▼

Sunday, 9 August 2026

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.08.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 09 August 2026

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ दुपारी १.०० वा.

****

आज ९ ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्यलढ्याला क्रांतिकारी वळण देणारा ऐतिहासिक दिवस! या स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना, हुतात्म्यांना अनेक मान्यवरांनी समाजमाध्यमांवरील संदेशाद्वारे आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वीरांना आदरांजली वाहताना म्हणाले की, महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन ‘भारत छोडो’च्या आवाहनाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला नवी ऊर्जा दिली. या आंदोलनातून वसाहतवादी राजवटीतून स्वातंत्र्य मिळवण्याचा भारतीय लोकांचा अढळ निर्धार दिसून आला.

उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी भारत छोड़ो आंदोलनात सहभागी स्वतंत्र्य सैनिकांना श्रद्धांजलि अर्पण केली आहे. सामजिक संपर्क माध्यमावरील एका संदेशाद्वारे त्यांनी महात्मा गांधींनी दिलेल्या करो या मरो आवाहनामुळे देशवीसीय स्वातंत्र्य संग्रामासाठी एकजुट झाल्याचं नमूद केलं.

आजच्याच दिवशी १९२५ साली स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना असलेल्या क्रांतीकारकांनी केलेल्या ‘काकोरी रेल्वे स्वारी सशस्त्र हल्ल्याचा’ दाखला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देऊन स्वातंत्र्य सैनिकांबद्दलचं ऋण व्यक्त केलं. याबाबत समाज माध्यमावरील संदेशात शहा यांनी चंद्रशेखर आजाद आणि राम प्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वतील साहसी वीरांनी आपल्या अदम्य साहस आणि समर्पणाद्वारे ब्रिटिश शासनाला आपल्या देशातील संसाधनं ही त्यातील जनतेचीच असल्याचा संदेश पोहोचवल्याचं नमूद केलं.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याला क्रांतिकारी वळण देणारा हा ऐतिहासिक दिवस असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांना आदरांजली वाहिली.

****

आजचा दिवस आंतरराष्ट्रीय मूलनिवासी अर्थात आदिवासी दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. आदिवासी लोकांच्या हक्कांचं संरक्षण करणं, त्यांच्या संस्कृतीचा सन्मान करणं आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे हा दिवस पाळला जातो. आदिवासींचं दारिद्र्य, अनारोग्य आणि शिक्षणाचा अभाव यांसारख्या आव्हानांवर मात करणे, यासोबतच पर्यावरण आणि जंगलांच्या संरक्षणात आदिवासींचं योगदान जगासमोर आणणे. हे हा दिवस साजरा करण्यामागे प्रमुख उद्दीष्ट आहे.

****

हर घर तिरंगा अभियान आज सुरू झालं आहे. येत्या १७ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अभियानाद्वारे देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवण्यास प्रोत्साहन देऊन देशप्रेम, राष्ट्रीय एकता आणि भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या गौरव सोहळ्यात त्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देश आहे. दरम्यान, वंदेमातरम या राष्ट्रीय गीताला यंदा दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यानं या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

****

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने काहिशी विश्रांती घेतली होती. मात्र, आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावर होऊ शकतो. यानुसार मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. पुढील काही दिवसांत राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः १३ ऑगस्टपासून कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची तीव्रता वाढू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

****

नाशिक जिल्ह्यातील भूकंपाच्या हालचालींवर अधिक प्रभावी आणि अचूक पद्धतीने लक्ष ठेवण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने, सुरगाणा इथं अत्याधुनिक ब्रॉडबँड सिस्मोग्राफ आधारित भूकंप मापन केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या माध्यमातून मिळणारी भूकंपविषयक माहिती त्याचवेळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाकडे पाठविली जाणार आहे.

****

बीड इथं शालेय विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीची तत्व आणि सामाजिक समस्या अधोरेखीत करणारा ‘फेस्टिव्हल ऑफ डेमोक्रसी’ हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. शहरातील गुरुकुल इंग्लिश स्कूलमध्ये याचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उपक्रमात विद्यार्थ्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महिलांचा अवमान, पर्यावरणाकडे दुर्लक्ष, मोबाईल फोनचे व्यसन आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली या चार सामाजिक विषयांना उमेदवारांच्या स्वरूपात मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी या विषयांवर प्रचार, चर्चा आणि मतप्रदर्शन केले. विविध दृष्टिकोन समजून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी मतदानाद्वारे आपली भूमिका व्यक्त केली.

लोकशाही केवळ पाठ्यपुस्तकातील विषय न राहता तिचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, तसेच जबाबदारी, जागरूकता, विचार करण्याची क्षमता आणि सहभागाची भावना विकसित व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.

****

अमरीकेच्या युजिन इथं आयोजित जागतिक एथलेटिक्स वीस वर्षांखालील खेळाडुंच्या विजेतेपद स्पर्धेत आता भारताची पदक संख्या वाढून तीनवर पोहोचली आहे.

ताज्या वृत्ता नुसार वसंत कुमार मेघवाल यानं उंच उडी प्रकारात रौप्य तर, शाहनवाज खान यानं लांब उडी प्रकारात कांस्य पदक जिंकलं आहे.

****

No comments:

Post a Comment