सद्यस्थितीत ९२ टक्के जलसाठा असून कोणत्याही क्षणी प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागतील. परिणामी गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

****

परभणी जिल्ह्यातील पाथरी विधानसभा मतदारसंघासह, गंगाखेड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात पूरग्रस्त परिस्थितीमुळे समस्या उद्भवल्या आहेत, हे लक्षात घेता मदत आणि पुनर्वसन विभागाने सर्वेक्षणासाठी आठ कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार राजेश विटेकर यांनी काल दिली. परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी आणि इतर नद्या, ओढ्याकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील ११७ गावं पुनर्वसन करण्याची गरज आहे. जिल्ह्यात मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नदीकाठच्या गावात पाणी शिरून जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सर्वेक्षणामुळे गोदाकाठावरील गावांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची प्रक्रिया सुरु करण्याबाबत शासन स्तरावरून कारवाई करण्यात येईल, असं आमदार विटेकर यांनी सांगितलं.

****

हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. जिल्ह्यात आपत्ती निवारण पथकं तैनात करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

****

No comments:

Post a Comment