▼

Saturday, 1 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.08.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 August 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ सकाळी ७.१० मि.

****

·      प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; पीएम किसान सन्मान निधी योजनेला ५ वर्ष मुदतवाढ

·      बालपण हा शिकण्याचा, चुका करण्याचा आणि त्या सुधारण्याचा काळ-पंतप्रधानांचं प्रतिपादन

·      बीड-पुणे रेल्वे सेवा १७ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यासाठी प्रयत्नशील-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ग्वाही

·      छत्रपती संभाजीनगर इथं दुध डेअरीवर कारवाई- भेसळयुक्त पदार्थांचा साठा जप्त-परवाने निलंबित

·      बीड इथे वन अधिकाऱ्याला ४५ लाख रुपये लाच घेताना रंगेहात अटक

·      राष्ट्र्कुल क्रीडा स्पर्धेत भारताला ज्युडोत दोन सुवर्ण तर भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्यपदक

आणि

·      मराठवाड्यात गेल्या २४ तासात २३३ मंडळांमध्ये अतिवृष्टी

****

प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी सुमारे पाच हजार ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यातून तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प विकासित केले जाणार आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला आणखी ५ वर्ष मुदतवाढ तसंच यासाठी तीन लाख १५ हजार कोटी रुपये निधीची तरतूद करण्यासही मंत्रिमंडळाने कालच्या बैठकीत मान्यता दिली. आतापर्यंत २३ हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे साडे ४ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती, वैष्णव यांनी दिली.

'खेलो इंडिया' योजनेचा विस्तार करण्यास तसंच राष्ट्रीय क्रीडा महासंघांना दिल्या जाणाऱ्या सहाय्यात वाढ करण्यालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यासाठी २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीत एकूण ३६ हजार ४४१ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

****

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे कालही बाधित झालं. विरोधी पक्षांचे सदस्य पूर्वनियोजित पद्धतीने सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत असल्याची टीका लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी केली.

****

बालपण हा शिकण्याचा, चुका करण्याचा आणि त्या चुका सुधारण्याचा काळ असतो असं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या नीट आंदोलनाच्या अनुषंगाने काल सामाजिक संपर्क माध्यमावरच्या एका संदेशात ते बोलत होते. या आंदोलनात मुलांची भाषा ऐकून, संताप आणि निराशा निर्माण होणं स्वाभाविक असलं तरी, अशा तरुणांना न्यायालयीन प्रक्रियेत ओढण्याऐवजी किंवा शिक्षा करण्याऐवजी योग्य मार्ग दाखवला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले. या मुलांना माफ करण्याची आपली इच्छा असून, समाजात इतरांनीही हीच समंजसपणाची भूमिका स्वीकारावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

****

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून वास्तविकतेचं भान होत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत, 'लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था' तसंच स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

मुंबईतच 'सुकन्या समृद्धी योजने'अंतर्गत बालिकांच्या आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रमातही मुख्यमंत्री सहभागी झाले. भारतीय संस्कृतीतल्या विविध भाषांचं वेगळेपण जगासमोर ठळकपणे मांडण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना शहा यांच्या हस्ते आज लोकमान्य टिळक स्मृती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

****

पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेत भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी ९ कोटी ९२ लाख रुपयांहून अधिक रकमेची देणगी अर्पण केली आहे. रोख देणगी, सोन्या-चांदीचे दागिने, लाडू प्रसाद विक्री, हुंडी, भक्तनिवास तसेच इतर विविध माध्यमांमधून हे उत्पन्न प्राप्त झाल्याची माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

****

महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असून, मनोज जरांगे  यांच्यावर आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही. वेळ पडली तर, त्यांची भेट घेऊन समाधान करू, अशी स्पष्ट भूमिका जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्‍यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडली आहे. मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाच्या दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मंत्री विखे पाटील यांनी काल माध्यमांशी बोलत होते.

****

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात असून १७ सप्टेंबरपर्यंत बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. त्या काल बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या...

बाईट- उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार

****

छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनाने चिकलठाणा परिसरात एका दूध डेअरीवर छापा टाकून तीन लाख १२ हजार ३८० रुपयांचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. यामध्ये साडे नऊशे किलो तूप, क्रीम आणि रिफाइंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे. शहरातील लक्ष्मी डेअरीच्या तीन विक्री केंद्रांवरही कारवाई करण्यात आली असून, दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून उत्पादन संच बंद करण्यात आले आहेत. तसंच जप्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत, राज्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ३५ टक्के तर लातूर विभागात सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणीकरणकरून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलं आहे.

****

बीड इथे सामाजिक वनीकरण विभागातला विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवाड याला ४५ लाख रुपये लाच घेताना काल रंगेहात अटक करण्यात आली. थकीत देयकं मंजूर करणं, कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन अदा करणं तसंच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी लखमवाड याने लाचेची मागणी केली होती. छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

****

ग्लासगो इथे सुरु असलेल्या राष्ट्र्कुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे ज्युडोपटू अस्मिता डे आणि हर्ष सिंग यांनी काल सुवर्णपदकाची कमाई केली. याच स्पर्धेत यामिनी मौर्य हिने रौप्य पदक कमावलं. भालाफेकपटू नीरज चोप्रा याला यंदा रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं, तर यशवीर सिंगने याच स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. डेकथलॉन स्पर्धेत तेजस्वीन शंकर याने कांस्यपदक जिंकलं, या स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. दरम्यान, या स्पर्धेत मुष्टीयुद्ध प्रकारात भारताची १० पदकं देखील निश्चित झाली आहेत. भारतानं आतापर्यंत ५ सुवर्ण, १२ रौप्य तर ६ कांस्य अशा एकूण २३ पदकांची कमाई केली आहे.

****

मराठवाड्यात गेल्या २४ तासात २३३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मंडळात, तर परभणीतल्या ४७ मंडळात अतिवृष्टी झाली, जालना ४२ मंडळं, छत्रपती संभाजीनगर ३३, हिंगोली २७, बीड ६, लातूर ४ तर धाराशिव जिल्ह्यात ३ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या २४ तासात या सर्व मंडळांमध्ये सरासरी ६८ पूर्णांक ८५ मिलीमीटर पाऊस झाला असून हा पाऊस वार्षिक सरासरीच्या ४७ पूर्णांक ८ टक्के इतका आहे.

या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात मांडवी महसूल मंडळात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. पिंपरखेड ते मार्लेगाव दरम्यान ची वाहतूक आणि संपर्क तुटला आहे. हिंगोलीतल्या ७ गावांचा संपर्क तुटला तर सेनगावमध्ये एक चारचाकी वाहून गेली. सुदैवाने त्यातील चार जण चचावले. धाराशिव जिल्ह्यात कळंबमध्ये वादळी वार्यासह अतिवृष्टी झाली त्यामुळे विद्युत रोहित्र कोसळल्याचं वृत्त आहे.

पैठणच्या जायकवाडी धरणातील जलसाठा ७५ टक्क्यांहून अधिक झाला आहे.

दरम्यान, मराठवाड्यात आज  बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

****

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग’ २०२६ मध्ये १०० पैकी ९२ पूर्णांक ५ गुण मिळवत देशात १२ वा क्रमांक पटकावला आहे. ‘ग्रीन मेंटर्स’ या संस्थेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय हरित विद्यापीठ क्रमवारीत देशातील आयआयटी, एनआयटी, ट्रिपल आय टी, केंद्रीय विद्यापीठं तसंच अन्य प्रतिष्ठित राष्ट्रीय संस्थांचा सहभाग आहे.

****

No comments:

Post a Comment