▼

Wednesday, 5 August 2026

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 05.08.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 05 August 2026

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०५ ऑगस्ट २०२६ सायंकाळी ६.१०

****

·      रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर सव्वा पाच टक्क्यांवर कायम-येत्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला प्लास्टिक नोटा चलनात येण्याची शक्यता 

·      सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढीबाबत सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी

·      गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी-मुख्यमंत्र्यांचे निर्देश

·      कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या महिला बॅडमिंटन पटूंचा वरचष्मा

आणि

·      जायकवाडी धरणातून सुमारे ३० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू

****

भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नसून, तो पाच पूर्णांक २५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. मुंबईत बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. महागाईवर नियंत्रण आणि स्थिर आर्थिक विकास यांच्यात समतोल साधण्याच्या उद्देशानं, पतधोरण समितीनं रेपो दर कायम ठेवला असून तटस्थ भूमिका स्वीकारल्याची माहिती मल्होत्रा यांनी दिली. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज एक दशांश टक्क्यांनी वाढवून सहा पूर्णांक सात दशांश टक्के केल्याचं त्यांनी सांगितलं. किरकोळ चलनवाढीवर आधारित महागाई दराचा अंदाज मात्र पाच पूर्णांक एक दशांश टक्क्यांवरुन पाच टक्के केल्याची माहिती त्यांनी दिली.

१० आणि २० रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असून, ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील, असं ते म्हणाले.

जागतिक परिस्थिती, अल निनो, भू-राजकीय कारणं यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढून पुन्हा चलनवाढीचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे.

****

जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आज सात वर्ष पूर्ण झाली, या निमित्ताने समाज माध्यमांवरच्या संदेशात पंतप्रधानांनी, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील लोकांच्या जीवनात व्यापक परिवर्तन झाल्याचं सांगितलं. या राज्यात पायाभूत सुविधांचा विस्तार झाला असून शिक्षण, आरोग्यसेवा, उद्योजकता आणि क्रीडा यांसारख्या क्षेत्रांमधील संधींमध्ये वाढ झाल्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.

****

जंतरमंतर आंदोलनावरच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी या आंदोलनावर पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करुन, गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन देण्याची मागणी लावून धरली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करत, सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं, त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

बँकर्स बुक्स अँड एव्हिडन्स विधेयक-२०२६ आज लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच चर्चेविना पारित मंजूर करण्यात आलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात सादर केलं. बँक नोंदींशी संबंधित पुराव्यांसंबंधीचा कायदा सध्याच्या डिजिटल बँकिंग क्षेत्राशी सुसंगत करणे हा या विधेयकाचा उद्देश आहे. यामुळे बँकिंग प्रणालीच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कायदेशीर चौकटीचे आधुनिकीकरण होईल. बँक नोंदींच्या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रती न्यायालयात वैध आणि कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातील, अशी या विधेयकात अशीही तरतूद आहे.

****

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याबाबतच्या सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज हे विधेयक सभागृहात मांडलं. त्यावर झालेल्या चर्चेनंतर सदनानं हे विधेयक लोकसभेला परत केलं. लोकसभेने हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं आहे. या विधेयकात भारताच्या सरन्यायाधीशांव्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवण्याची तरतूद आहे. या वर्षी मे महिन्यात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायाधीशांची संख्या ३३ वरून ३७ पर्यंत वाढवण्यासाठी एक अध्यादेश जारी केला होता. दरम्यान, राज्यसभेतही विविध मुद्यांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं होतं.

****

इथेनॉल मिश्रण धोरणासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित खोटे आणि दिशाभूल करणाऱ्या चित्रफिती तत्काळ हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओंमुळे जनतेची दिशाभूल होत असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. तसंच संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्मना अशा चित्रफिती त्वरित हटवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

****

गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. एमआयडीसीअंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात आज झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, पुणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, नाशिक आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ६६ हजार ३४३ एकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील ९७ सामंजस्य करारांतर्गत सुमारे ७५ हजार २३४ एकर जमिनीची मागणी आहे. त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची तातडीने नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी बीड जिल्हा कारागृह अधीक्षकांना दिलेल्या पत्राचा संदर्भ देत खासदार सुळे यांनी ही मागणी केली. बीड जिल्हा कारागृहात कराड याला राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करावी, बीड कारागृहातील सीसीटीव्ही चित्रफिती, दूरध्वनी नोंदी आणि भेट नोंदवही तातडीने जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची तसंच आरोपीला मदत करणाऱ्या संबंधित कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही सुळे यांनी केली आहे.

****

अन्न आणि औषध प्रशासन विभागानं राज्यभर मोठी धडक कारवाई करत दुग्धजन्य पदार्थ, पानमसाला आणि गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत जवळपास साडे तीन लाख रुपयांहून अधिक किमतीचे दुग्धजन्य पदार्थ तर १ कोटी ६३ लाख रुपयांचा पानमसाला आणि गुटखा जप्त करण्यात आला आहे. राज्यात ३० ठिकाणी छापे टाकून विभागाने २८ जणांना अटक केली, तर १४ खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले. याशिवाय छत्रपती संभाजीनगर इथून ८८० किलो तूप, पनीर, क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

बीएचएमएस डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत बीएचएमएस-सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतेही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.

****


लातूर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमधील अनेक वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, या मागणीसाठी संभाजी सेनेनं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. यापूर्वीही अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची तक्रार संघटनेने केली असून, येत्या १५ दिवसांत मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संभाजी सेनेनं दिला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण आगारात आज पाच इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या. जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलं.

****

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज बीड जिल्ह्यातल्या केज इथं आंदोलन करण्यात आलं.

****

दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या रक्षिता रामराज, अस्मिता चलिहा, मानसी सिंग, ईशाराणी बरुआ, आकर्षी कश्यप, श्रीयांशी वलिशेट्टी, अनमोल खर्ब, आणि तन्वी शर्मा या महिला खेळाडूंनी पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. तर महिला दुहेरीत रितिका ठक्कर आणि सोनाली सिंग तर मिश्र दुहेरीत ईशान भटनागर आणि स्मृती मिश्रा जोडीने पुढची फेरी गाठली आहे.

****

पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या सुमारे ३० हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या १८ दरवाजातून सुमारे २८ हजार घनफूट, उजव्या कालव्यातून एक हजार, तर डाव्या कालव्यातून ७०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या ३३ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, पाणी साठा सुमारे ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, कोकण तसंच नाशिक जिल्ह्याला आज यलो अलर्ट तर रायगड आणि पुणे तसंच सातारा जिल्ह्यात घाटमाथा परिसराला उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात सगळ्या जिल्ह्यांत पुढचे पाच दिवस जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

****

गडचिरोली जिल्ह्यातही कोरची-कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेडगाव घाटात आज सकाळी भीषण अपघात घडला. छत्तीसगडहून येणाऱ्या मालवाहू ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक बसली.

****

No comments:

Post a Comment