▼

Saturday, 1 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.08.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 01 August 2026

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ सकाळी ११.०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे. परीक्षांमधील गैरप्रकार आणि गैरव्यवहारांना आळा घालून पारदर्शकता आणणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या नवीन कायद्यात दोषींना १० वर्षांपर्यंतची कैद, १० कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि मालमत्ता जप्ती यांसारख्या कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात विशेष 'फास्ट ट्रॅक' न्यायालये स्थापन केली जातील. पोलिसांना एफआयआर नोंदवल्यापासून दोन महिन्यांत तपास पूर्ण करावा लागेल, तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून तीन महिन्यांत खटल्याचा निकाल देणे बंधनकारक असेल. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे रक्षण होऊन परीक्षा पद्धतीवरील विश्वास अधिक दृढ होईल.

****

गृह आणि सहकार मंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असून ते आज एका समारंभात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करतील. आज स्वातंत्र्यसैनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. या अनुशंगानं शहा अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकावरही पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतील.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेने 'बल्क डिपॉझिट्स' अर्थात मोठ्या रकमांच्या ठेवींबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वं काल जारी केली. त्यानुसार, बँकांना बल्क डिपॉझिट्ससह सर्व प्रकारच्या ठेवींसाठीचे व्याजदर त्यांच्या संकेतस्थळांवर आगाऊ आणि स्पष्टपणे प्रदर्शित करणे अनिवार्य असेल. त्यांना केवळ  जाहीर केलेल्या याच दरांनुसार व्याज द्यावं लागेल. प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळी १० वाजता बल्क डिपॉझिट्सवरील व्याजदर बँकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करणं बँकांसाठी बंधनकारक असेल. या सुधारित सूचना १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होतील.

****

२०२५-२६ या वर्षात जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील एक युवक, एक युवती आणि एका नोंदणीकृत संस्थेला देण्यात येणार आहेत. या पुरस्काराचं स्वरुप युवक-युवती यांना रोख १० हजार रुपये तर संस्थेला रोख ५० हजार रुपये, गौरवपत्र, सन्मानचिन्ह असं आहे.

यासाठी गेल्या तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन विचारात घेण्यात येणार असून, येत्या १५ सप्टेंबर पर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणं आवश्यक असेल. अधिकाधिक पात्र युवक युवती आणि संस्थांनी sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २०१४ ते ३० जून २०२६ या कालावधीतील कुशल आणि अकुशल कामांचा प्रलंबित निधी येत्या आठ दिवसात उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु असं आश्वासन केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत दिलं आहे. मनरेगाच्या प्रलंबित निधीचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी याबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

****

गेल्या दोन दिवसांत मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यात २३३ महसूल मंडळात पाऊस झाला असून त्यामुळे मराठवाड्यातल्या अनेक नद्या नाल्यांना पूर आला आहे. धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणात सध्या ७६ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध असून परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना धरणात सुमारे २६ टक्के, पूर्णा-येलदरी धरणात सुमारे ५८ टक्के पाणीसाठा आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात सध्या १७ पूर्णांक दोन टक्के तर मांजरा धरणात १६ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यातील उर्ध्व पैनगंगा धरणात ५९ टक्क्यांहून अधिक तर धाराशिवमधल्या निम्नतेरणा मध्ये सद्यपरिस्थितीत सुमारे २७ टक्के पाणीसाठा आहे.

****

बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पूर्णा आणि ज्ञानगंगा नद्यांच्या संगमावर वसलेल्या नांदुरा तालुक्यातील रोटी या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. प्रशासनाकडून ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, हिंगणा इसापूर आणि हिंगणा दादगाव या गावांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने या ठिकाणचा संपर्कही तुटला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या तीनही गावांतील अनेक नागरिकांनी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या पुनर्वसित गावठाणात तात्पुरता आश्रय घेतला आहे.

****

जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्वच भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुका वगळता, इतर सर्व १४ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तापी नदीला पूर आलेला असून हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. गिरणा धरणही १०० टक्के भरलं असून सहा दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

****

No comments:

Post a Comment