▼

Wednesday, 5 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 05 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०५ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान कथित पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं. सकाळी ११ वाजता सदनाचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु केला, मात्र विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करुन, यासंबंधी गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी लाऊन धरली. प्रश्नोत्तराचा तास हा कामकाजाचा एक महत्त्वाचा भाग असून त्याद्वारे प्रत्येक सदस्याला जनहिताचे मुद्दे मांडण्याची संधी मिळते, त्यामुळे कामकाज सुरळीत चालू देण्याचं आवाहन बिर्ला यांनी केलं. लोकशाहीत सभागृहात फलक झळकवणे किंवा घोषणाबाजी करणे योग्य नाही, असं सांगून त्यांनी, विरोधकांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्याने लोकसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

****

राज्यसभेतही विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज काही वेळासाठी स्थगित झालं होतं. आजचं कामकाज सुरु झाल्यावर सभापती सी पी राधाकृष्णन यांनी गदारोळातच शून्य प्रहराचं कामकाज सुरु केलं. जम्मू काश्मीरमधले भाजपचे खासदार सत पॉल शर्मा यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला सात वर्ष पूर्ण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या निर्णयामुळे जम्मू काश्मीरचा विकास झाला असून, अनेक सकारात्मक बदल झाल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय येत असल्यानं सदनाचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नसून, तो पाच पूर्णांक २५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. महागाईवर नियंत्रण आणि स्थिर आर्थिक विकास यांच्यात समतोल साधण्याच्या उद्देशानं, पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवला असून तटस्थ भूमिका स्वीकारली आहे, असं मल्होत्रा यांनी सांगितलं.

गेल्यावेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज एक दशांश टक्क्यांनी वाढवून सहा पूर्णांक सात दशांश टक्के केल्याचं त्यांनी सांगितलं. किरकोळ चलनवाढीवर आधारित महागाई दराचा अंदाज मात्र पाच पूर्णांक एक दशांश टक्क्यांवरुनपाच टक्के केल्याची माहिती त्यांनी दिली.

१० आणि २० रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असून, ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील, असं ते म्हणाले.

देशांतर्गत परिस्थितीविषयी बोलताना मल्होत्रा यांनी, अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. जागतिक परिस्थिती, अल निनो, भू-राजकीय कारणं यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढून पुन्हा चलनवाढीचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे.

****

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आज सात वर्ष पूर्ण झाली. हा देशासाठी ऐतिहासिक दिवस असल्याचं, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. कलम ३७० ची सुरुवातच ‘तात्पुरते’ या शब्दाने झाली होती, तरीही कोणत्याही सरकारने ते रद्द करण्याची इच्छाशक्ती दाखवली नव्हती, भाजपा सरकारनं हा निर्णय घेतला आणि २०१९ मध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी उचललेलं पाऊल हे सरदार पटेल यांच्याच दृढ निश्चयाचं प्रतिबिंब असल्याचं भाटिया यांनी नमूद केलं.

****

झारखंड मध्ये सरायकेला-खरसावां भागात केंद्रीय राखीव पोलिस बल आणि झारखंड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तीन नक्षलवाद्यांना अटक केली. यापैकी मदन महतो याच्यावर सरकारनं १५ लाखांचं तर अन्य दोघांवर पाच आणि दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. या तिघांकडून तीन एके-४७ बंदुका जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आषाढी वारी पूर्ण करून परतलेल्या श्री गजानन महाराजांच्या दिंडीचं आज बीड शहरात आगमन झालं. विविध ठिकाणी पुष्पवृष्टी, आरती आणि जयघोषाने दिंडीचं स्वागत करण्यात आलं. आमदार संदीप क्षीरसागर यांनी पालखीचं दर्शन घेऊन पूजन केलं.

****

पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९३ पूर्णांक ४९ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात सध्या २४ हजार ५३१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, २८ हजार १३४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. उजव्या कालव्यातून एक हजार, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

****

दक्षिण कोरियाच्या आसन इथं सुरु असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीमध्ये भारताच्या ईशरानी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रीयांशी वलीशेट्टी यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments:

Post a Comment